शेतीचे सिंचन करण्यासाठी आपण वापरतो ते पाणी योग्य आहे की नाही, हे त्या पाण्यातील ‘सार’ (एसएआर ‘म्हणजेच ‘सोडियम अॅबसॉप्र्शन रेश्यो) हा घटक मोजला की कळते. म्हणजेच सोडियमचे अन्य धन आयनांशी असलेले प्रमाण. जमिनीत सोडियम इतर धन आयनांच्या तुलनेत जास्त झाल्यास, सार वाढतो व जमिनीचा पोत खराब होतो. पिकासाठीही ते हानीकारक ठरते.
मातीचे पाण्यात द्रावण बनवून त्यातील आयनांचे प्रमाण मोजून सार काढतात. सार जेव्हा १५ पेक्षा जास्त होतो, तेव्हा झाडांची पानगळ होते, त्यांना पाणी मिळत नाही, वाढीसाठी आवश्यक द्रव्ये मिळत नाहीत. माती ओली असल्यावर मऊ बनते आणि वाळल्यावर अगदी कठीण बनते. एकंदरीतच, जमीन रचनाविरहित होते. अशा जमिनीत हवा खेळती राहत नाही. मातीतील पाण्याचा योग्य निचरा होत नाही. झाडांच्या मुळांना हानी पोहोचते.
सारनुसार जमिनीचे चार प्रकार करतात (सार १० पेक्षा कमी, १० ते १८, १८ ते २६ आणि २६ पेक्षा जास्त). सार या घटकाचा परिणाम जमिनीच्या प्रकारानुसार बदलतो, हे उपाययोजना करताना लक्षात घ्यावे लागते. सार जास्त असलेली जमीन पिकांना लागवडीयोग्य करण्यासाठी जमिनीत जिप्सम (कॅल्शियम सल्फेट) टाकतात. त्यामुळे जमिनीत कॅल्शियम वाढून सार कमी होतो.
वनस्पतीच्या शरीरात जिप्समची क्रिया, पाणी व क्षारांचे प्रमाण, क्षार गाळण्याची वनस्पतीची क्षमता, सभोवतालची परिस्थिती अशा अनेक बाबींवर जिप्समचे प्रमाण ठरवतात. ‘सभोवतालची परिस्थिती’ याचा अर्थ हा की, शेती करण्यासाठी नसíगकरीत्या वाढणाऱ्या, खोल मुळे असलेल्या झाडाझुडुपांचे उच्चाटन केले असेल, तर पिकाच्या मुळाशी क्षारांचे प्रमाण वाढते. हे क्षार पाण्याबरोबर पिकाच्या शरीरात जात असतात. सारचे नियंत्रण करताना हे लक्षात घेतात.
समुद्राच्या पाण्यातही काही वनस्पती वाढतात. याचाच अर्थ, पाण्यातील सार जास्त असतानासुद्धा त्या स्थितीशी सामना करू शकणाऱ्या वनस्पतीची, पिकाची जात असू शकते. त्यामुळे रसायने वापरून सार दुरुस्त करण्यापेक्षा पिकाची कोणती जात वापरून आपण सारचे नियमन करू शकतो, याचा अभ्यास व्हायला हवा.
– उपेंद्र कुलकर्णी (नांदेड) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा