तृणधान्य प्रकारामध्ये जगात गव्हाचा अग्रक्रम लागतो. वर्षांच्या प्रत्येक महिन्यात जगात कुठेना कुठे तरी गहू काढणीला आलेला असतोच. माणसाची शेती कदाचित गव्हापासूनच सुरू झाली असावी. पुरातत्त्वशास्त्रानुसार, कार्बनीभवन झालेले गव्हाचे प्राचीन दाणे इराकच्या पूर्व भागात जार्मो या ठिकाणी उत्खननात सापडले. पुराशास्त्रज्ञ ब्रेडवुड यांना हे ६७०० वर्षांपूर्वीचे ठिकाण सापडले. तेच ठिकाण शेतीचे मूळ ठिकाण असावे, असे शास्त्रज्ञांना वाटते. अर्थात याला भारतीय वेदकालीन शेतीचा अपवाद असेल.
जार्मोत दोन गहू प्रकार दिसले. एकाचे साधम्र्य जंगली गव्हाशी, तर दुसऱ्याचे आधुनिक प्रकाराशी आहे. जंगली जाती आजही अतिपूर्व भागात सापडतात. या दोन्ही प्रकारांत गेल्या सात हजार वर्षांत फार मोठे बदल झाले नाहीत. गव्हाचा आणि मानवी संस्कृतीचा विकास हातात हात घालून झाला. गहू भाजून खाण्यासाठी वापरत. जार्मोच्या उत्खननात प्राचीन भट्टय़ांचे अवशेष सापडले. जास्त भाजल्यामुळे जळालेले गव्हाचे पुरातन नमुने तिथे मिळाले. प्राचीन काळी कोंब्यांपासून गहू वेगळे करण्यासाठी फक्त भाजण्याची पद्धतच वापरात होती. त्यानंतर गहू दळणे, शिजवणे या क्रिया सुरू झाल्या.
भारतीय गव्हाला प्रदीर्घ इतिहास आहे. मोहोंजोदडोमध्ये गव्हाचे नमुने सापडले. ते ट्रिटिकम एक्टिव्हियम या प्रजातीच्या स्पॅराकुकम या उपजातीचे होते. सात गुणसूत्र संख्या असलेल्या मूळच्या गवती पूर्वजांपासून एकवीस गुणसूत्र संख्येच्या विकसित गव्हाचा उत्क्रांतीचा प्रवास मनोरंजक आहे.
सात गुणसूत्रांच्या मूळच्या गव्हाच्या जातीचा तेवढय़ाच गुणसूत्रांच्या गवताच्या जातीशी संकर घडला. त्यातून जंगली ऐनकॉर्न व ऐनकॉर्न या दोन जाती तयार झाल्या. त्यांचे नमुने जार्मोत मिळाले. दोन्ही जातींत लोंब्यांमध्ये एकेकच दाणा असतो, म्हणून नाव ऐनकॉर्न (ऐन= एक). त्यांच्या परस्पर संकरातून गव्हाच्या कणखर, गुणवान जाती तयार झाल्या.
जंगली ऐनकॉर्नचे मूळ केंद्र त्या वेळच्या रशियातले जॉर्जयिा. पॉल मॅगलसडॉर्कच्या मते, त्याचा प्रसार प्रथम पूर्व इराकमध्ये झाला. जलाशयांजवळच्या वस्त्यांमध्ये युरोपातही ते मिळाले. याच काळात इंग्लंड व आर्यलडमधील प्राचीन खापरांवर त्याचे ठसे दिसले. आजही युरोपच्या आणि मध्यपूर्वेच्या काही भागात ऐनकॉर्नची शेती केली जाते.
-डॉ. क. कृ. क्षीरसागर (पुणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई२२ office@mavipamumbai.org
आजचे महाराष्ट्रसारस्वत
१९१९ : एकाच वेळी काव्य, नाटय़ आणि विनोद या तिन्ही क्षेत्रांत मुशाफिरी करणारे भाषाप्रभू साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे निधन. एकच प्याला, राजसंन्यास आदी त्यांची नाटके आजही सादर केली जातात. ‘गोविंदाग्रज’ या नावाने त्यांनी काव्यलेखन केले, ‘राजहंस माझा निजला’सारखी उत्कट कविता लिहिली.. ‘बाळकराम’ तसेच ‘सवाई नाटकी’ या टोपणनावांनी त्यांनी विनोदी लेखनही भरपूर केले.
१९२० : व्यासंगी लेखक व अनुवादक श्रीपाद रघुनाथ जोशी यांचा जन्म. इंग्रजी, ऊर्दू, बंगाली, गुजराती आदी भाषांतील उत्कृष्ट साहित्य त्यांनी मराठीत आणले.
१९२७ : ‘कुंचले आणि पलिते’, ‘मार्मिक चिरफाड’, ‘पंचम मुंबई’ आदी पुस्तकांचे कर्ते, मार्मिक या व्यंगचित्र-साप्ताहिकाचे आणि सामना या दैनिकाचे संस्थापक-संपादक बाळ केशव ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म. व्यंगचित्रकार आणि वक्ते या नात्यांनी ते अधिक परिचित होते, तर शिवसेनाप्रमुख ही त्यांची ओळख सर्वाधिक वादळी होती.
संजय वझरेकर
जे देखे रवी.. संगणकाचे युग
तथाकथित अपयशी लोकांना हुरूप यावा, म्हणून एक आठवण सांगतो : तीनेक वर्षांपूर्वी भारतातल्या प्लास्टिक सर्जन मंडळींच्या राष्ट्रीय संस्थेने मला जीवनगौरव पुरस्काराने भूषविले. एकेकाळी प्लास्टिक सर्जरीच्या एका परीक्षेत नापास झाल्यामुळे ज्या संस्थेने मला सभासदत्व नाकारले होते, त्या संस्थेकडूनच हा पुरस्कार होता. या निमित्ताने माझ्या एका निराळय़ा कामाची सुरुवात मात्र झाली.. मला त्या संस्थेच्या ज्या परिषदेत पुरस्कार देण्यात आला, त्याच परिषदेत टोनी वॉटसनला सन्माननीय सदस्यत्व देण्यात आले..हा टोनी म्हणजे, मी इंग्लंडमधल्या मासिकात पूर्वी लिहीत असे, तेव्हा जे दोघे संपादक लाभले त्यापैकी दुसरा- वयाने माझ्यापेक्षा एखाददोन वर्षांनी मोठा. या परिषदेत आम्हा दोघांचाही सन्मान व्हावा हा योगायोगच. त्या निमित्ताने आम्हा दोघांची दीर्घ भेट झाली, गप्पा झाल्या आणि आमच्या व्यवसायाविषयी जो बदल आम्हा दोघांनाही जाणवत होता, त्याची कबुली आम्ही परस्परांना दिली. तंत्रज्ञानामुळे आणि समाजातील सुखलोलुपतेमुळे प्लास्टिक सर्जरीचे स्वरूप आता पूर्णपणे बदलले आहे, ही ती कबुली.
मी त्याला म्हटले, ही महिरप चढली असेलही, पण मूळ गाभा काही बदललेला नाही. तेव्हा त्यावर लिहिले पाहिजे.. मी लिहितो; तू संपादन कर! पूर्वी ऐंशीच्या दशकात मी तुला पोस्टाने निबंध पाठवत असे, आता संगणकाने आदानप्रदान क्षणार्धात होते. ठरले आणि मी लिहू लागलो..प्रस्तावनेतच म्हटले होते : प्लास्टिक सर्जरीचा जनक सुश्रुत, भारतीय, असा डंका आपण पिटतो, पण गेल्या दोन-अडीच हजार वर्षांत भारतात त्या विषयाचे एकही मातबर पुस्तक निघालेले नाही, म्हणून आता संगणकाच्या युगातला हा प्रयत्न मी करत आहे..पुस्तक संगणकविश्वातच राहील.. छापले जाणार नाही, आणि त्यातील मजकूर आणखी समृद्ध करण्यासाठी सर्वानी मदत करावी. ‘शॉर्टनोट्सइनप्लास्टिकसर्जरी.वर्डप्रेस.कॉम’ या ब्लॉगस्थळावर हे पुस्तक वाचता येते. गेल्या काही महिन्यांतच ५० हजार जणांनी या पुस्तकाचे ब्लॉगस्थळ पाहिले आहे.
संगणक आणि पुस्तके यांवरून पुन्हा ‘शरीररचना’ या विषयाकडे येऊ.. शरीररचना शास्त्राचे महाभारत ठरलेले एक पुस्तक मी हल्लीच पुन्हा विकत घेतले. याची पहिली आवृत्ती १८५८ सालची, पुस्तकाचे नाव ‘हेन्री ग्रे चे शरीररचना शास्त्र’..त्याची १५०व्या वर्षांतली प्रत मी विकत घेतली.. माझ्याकडे आधीपासून असलेल्या, सुमारे ५५ वर्षांपूर्वीच्या प्रतीपेक्षा ही प्रत अगदी वेगळी होती. जमीनअस्मानाचा फरक. शरीर तेच, परंतु त्याकडे बघण्याची दृष्टी पूर्णपणे बदलली आहे.. ही नवी प्रत संगणकयुगातली आहे..आमचे शरीररचना शास्त्राचे प्राध्यापक काळे जसे शिकवत, त्याची आवृत्ती या नव्या प्रतीत उमटली असल्याचे स्पष्ट दिसते!
रविन मायदेव थत्ते
वॉर अँड पीस कावीळ : बहुपित्त कामला
कावीळ या विकाराने आपल्या भारतात मोठे थैमान मांडले आहे. कावीळ या विकाराचे अनेक प्रकार आहेत. अशी कावीळ तुलनेने कमी आढळते. शरीरात सर्वत्र पित्त वाढल्यामुळे; नखे, डोळे, त्वचा, लघवी, शौच सर्वाना पिवळेपणा असतो. तीव्र विकारात लघवीचा रंग लाल, त्वचा पांढरीफटक, भूक मंद, मलप्रवृत्ती अनियमित, विलक्षण कंड व इच्छेचा लय असतो. खूप तिखट, आंबट, खारट, तीक्ष्ण, उष्ण पदार्थ नियमाने खाण्यात येणे; जागरण, चिंता, उन्हात हिंडणे, धूम्रपान व मद्यपानाचा अतिरेक; कळत नकळत चुकीची व मोठय़ा मात्रेने तीव्र औषधे घेणे; दही, लोणचे, पापड, मिरची, मांसाहार, शिळे अन्न यांचा बेसुमार वापर अशी कारणे घडतात. या विकारात यकृत किंवा पांथरीला सूज असतेच असे नाही.
खूप औषधे घेण्याऐवजी घरी ऊस आणून केलेले तुकडे, बी असणाऱ्या काळय़ा तीस-चाळीस मनुका, साळीच्या (भाताच्या) वा राजगिऱ्याच्या लाहय़ा, शहाळय़ाचे वा धन्याचे पाणी, कोरफडीच्या एका पानाचा ताजा गर यापैकी शक्य असेल ते घ्यावे. आर्थिक परिस्थिती चांगली असल्यास मौक्तिक भस्म ५०० मि.ग्रॅ. या हिशेबात तीन-चार वेळा घ्यावे. प्रवाळ, कामदुधा, चंदनादीवटी प्रत्येकी तीन गोळय़ा दोन वेळा गाईचे दुधाबरोबर घ्याव्या. मलप्रवृत्ती साफ होत नसल्यास त्रिफळाचूर्ण किंवा गंधर्वहरीतकी चूर्ण घ्यावे. कोठा हलका असल्यास साय काढलेले गाईचे वा म्हशीचे दूध घ्यावे. कोठा जड असल्यास बाळहिरडा, बाहवा-मगज, गुलाबकळी, ज्येष्ठमध व काळय़ा मनुका यांचा काढा द्यावा.
नियमितपणे डोळे, नखे, त्वचा, लघवी व मळ यांचे परीक्षण रंग, वास व प्रमाण याकरिता कटाक्षाने करावे. काविळीचे उपचार चालू असताना लघवीचे प्रमाण कमी होत नाही ना याकडे लक्ष ठेवावे. लघवीचे प्रमाण कमी होत असल्यास चंदनखोड उगाळून त्याचे गंध घ्यावे. लघवीची आग होत असल्यास, तिडीक मारत असल्यास नागरमोथा, चंदन, सुंठ, पित्तपापडा, वाळा व धने प्रत्येकी पाच ग्रॅम, पाणी १ लि. एकत्र उकळून अर्धा लीटर उरवून दिवसभर प्यावे.