अठराव्या शतकापर्यंत फक्त बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनी हेच पाच ग्रह माहीत होते. त्यांच्या आकाशातील सरकण्याच्या वेगावरून शनी ग्रह हा पृथ्वीपासून सर्वात दूर असल्याचे मानले गेले होते. शनीच्या पलीकडेही एखादा ग्रह असू शकतो, अशी शक्यताही तेव्हा कोणाला वाटली नसावी. त्यामुळे दुर्बीण आकाशाकडे रोखली जाऊनही, शनीपलीकडच्या ग्रहाचा शोध लागण्यास त्यानंतरची पावणेदोनशे वर्षे जावी लागली.
विल्यम हर्शल हा हौशी इंग्लिश खगोल-अभ्यासक आपण स्वत: बनवलेल्या दुर्बणिींद्वारे आकाशनिरीक्षण करत असे. इ.स. १७७९ सालापासून त्याने आपले लक्ष आकाशातील जोडय़ांच्या स्वरूपात असणाऱ्या ताऱ्यांच्या शोधावर केंद्रित केले होते. सुमारे १५ सेंटिमीटर व्यासाचा आरसा असणाऱ्या आपल्या दुर्बणिीतून त्याला दिनांक १३ मार्च १७८१ रोजी वृषभ तारकासमूहात एक मेघसदृश, पसरट िबब असलेली वस्तू दिसली. चार दिवसांच्या निरीक्षणांत ती वस्तू सरकत असल्याचे हर्शलच्या लक्षात आल्याने, हा एक धूमकेतू असल्याचा त्याचा समज झाला. हर्शलने ही माहिती रॉयल सोसायटीला दिल्यानंतर, ती माहिती २२ मार्च रोजी रॉयल सोसायटीच्या सभेत सादर करण्यात आली. इतर खगोलज्ञांपर्यंत ही माहिती पोहोचल्यामुळे, आता या ‘धूमकेतू’च्या निरीक्षणांना सुरुवात झाली. सर्वसाधारण धूमकेतूंच्या तुलनेत या धूमकेतूची गती फारच हळू असल्याचे दिसून येत होते.
दिनांक चार एप्रिल रोजी इंग्लंडमधील ‘रॉयल अॅस्ट्रॉनॉमर’ हे पद भूषवणाऱ्या नेविल मॅस्केलिन याने, हा धूमकेतू नसून ग्रह असण्याची शक्यता व्यक्त केली. अल्पावधीतच अँडर्स जोहान लेक्झेल या रशियास्थित खगोलशास्त्रज्ञाने या धूमकेतूच्या कक्षेचे गणित मांडले व हा धूमकेतू सूर्याभोवती जवळजवळ वर्तुळाकार कक्षेत फिरत असल्याचे सिद्ध केले. कक्षेच्या या वर्तुळाकार स्वरूपावरून हर्शलने शोधलेला हा ‘धूमकेतू’ म्हणजे नवीन ग्रह असल्याचे स्पष्ट झाले. खगोलशास्त्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एक नवीन ग्रह शोधला गेला होता! विल्यम हर्शलने इंग्लंडचा राजा तिसरा जॉर्ज याच्या नावावरून या ग्रहाला ‘जॉर्जयिम सायडस’ (जॉर्जचा तारा) हे नाव सुचवले. परंतु अनेक खगोलशास्त्रज्ञांना हे नाव रुचले नाही. त्याच सुमारास जर्मन खोगलज्ञ योहान बोड याने ग्रीक पुराणातील, सॅटर्नचा जन्मदाता असणाऱ्या युरेनसचे नाव सुचवले. हे नाव अखेर सर्वमान्य झाले – पण त्यासाठी सात दशकांचा काळ जावा लागला!
– प्रदीप नायक
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org