बाजरी हे आशिया आणि आफ्रिका खंडातील गरिबांचे महत्त्वाचे पूरक अन्न. भाकरी, रोटी, रोटली अशा नावांनी चवीने खाल्ली जाणारी बाजरीची भाकरी संक्रांतीला तीळ लावून अधिक चविष्ट बनविली जाते. आफ्रिकेत आणि आपल्या आंध्रप्रदेशात बाजरीचे दाणे उखळात कांडून, तिची साल काढून मग दळतात. त्या पिठाचे आंबवून धिरडे करतात. दक्षिणेत बाजरी शिजवून भात तयार करतात. खीर आणि खिचडी हे बाजरीचे आणखी दोन प्रकार.
मूळ उष्णकटिबंधीय आफ्रिकेतील बाजरी अरब लोकांनी भारतात आणली. तिची भारतातील एक नोंद ख्रिस्तपूर्व २००० वर्षांची आहे. भारतातून तिचा प्रवास चीनमध्ये आणि दक्षिण आशियाच्या पूर्व भागात झाला. आता जगातील २,६०,००० चौरस किलोमीटर कृषीक्षेत्र बाजरीने व्यापले आहे.
बाजरा, कुम्बू (तमीळ), रवाज्जे (कन्नड), सज्जालू (तेलगू) अशा अनेक नावांनी बाजरी परिचित आहे. अमेरिकेत तिला ‘कॅटटेल’ (कणसाचा मांजरीच्या शेपटीसारखा आकार असल्याने) किंवा ‘र्बगडी मिलेट’ या नावांनी ओळखतात. अमेरिका, कॅनडा, ब्राझील, ऑस्ट्रेलिया व युरोपातसुद्धा बाजरीची लागवड होते. गुरांचा चारा म्हणून तिचे जास्त महत्त्व आहे. बाजरीचे दाणे पाळीव पक्षी, कोंबडय़ा, डुकरे यांना खायला घालतात. बाजरीतील प्रथिनांमुळे अन्नाचा पोषक गुणधर्म वाढतो.
उसाप्रमाणे गोडवा असलेल्या बाजरीच्या वाणाची निर्मिती तमीळनाडूतील कोइम्बतूरच्या शास्त्रज्ञांनी केली आहे.
बाजरीचे चार प्रकार आढळतात : टायफॉयडियस (भारत, आफ्रिका), नायगाटूरम (आफ्रिका), ग्लोबोसम (आफ्रिका), लिओनिस (आफ्रिकेची किनारपट्टी).
आधुनिक बाजरीचे शास्त्रीय नाव आहे ‘पेनिसेटम अमेरिकॅनम’. यापूर्वीची नावे होती ‘पेनिसेटम ग्लॉकम’, ‘पेनिसेटम टायफॉयडीयम’ आणि ‘पेनिसेटम टायफॉयडियस’.
प्राचीन यजुर्वेदीय संहितांनुसार, बाजरी गटाला ‘श्यामका’ नावाने ओळखले जाई. कदाचित तिच्या काळ्या रंगामुळे असेल. स्वित्र्झलडमध्ये इटालियन मिलेट (सेटारिया इटालिका) हा प्रकार प्राचीन काळापासून आढळतो. ख्रिस्तपूर्व २७०० साली चीनमध्ये तिची प्रथम लागवड झाली असावी. कच्छमधील सुकोटाड येथील उत्खननातून ती ख्रिस्तपूर्व १३००मध्ये भारतात होती, असे अनुमान निघते. आता मक्याच्या आगमनाने बाजरीची खूप पीछेहाट झाल्याचे दिसते. मका वस्त्रोद्योगात, औषधनिर्मितीत आणि इंधननिर्मितीत मोठय़ा प्रमाणात वापरला जातो. गरिबांच्या धान्यावर यामुळे आपत्ती ओढवली आहे.
– डॉ. क. कृ. क्षीरसागर (पुणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ ऋऋ्रूी@ें५्रस्र्ंे४ेुं्र.१ॠ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा