कित्येक शहाणीसुरती माणसं या यंत्राच्या आहारी गेलेली आपल्याला दिसतात. हे यंत्र वापरणं वेगळं आणि त्याच्या आहारी जाणं वेगळं! हे का घडतं?
फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि सर्वप्रिय व्हॉट्सअॅप यामुळे आपण एकाच वेळी अनेकांशी जोडले जातो. हे भाऊबंद आपली खूपच कामं विनासायास करतात. इथपर्यंत सर्व काही ठीक आहे. समस्या सुरू होतात त्या यापुढे! समजा फेसबुकवर एका व्यक्तीने आपल्या लहानग्याचा फोटो टाकला आणि नंतर आठ दिवसांनी फेसबुक उघडलं असं होतं का? आपल्या लहानग्याचा फोटो कोणी पाहिला याबद्दल त्याच्या मनात उत्सुकता असते. या उत्सुकतेमुळे तो पुन्हा पुन्हा आपलं हातातलं काम सोडून फेसबुकवर जातो. या दरम्यान त्याच्या फोटोला बरेचसे लाइक्स मिळालेले असतात आणि या प्रत्येक लाइकमुळे त्याच्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं रसायन निर्माण झालेलं असतं. डोपामाइन हे मनाला आनंदी करणारं रसायन आहे. याच प्रकारचा आनंद पुन्हा निर्माण व्हावा, अशी डोपामाइनची मागणी असते आणि या कारणासाठी माणसांना लाइक्स बघायला आवडतात.
वास्तविक खऱ्या जीवनात या लाइक्सला काहीही महत्त्व नाही, हे तुम्ही-आम्ही सर्वजण जाणून आहोत. पण समाज-माध्यमांवर जे पायंडे सध्या पडले आहेत, त्यानुसार वागण्याचे काही संकेत ठरत आहेत. खऱ्या जीवनात आपण माणसांशी वागताना शिष्टाचाराचे संकेत पाळतो, ते इथेही पाळले जातात. ते पाळले गेले नाहीत तर गटातून बाहेर पडण्याचा धोकाही असतो. कारण काही माणसं सोशल मीडियावरच्या आयुष्याला खरं आयुष्य मानतात. इथे ते मेंदूची गफलत करतात.
लाइक दिले नाहीत म्हणून रागवायचं, त्याच्या मागे बोलायचं, लाइक्स मिळावेत अशी जाहीर अपेक्षा व्यक्त करायची हे सगळे गेल्या काही वर्षांत माणसांच्या वर्तनात झालेले बदल आहेत. नाहीतर ‘लोकहो! मला चांगलं म्हणा!’ असं याआधी कधी कोणी जाहीररीत्या म्हटल्याचं ऐकिवात तरी नाही. (निवडणुकीच्या वेळी असं म्हटलं जायचं आणि जातं. ) पण उमेदवार मंडळी सोडून मनातून कितीही इच्छा असली तरी सामान्यजनांना असं वाटणं त्यांच्या मनातच राहून जायचं. आता लोक मोकळेपणाने व्यक्त होतात आणि खुलेपणाने एकमेकांचं कौतुक करतात.
– डॉ. श्रुती पानसे
contact@shrutipanse.com