जमिनीच्या पृष्ठभागावरील पाणी जमिनीत झिरपून जमिनीखालील खडकांमध्ये साठून राहते. त्या पाण्याला आपण भूजल म्हणतो. खडकांच्या काही विशिष्ट जलवैज्ञानिक गुणधर्मांमुळे (हायड्रॉलॉजिकल प्रॉपर्टीज) विहिरी आणि कूपनलिकेच्या माध्यमातून हे भूजल मिळवता येते. ज्या खडकांमध्ये भूजल साठते त्यांना जलधर (अॅक्विफर) म्हणतात. सच्छिद्रता व पारगम्यता हे प्रमुख जलवैज्ञानिक गुणधर्म एखादा खडक हा उत्तम जलधर असू शकतो का हे ठरवण्यात कळीची भूमिका बजावतात. जमिनीखालील प्रत्येक खडक जलधर असू शकत नाही. उत्तम जलधर असण्यासाठी तो खडक सच्छिद्र तसेच पारगम्य असणे गरजेचे असते. अन्यथा केवळ सच्छिद्र असणारे खडक पाणी साठवू शकतात, पण त्याचे वहन करू शकत नाहीत. ज्या वेळेस खडकातील छिद्रे एकमेकांशी जोडली जाऊन नलिकांसारख्या पोकळ्या तयार होतात त्या वेळेस ते पारगम्य बनतात. हे दोन्ही गुणधर्म असणारे खडक चांगले जलधर बनू शकतात. भूजलाचा शोध घेत असताना असे जलधर शोधणे आवश्यक असते.

संरचनेनुसार जलधरांचे काही प्रकार पडतात.

१. बंदिस्त जलधर (कन्फाइन्ड अॅक्विफर) – या प्रकारामध्ये जलधर खडक हा वरच्या व खालच्या बाजूने अपारगम्य अशा खडकाने बंदिस्त झालेला असतो; हा अपारगम्य खडक पाण्याचे वहन करत नाही. अशा प्रकारे वरून व खालून अशा दोन्ही बाजूंनी बंदिस्त असणाऱ्या जलधराला बंदिस्त जलधर असे म्हणतात. वरील व खालील खडकांमुळे या जलधरावर दाब तयार होतो.

२. मुक्त जलधर (अनकन्फाइन्ड अॅक्विफर) – या जलधरामध्ये भूजलपृष्ठ जमिनीच्या पृष्ठभागाजवळ असते आणि त्यावर वातावरणीय दाब कार्य करतो यालाच भूजलपृष्ठ जलधर असेही म्हणतात.

३. अधिश्रित जलधर (पर्च्ड अॅक्विफर) – या प्रकारामध्ये जलधराचे भूजलपृष्ठ हे प्रादेशिक भूजलपृष्ठाच्या वरच्या पातळीवर आढळून येते. हा जलधर लहान स्वरूपाचा असतो व मुख्य जलधरापासून अपारगम्य खडकाने वेगळा झालेला असतो. यातून होणारा भूजलपुरवठा हा अशाश्वत असतो.

४. आर्टेशियन जलधर (आर्टेशियन अॅक्विफर)- या प्रकारच्या जलधराच्या वर आणि खाली अपारगम्य खडक असतात. शिवाय हा जलधर कलता (इन्क्लाइन्ड) असतो, आणि ज्या ठिकाणाहून त्यात पाणी मुरते, ते ठिकाण उंचावर असते. पाणी जिथून मुरते त्यापेक्षा खालच्या पातळीवर विहीर खणली तर वरच्या पाण्याच्या दाबामुळे याचे पाणी विहिरीतून आपोआप बाहेर पडू लागते. अशा विहिरीला आर्टेशियन विहीर म्हणतात. त्यामुळे कोणत्याही साधनाशिवाय या विहिरीतून पाणी मिळू शकते. आर्टेशियन हा शब्द फ्रान्समधील अर्त्वा नावाच्या प्रदेशावरून घेण्यात आला. या प्रदेशात पहिल्यांदा अशा विहिरी खोदण्यात आल्या.

– डॉ. योगिता पाटील

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader