डॉ. श्रुती पानसे
पुस्तकी ज्ञानातून पूर्ण अक्कल येत नाही, तर पुस्तकातलं ज्ञान किंवा अनुभवातलं ज्ञान योग्य वेळेला वापरण्याची क्षमता म्हणजे अक्कल किंवा व्यवहारज्ञान असं आपण म्हणू शकू. आपल्या मुलांना ही अक्कल किंवा हे व्यवहारज्ञान यावं असं प्रत्येकच आईबाबांना वाटतं. मुलांच्यात ते नाही, असं का वाटत असतं, हे कळायला काही मार्ग नाही.
गंमत म्हणजे मुलं अतिशय बारकाईने आई-बाबांचं निरीक्षण करत असतात. आपल्या आई-बाबांचं कुठे चुकतंय, आपले आईबाबा कोणाशी चांगले वागतात, कोणाशी वाईट वागतात, कोण त्यांचा गैरफायदा घेतंय का, कोणाचा गैरफायदा आपले आई/बाबा घेत आहेत आईबाबांनी एकमेकांशी आणि इतरांनी कसं वागायला हवं, हे मुलांना न सांगताही समजत असतं. मुलं जशी मोठी होतात तसतसे ते आई-बाबांचे ही गुरू बनतात आणि आपल्या आई-बाबांना व्यवहारज्ञान शिकवायला लागतात.
मुलांना बाहेरच्या जगाचं ज्ञान यायला हवं यासाठी त्यांना त्यांच्या वयानुसार काही कामगिरी सोपवता येते.
– वय वर्षे पाचच्या पुढे मुलं एकमेकांशी खेळतात तेव्हा ती सामाजिकतेचे पहिले धडे घेत असतात. ते त्यांचे त्यांना घेऊ द्यावेत. आपलं लक्ष असावं पण त्यांना मत्री करायची असते. मुलं मत्री करत असतात. एखादं खेळणं आपापसात वाटून खेळता येतं की नाही हे बघावं. मुलं भांडतात, पण अधूनमधून एकमेकांशी खेळता यायला हवं. ज्या खेळांमध्ये टीमवर्कची गरज असते असे क्रिकेट, फुटबॉल असे खेळ त्यांनी अवश्य शिकावेत.
– घरात बसून अभ्यास करायला लावून ज्ञान मिळेल, पण व्यवहारज्ञान नाही हे लक्षात घेऊन वेळोवेळी घराबाहेर, शिबिरांत, अन्य माणसांमध्ये त्यांनी मिसळायला हवं.
– गिर्यारोहण, साहसी खेळ मुलांना आवडतात. यामुळे समस्या सोडवण्याची सवय लागेल.
कायम कोशात राहणारी किंवा आई-बाबांच्या पंखाखाली असणारी मुलं व्यवहारज्ञान कसे शिकतील?
त्यामुळे ही फुलपाखरं कोशातून बाहेर येतील. जिथे-तिथे त्यांना मदत करण्यापेक्षा थोडंसं स्वतचं डोकं वापरून एखाद्या समस्येतून बाहेर पडायला त्यांना जेव्हा जमेल, तेव्हा त्यांच्यात चांगल्या प्रकारे आत्मविश्वास येऊ शकेल.
contact@shrutipanse.com