२००५ सालापासून ऊस लावण-खोडवा-भात अशा फेरपालटात माझे विनानांगरणीच्या शेतीचे प्रयोग चालू आहेत. या तंत्राने विक्रमी उत्पादन मिळवणे यापेक्षा किफायतशीर उत्पादन मिळवणे हे ध्येय होते. ते बऱ्यापकी साध्य झाले. इतर पिकांतही या तंत्राचा फायदा मिळू शकतो हे लक्षात आले. पूर्वमशागतीचा खर्च सर्वसामान्यांसाठी डोईजड होत चालला आहे. तरीही परंपरा सोडून असे प्रयोग करण्यास शेतकरी सहजासहजी तयार होत नाहीत. काही मोजके शेतकरी तयार झाले.
अवर्षणप्रवण भागात ज्वारी हे एक प्रमुख पीक आहे. महाराष्ट्रात ज्वारी एक प्रमुख धान्यपीक तसेच चारा देणारे पीक आहे. जमिनीच्या सुपिकतेनुसार व पाऊसमान बागायतीची सोय व इतर अनुकूल-प्रतिकूल परिस्थितीनुसार या पिकाचे उत्पादन कमी-जास्त मिळू शकते. कडबा उत्पादनातही अशीच तफावत आढळते. बहुतेक क्षेत्रात खरीप हंगामात जमीन पड ठेवून कुळवाच्या पाळ्या मारून जमीन तणविरहित ठेवण्याचे काम चालू असते. यातून जमिनीत ओलावा साठविणे, पीक उगवण झाल्यावर सतत कोळपण्या देऊन हा ओलावा टिकविणे व त्यावर उत्पादन घेणे असे सर्वसाधारण स्वरूप असते.
खरिपात कोणतीही मशागत न करता तणे वाढू देणे, पुढे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ही तणे तणनाशकाने मारणे व सप्टेंबरच्या सुरुवातीला पेरणी करणे असा बदल करून पाहण्याचे ठरले. सोलापूर जिल्ह्य़ातील बार्शी तालुक्यातील श्रीपदिपपरी येथील श्री. आनंद कुलकर्णी यांच्यासह दोन शेतकरी तर श्री. शरद पवार अहिरवाडी, ता. वाळवी, जि. सांगली यांच्यासह दोन शेतकऱ्यांनी हे प्रयोग केले. हे तंत्र परंपरेपेक्षा वेगळे असल्याने काही नवीन गोष्टी लक्षात आल्या.
नेहमीच्या पेरणी यंत्राचा वापर करणे शक्य नाही अशी समजूत होती ती खोटी ठरली. मशागत केलेल्या रानापेक्षा शून्य मशागत रानात पेरणी जास्त चांगली होत असल्याचा अनुभव पेरणाऱ्याने सांगितला. तण मेल्यानंतर त्याचे खत झालेल्या रानात पाऊस कमी होऊनही उत्पादन मिळाले. सांगली जिल्ह्य़ातील प्रयोगात पावसाची चांगली साथ मिळाल्याने विक्रमी उत्पादन मिळाले. बार्शी येथे अपुरा पाऊस होता. तरीही उत्पादन चांगले मिळाले.
– प्रताप चिपळूणकर (कोल्हापूर) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
जे देखे रवी..- आद्या
आद्या हा ज्ञानेश्वरीतला पहिला शब्द. कर्ता, भर्ता आणि हर्ता नाही. हा लंगडा, थोटा, लुळा आणि आंधळा आहे असे वर्णन आपण शोधले तर सापडू शकते. हे असे असले तरी यांच्यात ऊर्जा भरली आहे की ज्यामुळे हा पसरल्यावर उत्क्रांतीत अन्न (Matter)) तयार होऊ शकते आणि या अन्नात उत्क्रांतीच्याच ओघात प्राणाने प्रवेश केल्यावर विचार करणारी, बघणारी, चालणारी, ऐकणारी सजीव सृष्टी निर्माण होते, असे मुंडक उपनिषदात सुचवले आहे. हे ह्य़ा आद्याचे (ब्रह्माचे) पसरणे औष्णिक आहे. ही उष्णता (ऊर्जा) अजूनही विश्वात लवलवते आहे. ही उष्णता आपण सूर्याकडून घेतो. तीच ऊर्जा पाने शोषतात, झाडे पडल्यावर गाडली जातात मग त्याचे कोळसा, घासलेट किंवा पेट्रोल होते. त्याचा उपयोग करून आपण अन्न शिजवतो किंवा दिवे लावतो(!) याला कर्मशृंखला म्हणतात.
ही शृंखला अनुबंध ह्य़ा रूपाने किंवा बेडीच्या रूपाने सर्वत्र उपस्थित असते. अन्न (Matter) होण्याच्या प्रक्रियेत प्रत्येक वस्तूला गुण मिळतात. सजीवांच्या बाबतीत हे गुण स्वभाव ठरवतात. अशा अनेक सजीवांमधल्या स्वभावाच्या आधारे घडलेल्या संबंधामधून सामाजिक प्रक्रिया घडतात. ह्य़ा पाश्र्वभूमीच्या पडद्यासमोर माणसांचा किंवा इतर सजीवांचा खेळ सिद्ध होतो. या खेळात असंख्य Variables असतात, त्यामुळे ह्य़ा खेळाचे अचूक गणित मांडणे अशक्य होते. काळ जातो तसे या खेळातल्या नटनटय़ांची प्रभाव क्षेत्रे बदलतात आणि गणित आणखीनच गुंतागुंतीचे होते. आणि म्हणूनच ‘बदल हेच एकच शाश्वत सत्य आहे’ अशी विधाने प्रसृत होतात.
या गुंतागुंतीच्या गणितात सरासरीच्या द्वारे काही ठोकताळे मांडता येतात. दीघरेद्योग या जगात यश देतो असा एक ठोकताळा असतो. यश मिळाल्यावर यशस्वी माणूस फुगू शकतो त्याला गर्विष्ठ म्हणतात, जो फुगत नाही त्याला निगर्वी म्हणतात. गर्विष्ठ माणूस सत्ता उत्पन्न करतो, निगर्वी माणसाला लोक सत्तेशिवाय चाहतात. सरासरीत ठोकताळा चुकू शकतो मग माणूस अयशस्वी ठरतो आणि ‘कर्म माझे’ उद्गार काढून कपाळावर हात मारतो. त्याचे बरोबर असते, कर्माच्या प्रवाहात असलेल्या असंख्य गोष्टींपैकी काही त्याच्या तथाकथित यशाच्या आड आलेल्या असतात. तिन्ही उदाहरणांत कर्म न करणे शक्य नसते. तुम्ही केले नाहीत तरी आसमंतात ते घडणे चालूच राहते आणि ते तुम्हाला घेरते. शेवटी माणूस मरतो. लोक क्षणभर हाय हाय म्हणतात. लंगडा, थोटा, आंधळा आद्या काळाच्या पलीकडला त्याला ढिम्म होत नाही. तोच शाश्वत असतो. हॅमलेट नाटकात स्मशानातल्या प्रसंगात कबरी खणणाऱ्यांना जेव्हा कवटय़ा सापडतात तेव्हा ते एकमेकाला म्हणतात ह्य़ाच्यातली राजाची कोठली, धर्मगुरूची कोठली आणि वकिलाची कवटी कोठली हे काही कळत नाही. तेही एक शाश्वत सत्यच सांगत असतात.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस – मनोविकार : भाग ५ / बुद्धिमांद्य
लक्षणे – वयाच्या शिक्षणाच्या व अनुभवाच्या मानाने; आलेल्या प्रसंगात बुद्धीच्या वापराचा अभाव दिसणे. किमान स्मरणशक्तीच्या अभावाचा नेहमीच अनुभव येणे. खूप वाचून- शिकूनही अनेकवेळा लक्षात न रहाणे. स्मरणशक्ती ऐनवेळी दगा देणे.
कारणे – अनुवंशिकता, लहानपणी तीव्र आजार, कृमी, जंत, मलावरोध किंवा माती खाण्याचे दुष्परिणाम. असमतोल आहार. कदन्न खाणे. आसपासची व कौटुंबिक परिस्थिती बुद्धीच्या विकासास पोषक नसणे.
अनुभविक उपचार – वेखंड कांडी तुपात किंवा पाण्यात उगाळून अर्धा ते १ चमचा गंध सकाळ सायंकाळ २ वेळा घ्यावे. शक्य असल्यास रात्रौ भिजत ठेवलेला एक बदाम सकाळी दुधात उगाळून घ्यावा. अधिक मोठय़ा प्रमाणावर बदाम खाऊन बुद्धीकरिता उपयोग होत नाही हे लक्षात ठेवावे. ब्राह्मीवटी ३ गोळ्या २ वेळा, ब्राह्मीप्राशबरोबर रिकाम्यापोटी घ्याव्यात. जेवणानंतर सारस्वतारिष्ट ४ चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावे. ओली, ताजी ब्राह्मी मिळाल्यास ब्राह्मीचा रस सकाळ सायंकाळ ३-३ चमचे घ्यावा. जेवणानंतर एक ते दोन लवंगा घ्याव्यात. उष्ण पडल्यास प्रमाण कमी करावे. भल्यापहाटे सूर्यनमस्कार अवश्य घालावेत.
िपपळाची ताजी साल गाईच्या दुधात उगाळून त्याचे गंध नियमितपणे वर्षभर घ्यावे. आर्थिक परिस्थिती चांगली असल्यास या गंधाबरोबर रौप्य भस्म रोज पन्नास मि.ग्रॅ. घ्यावे.
रुग्णालयीन उपचार – प्रथम स्नेह,स्वेद करून मग तज्ज्ञांचे देखरेखीखाली शिरोबस्ति अवश्य करून घ्यावा.
पथ्यापथ्य – तेलकट, तुपकट, खूप थंडे पदार्थ कटाक्षाने टाळावेत. रात्रौ लवकर जेवावे. जेवणावर ताबा असावा. सारस्वतारिष्ट म्हणजे ब्राह्मी व शतावरीपासून तयार केलेले एक उत्कृष्ट औषध होय. त्यात भुईकोहळा, हिरडा, वाळा, आले, बडीशेप अशी काढय़ाची औषधे, लवंग, पिंपळी, वेलदोडा, दालचिनी, वावडिंग अशी अवापद्रव्ये असतात. यामुळे अन्य अनेकानेक फायद्यांसह वाणी शुद्ध होते.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – ३० मे
१८८३ > लोकमान्य टिळकांचे ओवीबद्ध चरित्र, ‘गरुडपुराण’ हे राजकीय आशयाचे दीर्घकाव्य आणि काही विडंबनकाव्ये लिहिणारे वैदर्भीय कवी जयकृष्ण केशव उपाध्ये यांचा जन्म
१८९४ > गोमंतकातील पहिले हिंदू इतिहास संशोधक असा लौकिक मिळवणारे डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्म. फ्रेंच, पोर्तुगीज, संस्कृत, कोकणी व मराठी (मोडी लिपीसह) या भाषा त्यांना अवगत होत्या पणजीच्या अभिलेखागारात सन १९३१ पासून कार्यरत असणाऱ्या पिसुर्लेकरांनी ग्रंथलेखन केले, ते मात्र पोर्तुगीज भाषेत.. त्यापैकी काही ग्रंथांचे मराठी व इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. ‘ल अन्तागिदाद दु क्रिश्नाइ ज्यु’ या ग्रंथातून त्यांनी कृष्णसंप्रदाय हा इसवीसनापूर्वीपासून अस्तित्वात होता, हे साधार सिद्ध केले होते.
१९३४ > ह. ना. आपटे यांचे चरित्र व त्यांच्या आठवणी अशी पुस्तके लिहिणारे ‘ज्ञानप्रकाश’च्या संपादक मंडळातील बापूजी मरतड आंबेकर यांचे निधन.
१९४८ > ‘स्वप्न एका वाल्याचे’, ‘काळोख देत हुंकार’, आदी २५ नाटके, ४० कथा, ३० कविता, ‘महाद्वार’, ‘फिनिक्स’ अशा एकांकिका लिहिणारे दिलीप परदेशी यांचा जन्म. त्यांचे निधन ४ नोव्हेंबर २०११ रोजी झाले.
– संजय वझरेकर