पाणी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे म्हणूनच पाण्याला आपण जीवन म्हणतो, पण शेवटी पाणीसुद्धा एक रासायनिक संयुग आहे. दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन मिळून बनतो पाण्याचा रेणू. त्याच्या अनेक भौतिक आणि रासायनिक गुणधर्माचा उपयोग आपल्या शरीरातील चयापचयाच्या क्रियांसाठी होत असतो.
आपले शरीर ६५% पाण्याने बनलेले आहे. मेंदूतील गुंतागुंतीच्या क्रिया पाण्याशिवाय पार पडूच शकत नाहीत. त्याचप्रमाणे हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड, यकृत इत्यादी इंद्रिये केवळ पाण्यामुळेच कार्यरत राहतात. पाण्याशिवाय पचनसंस्था, श्वसनसंस्था कामच करू शकणार नाहीत. पाणी शरीराच्या चलनवलनासाठी वंगणाचे काम करते.
बाष्पीभवनाच्या गुणधर्मामुळे पाणी आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करते. पाणी रक्ताचा पातळपणा आणि प्रवाहीपणा कायम ठेवून रक्तदाब तसेच कोलेस्ट्रोल नियंत्रित करते. पाण्यामुळे आपल्या प्रत्येक पेशीला अन्न आणि ऑक्सिजन पुरवला जातो. कार्बन डायऑक्साइड, इतर उत्सर्जति पदार्थ तसेच टॉक्सिन्स पाण्यामुळेच शरीराबाहेर फेकले जातात. शौच, लघवी, घाम वगरे मार्गानी साधारणत: दिवसाकाठी २ ते ३ लिटर पाणी शरीराबाहेर पडत असते. हवामान आणि कामाच्या स्वरूपानुसार यात बदल होऊ शकतो. याची भरपाई केली नाही तर शरीरात पाण्याची कमतरता जाणवू लागते. अचानक थकवा जाणवणे, डोके दुखणे, सांधेदुखी, लक्ष न लागणे अशी लक्षणे पाण्याच्या कमतरतेने होऊ शकतात. पाणी कमी झाले तर शोष पडतो. अशा वेळेला फळांचे रस, शीतपेये पिण्याने शरीराचा शोष आणखी वाढू शकतो. कारण की, ही पेये आपल्या शरीरातील द्रव्यांपेक्षा अधिक दाट असतात. म्हणून शक्यतो अशा वेळी फक्त पाणीच प्यावे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाण्याचे अतिप्राशनदेखील घातक ठरू शकते. रक्तातील सोडियमची पातळी कमी होऊन स्नायूची हालचाल आणि मज्जातंतूच्या स्पंदनावर वाईट परिणाम होऊ शकतो. तेव्हा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी स्वच्छ पाणी पिणे अतिशय महत्त्वाचे आहे.
डॉ. कमलेश कुशलकर , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
मनमोराचा पिसारा – रिमोट आपल्या हाती
आपलं आरोग्य आणि सुखी जीवन याचा कंट्रोल कोणाच्या हाती? आरोग्य आणि सुखी वाटणं या गोष्टी दैवजात आहेत? ग्रहमानावर किंवा कोणत्या तरी अज्ञात शक्तीवर अवलंबून आहेत? आपला कंट्रोल रिमोट की आपल्याच हातात ना? हे प्रश्न केवळ तत्त्वज्ञानात्मक नाहीत. ते समाजजीवन-मानसशास्त्रालाही खुणावणात.
पराधीनतआणि स्वाधीनतेची जाणीव माणसाला बळ देते काअसे अनेक आव्हानात्मक प्रश्न घेऊन त्यांचा छडा लावण्यासाठी प्रायोगिक नमुना (एक्स्पेरिमेंटल मॉडेल) कनेक्टिकट येथील मानसशास्त्रज्ञांनी १९७६ साली प्रथम मांडला. नंतर शास्त्रीय पद्धतीनुसार त्याचा पडताळा घेण्यासाठी अनेक ठिकाणी त्या नमुन्याचे थोडय़ाफार फरकाने, वाढीव कालावधीसाठी प्रयोग झाले.
एलन लँगर व ज्युडी रोदँ यांनी आर्डेन हाऊस नावाच्या वृद्धाश्रमात हा निरीक्षणात्मक प्रयोग राबवला. ६५-९० वयाच्या रहिवाशांचा निवास दोन स्वतंत्र मजल्यांवर होता.
पहिल्या मजल्यावरील मंडळींना तिथल्या सुपरवायझरने मीटिंग घेऊन सांगितले की, प्रत्येक व्यक्तीला एक कुंडीतलं झाड देण्यात येईल. या झाडाची काळजी तिथल्या परिचारिका घेतील. गुरुवारी/शुक्रवारी एखादा सिनेमा दाखवू. बाकी नेहमीच्या घडामोडीची परवानगी आहे, म्हणजे वाचन, टीव्ही इतर मजल्यांवर जाणं-येणं इ. त्या मजल्यावरील रहिवाशांच्या ‘वेल बीइंग’ची काळजी ही स्टाफची जबाबदारी.
दुसऱ्या मजल्यावरील रहिवाशांना झाडाची कुंडी निवडण्याचं स्वातंत्र्य होतं. झाडाची देखभाल करण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची. त्यांनाा्र सिनेमा बघण्यासाठी गुरुवार किंवा शुक्रवार निवडायचं स्वातंत्र्य होतं. इतर मजल्यांवर केव्हा जायचं, काय वाचायचं, पाहायचं हे निवडण्याची त्यांना मोकळीक होती.
प्रयोग करणाऱ्या विशारदांच्या मते दुसऱ्या मजल्यावरील रहिवाशांना आपापलं आयुष्य नियंत्रित करण्याचं स्वातंत्र्य होतं पण ते तसं नोशनल प्रतीकात्मक होतं. परंतु आपल्याला निवड करण्याची मुभा आहे, झाडाची काळजी घेण्याची जबाबदारी आहे पण ते निभवण्याचं स्वातंत्र्य आहे. याची त्या रहिवाशांना जाणीव होती. या स्वातंत्र्यातून करायच्या गोष्टीही खूप विशेष होत्या असं नाही. पण ‘तुमच्या आनंदी जीवनाचा रिमोट तुमच्या हाती’ असा एहसास त्यांना देण्यात आला. वृद्धाश्रमाच्या स्टाफने दोन्ही ग्रुपमधल्या मंडळींशी अगदी सारखीच वर्तणूक ठेवली.
या प्रयोगातून उद्भवलेली निरीक्षणे फार बोलकी होती. तीन आठवडय़ांनी पाहणी केल्यानंतर ज्यांच्या हाती आनंदी जीवनाचे रिमोट होते अशा मंडळींपैकी ९० टक्क्यांची प्रकृती सुधारली तर ७० टक्के पराधीन मानवपुत्रांची तब्येत बिघडली होती! सहा महिन्यांनी याच पराधीनांमधील मृत्यूसंख्या दुसऱ्या स्वाधीन ग्रुपपेक्षा जास्त होती.
मित्रा, या दोन गटांमधील व्यक्तींमध्ये फरक होता तो फक्त मनोवृत्तीमध्ये. केवळ आपण स्वतंत्र आहोत, हवं ते निवडू शकतो या गोष्टीची जाणीव होती. पुढे या प्रयोगाचे बरेच पडसाद उमटले. काही ठिकाणी अशाच प्रयोगांत ‘स्वाधीन’ ग्रुपचे स्वातंत्र्य कालांतराने मर्यादित केले तेव्हा त्यांच्या तब्येती स्वत:ला पराधीन मानणाऱ्या लोकांसारख्या ढासळल्या. मानसशास्त्रानं फक्त निरीक्षण न करता परीक्षण आणि प्रयोगक्षमतेचा मार्ग निवडलाय. यातून एका नव्या संज्ञेची निर्मिती झाली. ‘प्रशिक्षित आशावाद!’ (लन्र्ड ऑप्टिमिझम) अनुभवसिद्ध आशावाद..
विचारस्वातंत्र्याच्या आधारे निवडलेला आनंदमार्ग!!
मनमोराचा पिसारा फुलतो तो असा.. होय ना?
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com
प्रबोधन पर्व – आचार हेंच प्रचाराचें एकमात्र साधन
‘‘..आकाशाला गवसणी घालणाऱ्या मोठय़ा मोठय़ा ‘कल्पना’ आम्हास सुचतात; पण साधे सरळ सोपे इलाज सुचत नाहीत. कोणत्याहि प्रश्नाचा आंतून विचार न करता बाहेरून विचार करण्याची आम्हाला सवयच लागत चालली आहे. गांठ सोडायची म्हणजे आंतून उकलावी लागते, बाहेरून ओढाताण करण्याने ती सुटण्याऐवजी अधिकच मजबूत होऊन बसते, हें आम्हास समजत नाही. आशिया खंडाचें ऐक्य करण्याची कल्पना आम्ही शोधून काढतो, पण आपल्या मनातला क्रोध जिंकण्याला आम्हाला वेळ मिळत नाही. कोणतीहि गोष्ट जगाला कशी लागू करावी ह्य़ाची ‘स्कीम’ करण्यात आम्ही डोकें खर्च करतो. पण आपल्या स्वत: ला ती लागू करण्याचें मात्र अचूक विसरतो. व्हावयास पाहिजे ह्य़ाच्या उलट. जो गोष्ट जगाला लागू करावी असें आपणास वाटतें, तिचा अमल आपण स्वत: ताबडतोब सुरू केला पाहिजे. आचार हेंच प्रचाराचें एकमात्र साधन आहे.’’ असे सांगत आचार्य विनोबा भावे पुढे म्हणतात – ‘‘काम करायला माणसें नाहीत’ असें म्हणणारी ‘माणसें’ ठिकठिकाणी आढळतात. जो तो स्वत:ला मोजण्याचें सोडून देतो आणि हिशोब करायला बसतो. त्यामुळे कामाचा काहीच मेळ बसत नाही. स्वत:ला वगळून विश्वाचें कोडें सोडविण्याची खटपट फुकट आहे. त्याने हाताला काहीच न लागता माणूस नुसता गांगरून जातो. अर्जुनाला विश्वरूप-दर्शनाची हौस वाटली होती. भगवंतांनी ती हौस चांगलीच पुरविली. बिचाऱ्याने पुन्हा विश्वरूप-दर्शनाचें नांव काढलें नाही.. स्वरूप-दर्शन हेंच विश्वरूप-दर्शनाचें उत्तम साधन आहे. स्वरूप-दर्शन मध्यबिंदूसारखें म्हटलें तर विश्वरूप-दर्शन परिधीसारखें आहे. मध्यबिंदू पकडून ठेवल्याशिवाय परिधि हातीं लागावयाचा नाही. जोंपर्यंत मी अहिंसक बनलो नाही, तोंपर्यंत जगाला मी अहिंसक बनवू शकेन काय?.. मान्टेस्क नांवाच्या फ्रेंच ग्रंथकाराने फ्रेंचांच्या प्रचारक वृत्तीविषयी एके ठिकाणीं असें म्हटलें आहें ‘दुसरीकडचे लोक आपल्याला माहीत असलेले विषय शिकवितात त्यात काही नवल नाही. पण फ्रेंच लोक आपल्याला माहीत नसलेले विषय शिकविण्यात प्रवीण आहेत!’’