महाराष्ट्रासह दख्खनच्या पठारावर पाच लक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रात ज्वालामुखीजन्य कातळ आढळतो. सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी लाव्हारसाचे थरावर थर ओतले गेल्याने या खडकांची चळत तयार झाली. सह्य़ाद्री पर्वताच्या कोणत्याही घाटात या खडकांच्या चळतीची भव्यता आपल्या लक्षात येऊ शकते.
पृथ्वीवर जे खडक उघडे पडलेले आहेत, त्या सर्व खडकांचे अत्यंत मंदगतीने, पण अविश्रांतपणे विदारण (वेदरिंग) होत असते. ते दोन प्रकारे होत असते, भौतिक विच्छेदन आणि रासायनिक विघटन. दिवसा हे खडक उन्हामध्ये तापतात, ते प्रसरण पावतात. रात्री ते निवतात, त्यामुळे आकुंचन पावतात. खडकांवर जसा दैनंदिन तापमानातील फरकाचा परिणाम होतो, तसाच जो फरक ऋतुमानाप्रमाणे पडतो, त्याचाही होतो. उन्हाळय़ात खडक तापतात आणि प्रसरण पावतात, तर हिवाळय़ात खडक निवतात आणि आकुंचन पावतात. ही क्रिया सतत, अक्षरश: लाखो वर्षे खंड न पडता सुरू राहते. खडकाचा पृष्ठभागाकडचा थोडासा भाग यामुळे क्षीण होतो. वारा, पाऊस, वाहते पाणी यांचा मार त्याच पृष्ठभागाला झेलावा लागतो.
शिवाय पावसाळय़ात खडक भिजतात. हवेतील काही वायू पाण्यात अत्यल्प प्रमाणात विद्राव्य असतात, ते पावसाच्या पाण्यात विरघळतात. त्यामुळे पावसाचे पाणी अत्यल्प प्रमाणात आम्लधर्मीय होते. अर्थातच ते रासायनिकदृष्टय़ा जास्त सक्षम असते. पृष्ठभागावरून वाहून जाताना आणि जमिनीत मुरताना खडकांचे धिम्या गतीने रासायनिक विघटन करते. विदारणाच्या तीव्रतेत वाढ होते.
विदारणाचे परिणाम वेगवेगळय़ा खडकांवर वेगवेगळे होतात. काळय़ा कातळावरही ते निरनिराळय़ा प्रकारे होतच असतात. काळय़ा कातळाच्या काही प्रस्तरांत भेगा पडलेल्या असतात. त्यामुळे ते प्रस्तर खडकांचे ठोकळे एकमेकांवर रचून ठेवावे तसे दिसतात. पावसाचे पाणी भेगाभेगांमधून दरवर्षी जात असते. त्यामुळे ठोकळय़ांचे कोपरे आधी झिजतात. ठोकळय़ाचा जो चेंडूच्या आकाराचा भाग उरतो, तो झिजू लागतो. त्याचे थोडेसे विघटन झाले की पाणी आणखी थोडे आत जाते. असे करता करता मध्यभागी विदारण न झालेला गोटा राहतो, आणि त्याच्याभोवती विदारण झालेल्या भागाची आवरणे शिल्लक राहतात. कांदा निम्मा चिरावा तशी ती रचना दिसते. विदारणाच्या या प्रकाराला कंदुकाकार विदारण किंवा कांद्याच्या सालींसारखे दिसणारे विदारण म्हणतात. असे विदारण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी दिसते.
– डॉ. विद्याधर बोरकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org