‘स्फोटक रसायने’ या दोन शब्दांत मोठा दबदबा आहे आणि भीतीपण आहे. अशा रसायनांमध्ये ठासून भरलेली सुप्त ऊर्जा आहे. ही ऊर्जा क्षणार्धात जर मुक्त झाली की आपण त्याला स्फोट म्हणतो. प्रकाश, आवाज, उष्णता आणि दाब, हे चार घटक स्फोटात असतात. एखाद्या पदार्थातील रसायनांमध्ये इंधनाबरोबरच ऑक्सिजनपण असतो.
ऑक्सिजन हा स्वत: जळत नाही, पण ज्वलनाला तो आवश्यक असतो. उदाहरणार्थ, नायट्रोग्लिसरीन या स्फोटकात इंधन आणि ऑक्सिजन असे दोन्ही आहेत. एखादे रसायन किंवा वायू दाबाखाली ठेवला आणि जर दाब दूर केला तर वायू अतिवेगाने बाहेर पडेल. एखाद्या रसायनाचा स्फोट घडवून आणण्यासाठी त्यावर जोरात दाब, घर्षण किंवा उष्णता द्यावी लागते. स्फोटक रसायनांमधील घटक हे स्फोट होता क्षणी एका सेकंदास दोन ते आठ किलोमीटर वेगाने प्रक्षेपित होतात.
जेव्हा एखाद्या स्फोटकातील घटकद्रव्ये आवाजाच्या वेगाने बाहेर फेकली जातात, तेव्हा त्यांना ‘हाय-एक्सप्लोसिव्ह’ (अत्यंत स्फोटक) म्हणतात. अशा रसायनांना सर्वसामान्य लोक घाबरून असतात. पण ही रसायने मोठय़ा प्रमाणात मानवी कल्याणासाठीच वापरली गेली आहेत. अशी उत्पादने सुरक्षितपणे हाताळायला मिळावीत म्हणून त्याबाबतचे कायदे कडक असतात. काडेपेटी आपल्या नित्य वापरात असते. काडी घासता क्षणी ती पटकन पेटून जळू लागते. त्यातील लाल फॉस्फरस, पोटॅशियम क्लोरेट, अँटिमनी सल्फाइड, सल्फर, जिलेटीन आदी रसायने वेगाने जळतात. दिवाळीतील शोभेच्या दारूमधील अग्निबाण, फटाके, चंद्रज्योती, भुईनळे, फुलबाजे यातील मजा आबालवृद्ध अनुभवतात. यात स्फोटक आणि अपायकारक द्रव्ये असतात. पण तरीही आपण ती उत्पादने वापरतोच. बंदुकीच्या दारूचा उपयोग गेली एक हजार वष्रे केला जातोय. कोळशाची पूड लगेच पेट घेते हे खूप पूर्वीपासून माहिती होते.
गेल्या दीडशे वर्षांत बऱ्याच उपयुक्त स्फोटक रसायनांचा शोध लागलाय. त्यांचा उपयोग आपल्याला रस्तेबांधणीसाठी, बोगदे खणून काढण्यासाठी, खनिज द्रव्यांची निर्मिती करण्यासाठी आणि कमकुवत इमारती पाडण्यासाठी होतो.
डॉ. अनिल लचके (पुणे) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
मनमोराचा पिसारा – गळ्याशी गाठ
जेम्स बॉण्डच्या चित्रपटात एकदा तरी ‘बॉण्ड’ गुंडाला लोळवून सहजपणे पार्टीत घुसण्यापूर्वी, ब्लेझरच्या लॅपेल आणि टायवरील धूळ झटकतो. दोन्ही हातांनी टायची (सैल न झालेली) गाठ सारखी करतो आणि आपण त्या गावचेच नसल्यासारखे चालू लागतो.
बॉण्डने टायची गाठ नीटनेटकी करणं हे त्याच्या रुबाबदार, प्रणयरम्य ‘डॅपर’ लुकचा ‘आयकॉन’ झालाय. टाय घालून रूप अधिक नेटकं होतं, लुक प्रोफेशनल दिसतो हा रूढ समज यातून अधिक पक्का होतो.
‘टाय’ची सुरुवात युरोपात क्रोएशियन युद्धाच्या काळातल्या सैनिकांनी सतराव्या शतकात केली. युरोपात युद्धानिमित्ताने बरीच देवाणघेवाण झाली. फ्रेंचांनी शर्टच्या कॉलरपाशी बांधायच्या या कापडाला अधिक नीटनेटकं केलं. गळ्याभोवती आवळलं. मग मुख्यत: लष्करातील सैनिक अधिकारी, पोलीस यांच्या गणवेशात त्याचा समावेश झाला. प्रारंभीच्या काळात टाय (मूळ स्वरूपात)चं काम गळ्यातल्या रक्तवाहिन्यांना काहीसं संरक्षण देणं असं होतं. गंमत म्हणजे टायनं गळा आवळला जातो आणि मेंदूला रक्तप्रवाह कमी होतो असंही वाटू लागलं. त्यामुळे त्या ‘टाय’चं स्वरूप बदललं. सध्या टाय ज्या स्वरूपात वापरला जातो त्याला ‘एस्क्वायर’ मासिकानं ‘टी’ म्हटलं आणि टायला प्रतिष्ठा प्राप्त झाली.
‘टाय’चा आणि टायच्या गाठींच्या प्रकाराचा अभ्यास आणि इतिहास रंजक आहे. खरं म्हणजे टायच्या फॅब्रिकचा मुलायमपणा आणि पोत यावर गाठींचे प्रकार अवलंबून असतात. त्यात ‘डिंपल’ नॉट वा आपल्याकडली समोसा नॉट सर्वात लोकप्रिय!
भारतासारख्या उष्ण प्रदेशात टाय वापरावा का? यावर बरीच शेरेबाजी होते. लोकांना आवडो नावडो सेल्समन, अधिकारी गळ्याशी टायची गाठ मारल्याशिवाय काम करू शकत नाहीत. हाच तो छाप पाडणारा, कामाशी एकनिष्ठतेचं प्रतीक म्हणून मान्य झालेला प्रोफेशनल लुक! साठच्या दशकात टाय ४।। ते ५ इंच रुंद होते आणि आखूडही होते, त्यावर जरा बटबटीत डिझाइन असायची. सत्तरच्या दशकात रुंदी अर्धा ते एक इंचाने कमी झाली आणि टाय कलरफुल झाली. टाय पोटावरच्या पट्टय़ापर्यंत आले ते तिथेच रेंगाळले. टायवर ऐंशीच्या दशकात कार्टूनची चित्रं आली. पुढे त्यावर डिझायनर रंग आले. व्हॅन गॉची चित्रं दिसू लागली. असे बरेच प्रयोग झाले. नव्वदीच्या दशकात आणि २००० च्या पहिल्या दशकात टाय बऱ्यापैकी आउट ऑफ फॅशन झाला. आता पुन्हा ट्रेण्ड येतोय. जपान, कोरिया, चीन, सिंगापूरमध्ये टाय (नो डिझाइन) अतिशय कॉमन आहे.
आपल्या देहयष्टीप्रमाणे टाय निवडावा. मध्यम बांध्याच्या किंचित रुंद खांद्याच्या पुरुषांना टाय शोभून दिसतो. कृश अथवा जाड व्यक्तींना टाय शोभून दिसण्यासाठी फार चोखंदळ असावं लागतं. उंच माणसांना टाय शोभत नाही, तसाच पोट सुटलेल्यांनाही नाहीच.
टाय निवडताना आपल्या त्वचेच्या रंगाचा, शर्ट-पँटच्या रंगाचा विचार करावा. पेस्टल शेडमधील पूर्ण बाह्य़ांच्या शर्टवर त्यातल्या गडद रंगाचा टाय उत्तम दिसतो. काँट्रास्ट टाय तिशीपर्यंत ठीक (उदा. पिवळ्यावर निळा) स्ट्राइप्स (डावीकडून उजवीकडे) स्टार्स, सूक्ष्म बुंदके टाय ‘फॉर्मल’ वेशासाठी, फ्लोरल डिझाइनचा टाय पार्टीसाठी असावा. काळा टाय कमरबंदबरोबर संध्या. ७ ते ९ मध्ये आणि पांढरा शुभ्र टाय फक्त खास फॉर्मलसाठी.. टायवर बरंच काही- अखेर मोरानंदेखील गळ्याभोवती मोरपंखी पट्टा घातलेलाच आहे ना!
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com
प्रबोधन पर्व – सज्जनांचे स्तोम, साधुत्वाचा डंका
‘‘मनाचा आरसा खोल शरीरांत दडविला न जातां जेव्हां शरीराच्या वर प्रत्यक्ष दिसत असे, तेव्हांचें जें युग त्याला सत्य युग असें म्हणत असत. कारण, त्या वेळीं असत्याला दडण्याला कोठें जागाच मिळत नसे. त्या वेळीं कोठें अंधार नव्हता, किंवा कोठें तळघरें नव्हतीं, किंवा पर्वतांना गुहा नव्हत्या, किंवा जंगलातून दाट झाडी नव्हती, असें नाहीं. जेथें असत्याला दडून बसतां येईल, अशीं पुष्कळ ठिकाणें त्या वेळींही होती. पण असत्याचें मूळचें आणि मुख्य दडण्याचें हल्लीचें ठिकाण म्हटलें म्हणजे मन होय. तेथें त्याला आश्रयाला निवाऱ्याची आणि गुप्ततेची जागा पूर्वी मुळींच मिळत नसल्याकारणानें अर्थातच बाकीच्या बाह्य़ गुप्त जागा ओसाड पडलेल्या होत्या.. अशी स्थिती असल्यामुळें कोणीही असत्याला आपल्या मनामध्यें आश्रय देत नसे. आणि त्यामुळें तें युग अगदी अक्षरक्ष: सत्ययुग झालेले होते.’’ ‘काळ’कर्ते शि. म. परांजपे ‘मनाची मीमांसा’ या लेखात मनाची गुप्तता आणि दृश्यरूपता याचे परिणाम सांगताना पुढे लिहितात-
‘‘तें सत्ययुग होतें; पण त्यांत विशेष नांवाजलेले असे साधुपुरुष कोणीच नव्हते. हें विधान पाहून कोणालाही आश्चर्य वाटल्यावांचून राहणार नाहीं.. परंतु याचें कारण अगदीं निराळें आहे. सगळेंच लोक जेव्हां अतिशय दुर्जन असतात, तेव्हां त्यांच्याच पैकीं जे कांहीं थोडेसे लोक थोडे कमी दुर्जन असलेले आढळतात, त्यांना हल्लींच्या काळात साधू म्हणून म्हणण्याचा परिपाठ पडलेला आहे. दुर्गुणांच्या शर्यतीमध्यें आघाडी मारण्यासाठीं आणि बक्षीस मिळविण्यासाठीं सगळे घोडे भरधांव पळत सुटलेले असतांना दुर्गुणांच्या बाबतींत जे मागासलेले असतात, ते साधू, सत्पुरुष आणि सज्जन या नांवाखाली मोडतात, परंतु पूर्वी सत्ययुगांत जेव्हां सगळीकडे सत्यच भरलेलें असे, आणि असत्याला दडावयाला मनामध्यें बिलकूल जागाच मिळत नसे, तेव्हां तेथें सज्जन आणि दुर्जन हे भेदच उत्पन्न होत नसत. सगळेच जेथें सज्जन, तेथें एका सज्जनाचें स्तोम माजविण्याला आणि त्याचा साधुत्वाबद्दल डंका वाजविण्याला दुसरा कोणता सज्जन तयार होणार आहे?’’