पाश्चात्त्य देशात उगम पावलेली वाइनदेखील सुरुवातीच्या काळात निसर्गत:च तयार झाली, असा वाइनचा इतिहास सांगतो. द्राक्षं पिकल्यावर त्याचा रस खाली जमिनीवर पसरलेल्या पानांवर साचला, त्यातील शर्करा आणि आम्लाच्या अस्तित्वामुळे हवेत असणारे यीस्ट त्यावर आले आणि निसर्गानं केलेली वाइन आपसूकच तयार झाली.
आज सबंध युरोपमधले लोक जेवणाबरोबर वाइनचा पेला घेतात. खरं तर त्यांच्या जेवणात वाइनला इतकं महत्त्व असतं, की त्या वाइनच्या गुणधर्माप्रमाणे वाइनबरोबर अधिक रुचकर लागेल असं जेवण बनवलं जातं. तिथे रेस्टॉरंटमध्ये गेलं, तर वाइन न मागता आणली जाते; पण पाणी हवं असलं, तर मात्र मागावं लागतं.
लाल वाइनसाठी लाल किंवा खरं तर काळपट किंवा गडद जांभळी असणारी द्राक्षं वापरली जातात. वाइन करताना ही द्राक्षं कुस्करावी लागतात. मोठय़ा प्रमाणावर असली तर ती पायांनी तुडवली जातात. द्राक्षांच्या रसात एक यीस्ट चार तासांत आपल्यासारखे नऊ यीस्ट जन्माला घालत असतो. ते आपापल्या परीनं पुढच्या चार तासांत प्रत्येकी नऊ या दरानं यीस्ट जन्माला येतात आणि अठ्ठेचाळीस तासांत सबंध चोथ्यात त्यांची अमर्याद पदास होऊन त्यात जोरदार किण्वन प्रक्रिया सुरू होते. यीस्टमुळे द्राक्षांच्या सालींच्या आतल्या बाजूला असलेल्या रंगाच्या पिशव्या फोडल्या जाऊन त्यातला रंग बाहेर येऊन रसात मिसळतो. दोन-तीन दिवसांत रसाला लाल रंग यायला लागतो.
 या रंगाबरोबर द्राक्षातील टॅनिन रसात मिसळतं. या दरम्यान यीस्ट रसातल्या शर्करेवर पोसलं जात असतं. परिणामी रसातल्या शर्करेचं प्रमाण कमी कमी होत जाऊन यीस्टचा व्यवहार कमी होतो. किण्वन प्रक्रियेचा वेग कमी होऊन उरलीसुरली शर्करा संपेपर्यंत यीस्टचा कारभार चालू असतो आणि शर्करा संपली की तो पूर्णपणे थांबतो.
या दरम्यान यीस्टने शर्करेच्या अध्र्या भागाचं अल्कोहोल आणि अध्र्या भागाचं कार्बन डायऑक्साइड या वायूत रूपांतर केलेलं असतं. वायू तर बाहेर पडून हवेत मिसळला जातो आणि निर्माण झालेला अल्कोहोल- मद्यार्क- रसात राहून त्याची वाइन तयार झालेली असते. वाइनमध्ये सर्वसाधारण ८ ते १७ टक्के इथिल अल्कोहोल असतं.
अचला जोशी (मुंबई), मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – सत्यशोधनाची आस!
केनोपनिषदातील तिसऱ्या सर्गातल्या १४ व्या श्लोकात आध्यात्मिक वाटचालीच्या प्रवासाबद्दल अतिशय मार्मिक वर्णन आहे. या श्लोकातील अर्थ केवळ स्वशोधाच्या मार्गाच्या बाबतीत लागू नसून सत्यशोधनाला उद्देशून आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे एक प्रकारचं असिधाराव्रत आहे, असं म्हटलं जातं. ही वाटचाल दुर्गम, कारण सत्याचा शोध मुक्त मनाने, मनातील पूर्वग्रह विसर्जित करून घ्यायला लागतो. ही तारेवरची कसरत, कारण हाती लागणारं सत्य स्वत:ला धार्जिणे असते असं नाही. म्हणून हा श्लोक म्हणतो
क्षुरस्य धारा निषिता दुरत्यया
दुर्गम पथस्तत कवयो वदन्ति..
इथे कवी याचा अर्थ कवनं रचणारे ज्ञानी ऋषी.
केनोपनिषदातील हा श्लोक वाचून बिचकलो आणि अशा दुर्गम वाटेनं चालणारा सत्यशोधक असतो तरी कसा? किंवा कसा असावा? याचा शोध घेऊ लागलो.
हा सत्यशोधक आपल्यासारखा असतो, की आणखी काही वेगळा? म्हणजे कुशाग्र बुद्धिमत्तेचा? की कर्मकुशल? महत्त्वाचा मुद्दा असा की, सत्यशोधनाची आस लागलेली व्यक्ती आपोआप मार्ग शोधते. तथागतांनी चार आर्यसत्यं शोधली, श्रीकृष्णानं ज्ञान-कर्म मार्गाकडे निर्देश केला, ख्रिस्तानं दहा आज्ञा दिल्या. या अलौकिक व्यक्तींमध्ये काही खास वैशिष्टय़े होती. त्यावर ‘विवेक चूडामणी’मध्ये शंकरांनी भाष्य केलं आहे. श्लोक १९
साधनाचतुष्टय
आदौ नित्यानित्यविवेक: परिगण्यते
इहामृत फलभोगविराग: तदनंतरम्
सामादिष्ट संपत्ति: मुमुक्षुत्वम् इति स्फुटभ्.
सत्यशोधनाच्या साधनेची चार वैशिष्टय़े.
मायावी म्हणजे नष्ट पावणारे आणि चिरंतन टिकणारे (म्हणजेच मर्त्य आणि विश्वचैतन्य) या दोहोंमधला फरक समजणे. याचा अर्थ सातत्यानं उद्भवणारे आणि नष्ट पावणारे वस्तुमात्र आणि त्यांच्या उद्भव आणि विलय यांना गती देणारे, चालना देणारे चैतन्य अथवा ऊर्जा, यामधील फरक करता येणे, ती दृष्टी बाळगणे.
त्यानंतरचे वैशिष्टय़ ‘काला’च्या स्वरूपाबद्दल.
भूत-वर्तमान आणि भविष्य या मनुष्यनिर्मित कालखंडांना भेदून भविष्यकालाचा खरा अर्थ समजून घेणे. भविष्य म्हणजे केवळ मतानं संकल्पिलेली कल्पना, काळाचा सोयीस्कर आकृतिबंध. भूतकाळ म्हणजे केवळ मनानं धारण केलेली स्मृती. दोन्ही काल (भूत-भविष्य) केवळ मानसिक कल्पना. काळाचं हे स्वरूप समजणारा भविष्यातील फलप्राप्तीवर नजर ठेवत नाही. तो केवळ वर्तमानात जगतो. तेवढेच कर्म करतो. त्यामुळे तो इहलोक अथवा परलोकातल्या सुखप्राप्तीमध्ये अडकलेला नसतो.
या विद्यार्थ्यांकडे आणखी काही वृत्ती असतात. ‘साम’ म्हणजे शांत मन (चंचल नव्हे). दाम म्हणजे ज्याने इंद्रियातून उद्भवणाऱ्या संवेदनांना संयमित केलं आहे. ‘उपरती’ म्हणजे मनाची आत्मचिंतनाची अवस्था, यामुळे सुखदु:ख इ. परस्परविरोधी गोष्टींकडे पाहून विद्यार्थ्यांचं मन विचलित होत नाही. त्यानंतर श्रद्धा (हा शब्द सर्वाधिक महत्त्वाचा) म्हणजे सत्यावर विश्वास (देव, देवता, बुवा इ. नाही!) समाधान म्हणजे आत्मचिंतनातील एकाग्रता आणि शेवटचं वैशिष्टय़ म्हणजे मुमुक्षु: ज्याला सत्यशोधन करून असत्यातून, खोटेपणातून मुक्ती मिळवायची आहे!
प्रवास खरोखर कठीण आहे, पण पहिलं पाऊल उचलू या.. मन शांत ठेवू..
पिसारा हळूहळू फुलेल..
डॉ. राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – सामाजिक सिद्धांत अभ्यासावे, ते त्यावर मात करण्यासाठी
‘‘मानवाला उपयोगी पडेल असे सामूहिक व वैयक्तिक पातळीवरचे वास्तवाचे आकलन करून घेण्याचा सामाजिक सिद्धांत हा एक मार्ग आहे. वास्तव समजून घेण्याकरता किंवा ते वाकवण्याकरता आपण गोठवलेले सत्य म्हणजे सैद्धांतिक वास्तव होय. हे सैद्धांतिक वास्तव समजण्यासाठी सामाजिक सिद्धांत रचणे हा एक राजकीय खेळ आहे असे मानले पाहिजे. फॅसिस्टांचा सिद्धांत, मनूचा सिद्धांत हे अभ्यासावे, ते त्यांवर मात कशी करावी हे ठरवण्यासाठी.. जे सामाजिक सिद्धांतांची निर्मिती डोळसपणे करतात, त्यांना ‘स्व’ची व्याख्या करावी लागते व त्याचा संबंध सामाजिक संरचनेशी (कुटुंब, शिक्षणसंस्था इत्यादींशी) आणि सामाजिक व्यवस्थेशी जोडावा लागतो. आपल्याला जर सामाजिक सिद्धांत समजून घ्यायचे असतील, तर त्या सामाजिक सिद्धांतांत काय सांगितले आहे याऐवजी अनुभवांच्या व गरजांच्या प्रकाशात त्या सिद्धांतांतील बलस्थाने, कच्चे दुवे, मर्मस्थाने, पक्क्य़ा साखळ्या हे सर्व सोधून काढता आले पाहिजेत. सामाजिक सिद्धांतामुळे माझ्या हितसंबंधांना, जाणिवांना किती बळकटी येते किंवा नाही हे पाहिल्यावर आपल्याला त्यातल्या संगती-विसंगती कळू लागतात. ’’
राम महादेव बापट ‘राज्यसंस्था, भांडवलशाही आणि पर्यावरणवाद’ (मार्च २०१३) या पुस्तकातील ‘सामाजिक सिद्धांतांची आवश्यकता’ या लेखात या सिद्धांतांच्या उपयुक्ततेविषयी लिहितात – ‘‘कोणताही चांगला सामाजिक सिद्धांत ट्रान्सफॉर्मेटिव्ह असतो.  त्यामुळे शिकणाऱ्याबरोबर शिकवणाराही बदलतो. कोणताही सिद्धांत हा जसा पारखून घेतला पाहिजे, तसेच हेही गृहीत धरले पाहिजे की, यामुळे आपण बदलू शकतो. एखाद्या सिद्धांताचा अभ्यास करणे ही एक एन्गेजमेंट असते. सिद्धांत बाजूला ठेवून जगता येत नाही. सिद्धांत रचणारे मार्क्‍स, वेबर, गिडन्स यांसारखे विचारवंत आपल्या विचारांना त्रिकालाबाधित सत्य मानत नाहीत. त्यांच्या मते हवे ते घ्यावे, बाकीचे सोडून द्यावे. परंतु घेताना व सोडताना त्याची कारणमीमांसा द्यावी.’’

Story img Loader