आपल्या खाण्यात गहू, भात, मका, ज्वारी, बाजरी, रागी इत्यादी तृणधान्ये आणि तूर, मूग, उडीद, हरभरा, मटकी, कुळीथ इत्यादी कडधान्ये येतात. या दोन्ही गटांतील धान्यांना मिळून अन्नधान्य असे संबोधले जाते. या पिकांतील फुलांमध्ये पुंकेसर व स्त्रीकेसर एकत्र असतात. त्यास मका अपवाद आहे. मक्याच्या ताटावर वरच्या बाजूस तुऱ्यात पुंकेसर आणि अंदाजे मध्यावर असलेल्या कणसावर स्त्रीकेसर असतात. ज्वारी, बाजरी, भात, मका या पिकांत दोन भिन्न वाणांच्या संकरापासून बियाणे मिळवितात. हे बियाणे पेरणीसाठी वापरल्यावर प्रथम पिढीत जोमदार संकरित (हायब्रीड) पीक मिळते. संकरापासून मिळालेल्या बियाण्यास संकरित म्हणजेच हायब्रीड बियाणे म्हणतात. हायब्रीड बियाण्यापासून मिळणाऱ्या पिकाच्या धान्यास हायब्रीड धान्य म्हणतात.
ज्वारी व बाजरी पिकात संकरीकरणात वापरलेल्या मादी वाणात कोशीय-जनुकीय नरवंधत्व असल्याने मोठय़ा प्रमाणात संकरीकरणाचे काम करता येते. मिळालेले संकरित बियाणे शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिले जाते. यापासून पीक वाढविण्यासाठी शिफारशीप्रमाणे पुरेशी सेंद्रिय व रासायनिक खते देणे, जमीन व पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि पीक संरक्षण करणे आवश्यक असते. त्यामुळे उत्पादनक्षमता वाढते.
हायब्रीड पिकापासून मिळालेले धान्य पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून वापरू नये. कारण त्यापासून मिळालेल्या पिकात (द्वितीय पिढीत) प्रभावी सहकारी जनुकांचे विकेंद्रीकरण होते. त्यामुळे द्वितीय पिढीत प्रथम पिढीसारखे भरघोस उत्पादन मिळत नाही, उलट ते घटते. म्हणून संकरित पीक घेण्यासाठी दरवर्षी नवीन तयार केलेले बियाणे वापरणे आवश्यक असते.
संकरित बियाणे तयार करताना वापरण्यात आलेल्या मादी व नर वाणांत भेसळ आढळल्यास फुलोऱ्यापूर्वीच ती काढून टाकावी लागते. मादी वाणावरील तुरे पोग्यात असतानाच काढून टाकावे लागतात. नर वाणाच्या तुऱ्यातील परागकण नसíगकरीत्या वाऱ्याने वाहून मादी वाणाच्या स्त्रीकेसरावर पडून संकरित बियाणे तयार होते.
अलीकडच्या काळात सीएसएच-९, १४, १७ व २३ हे खरीप ज्वारीचे आणि बाजरीचे श्रद्धा, सबुरी, शांती इत्यादी संकरित वाणे प्रसारित केलेली आहेत. संकरित आणि सुधारित बियाणांच्या वापरामुळे आपण अन्नधान्यांत स्वयंपूर्ण झालो आहोत.
जे देखे रवी.. – रक्तदान
मेडिकलच्या शेवटच्या वर्षांत असताना किंवा पास झाल्यावर मी पहिल्यांदा रक्तदान केल्याची आठवण आहे. रक्तदान केल्यावर सगळ्यांना कॉफी देण्याची पद्धत होती. चहा का नाही याचे उत्तर अजूनही कोणी देत नाही. पडलेली प्रथा मोडणे अवघड असणार. कॉफी प्यायल्यावर मी तिथेच रेंगाळलो तेव्हा तिथली डॉक्टर आता तुम्ही जाऊ शकता असे म्हणाली, परंतु तिची नजर चुकवत मी तिथेच इकडेतिकडे करत माझ्या दिलेल्या रक्ताच्या बाटलीकडे बघत बसलो. मग कर्मचारी आला त्याने बाटलीला लेबल लावले आणि त्यावर एक क्रमांक लिहिला गेला. मी त्याला विचारले, माझे नाव का नाही लिहिले? तेव्हा तो म्हणाला, तुमचे नाव वहीत लिहिले, त्याला नंबर पडला आहे तो इथे लिहिला. रविन थत्ते या जिवंत माणसाचे रूपांतर आता एका आकडय़ात झाले होते.
मग मी त्याला विचारले, हे रक्त कोणाला देणार? तेव्हा तो म्हणाला, हे रक्त देण्यासाठी नाही, तर चढवण्यासाठी आहे. रक्त देतात तेव्हा बाटली किंवा हल्लीची प्लास्टिक पिशवी वरती असते आणि रुग्ण खाली असतो आणि तरीही रक्त चढवणे हाच शब्दप्रयोग सामान्यजनांच्या डोक्यात किंवा तोंडात बसला आहे. ती गोष्ट इथेच संपली नाही, त्या काळी आतासारख्या ‘रक्तपेढय़ा’ नव्हत्या. एका खोलीत एका फ्रीजमध्ये या बाटल्या ठेवल्या जात. त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी मी त्या खोलीत जात असे. एके दिवशी माझ्या रक्ताची बाटली गायब झाली तेव्हा तिथल्या नर्सला मी विचारले, ‘माझी बाटली गेली कुठे?’ तेव्हा ती पहिल्यांदा दचकली, तिला वाटले मी म्हणतो आहे कोणीतरी चोरली. पण मी विद्यार्थी किंवा इंटर्न असल्यामुळे गणवेशात होतो, तेव्हा ती परत माझ्याकडे जरा सूक्ष्म नजरेने बघू लागली. मग माझ्या खिशातला कागद काढून माझ्या बाटलीचा आकडा मी सांगितला तेव्हा ती एका वहीत बघू लागली आणि म्हणाली, वार्ड क्र. ५ ‘मोरेश्वर.’ मी लगेचच वार्ड पाचकडे मोर्चा वळवला आणि आपण मोरेश्वरशी हातमिळवणी करतो आहोत असे दृश्य बघू लागलो. पण मोरेश्वर कुठला सापडायला तो आदल्या रात्रीच १२ वाजता चाकू हल्ल्यातल्या रक्तस्रावामुळे शस्त्रक्रिया करतानाच गतप्राण झाल्याचे कळले आणि मी खिन्न झालो.
रुग्णालयातला पेशंट गेला तर तिथल्या लोकांचे दु:ख अगदीच किरकोळ असते किंवा नसतेच. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ असाच प्रकार. मी खिन्न झालो होतो. कारण माझे रक्त वाया गेल्याची भावना झाली.
‘फळ पिकल्यावर ज्या सहजतेने वृक्ष त्या फळाचा त्याग करते आणि फळ गळून पडते’ हा निष्काम कर्मयोगाचा ज्ञानेश्वरांचा दृष्टांत मी जवळजवळ तीस वर्षांनी वाचणार आहे, हे त्या वेळी मला माहीत नव्हते.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस – टॉन्सिल्स वाढणे : भाग १
टॉन्सिल्स हा अवयव मानवी शरीरातील पहिला गार्ड आहे. घशात व पुढे धूळ किंवा अन्य कोणतेही कण व कसलेच इन्फेक्शन उतरू नये; याची काळजी टॉन्सिल्स घेते. सर्दी, पडसे, घाण हवा, थंड पदार्थ शरीरात मानवले नाहीत म्हणजे टॉन्सिल्सला सूज येते. कान खराब होतो का नाही, हेही टॉन्सिल्सवरून कळते.
हा अवयव काढून टाका हे सांगणे फार सोपे आहे; पण बहुसंख्य मुलांची मूळ तक्रार कायमच राहते. कानाला इजा पोहोचण्याची शक्यता असेल, टॉन्सिल्स सेप्टिक झालेल्या असतील व अन्य उपायांचा काहीच उपयोग नाही अशी खात्री असेल तरच टॉन्सिल्स काढून टाकाव्या. टॉन्सिल्स काढण्याकरिता नसून शरीर संरक्षणाकरिता आहेत, हा विचार सतत डोळ्यासमोर हवा.
काही मुलांच्या टॉन्सिल्स वाढलेल्या, त्यांच्या पालकांना माहीत नसतात. मुलाची वाढ नाही, किंवा अन्य तक्रारींकरिता घसा बघताना टॉन्सिल्सची तक्रार सहज लक्षात येते. जरा टॉन्सिल्स वाढल्या, की काढून टाक हा ‘डॉक्टरी’ सल्ला, महर्षी अण्णासाहेबांच्या काळापासून मुंबई प्रांतात चालत आलेला दिसतो. महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांनी प्रथम आधुनिक वैद्यकाच्या शिक्षणाची पदवी प्राप्त केली. त्या काळातही आधुनिक वैद्यकाचे थोर थोर चिकित्सक टॉन्सिल्स या विकाराकरिता शस्त्रकर्म सुचवत होते. हे ऐकून, पाहून महर्षी आयुर्वेदाकडे वळले. कारण त्यांना शस्त्रकर्माचा अतिरेकी आग्रह या विकाराकरिता पटला नाही. शेकडो लहान बालकांचे टॉन्सिल सुरक्षित राखण्याचे भाग्य; मला महर्षीच्या चरित्र वाचनामुळे लाभले.
टॉन्सिल्सग्रस्त मुलांच्या टॉन्सिलग्रंथीची सूज, क्षोभ, सडणे, बारीक ताप, घशातील टोचणी; सर्दी पडसे यांचा वाढता त्रास; स्वरभंग, टॉन्सिल व पडजीभ यांच्या त्रिकोणातील सूज; कर्णस्राव, कर्णशूल या लक्षणांकडे सतत लक्ष असावे. बालकांची भूक मंदावणे, वाढ खुंटणे याकडेही लक्ष असावे. घशातील लाली व गळ्याच्या ठिकाणच्या व गाठींचीही बाहेरून तपासणी करावी.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – २३ मार्च
१८९७ > कवी गुणवंत हणमंत देशपांडे यांचा जन्म. ‘निवेदन’( १९३५) हा त्यांचा एकमेव प्रकाशित काव्यसंग्रह, परंतु प्रासादिक व गूढगुंजन करणाऱ्या त्यांच्या काव्यशैलीने त्या काळावर ठसा उमटविला होता.
१९२१ > धर्मातरित हिंदूंना स्वधर्मात परत आणण्याचे काम करताना ‘हिंदू मिशनरी सोसायटी’ नावाचे साप्ताहिक काढणारे गजानन भास्कर वैद्य यांचे निधन. धर्मविषयक नऊ पुस्तकेही त्यांनी लिहिली.
१९२७ > इसापनीतीतील गोष्टी आर्या वृत्तात आणणाऱ्या कवयित्री सरस्वतीबाई विद्याधर भिडे यांचे निधन. ‘सरोजिनी’ ही बंगाली कादंबरी त्यांनी (१९०९) मराठीत आणली.
१९५९ > ‘निर्मला’, ‘दोष कुणाचा?’ अशा सामाजिक कादंबऱ्यांतून स्त्री-प्रश्न मांडणारे कृष्णाजी महादेव चिपळूणकर यांचे निधन. अनेक अनुवादही त्यांनी केले होते.
२००७ > प्रदेशनिष्ठ वाङ्मयाचा दीपस्तंभ ठरलेले कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे (जन्म: ५ जाने. १९१३) यांचे निधन. एल्गार, लव्हाळी, गारंबीचा बापू, रथचक्र अशा ११ कादंबऱ्या, पाच कादंबऱ्यांवर आधारित नाटके, शिवाय संभूसांच्या चाळीत पंडित आता तरी शहाणे व्हा आदी सात स्वतंत्र नाटके, असा या साहित्य अकादमी, जनस्थान पुरस्कारमंडित लेखकाचा आवाका होता.
– संजय वझरेकर