२००५ सालापासून ऊस लावण-खोडवा-भात अशा फेरपालटात माझे विनानांगरणीच्या शेतीचे प्रयोग चालू आहेत. या तंत्राने विक्रमी उत्पादन मिळवणे यापेक्षा किफायतशीर उत्पादन मिळवणे हे ध्येय होते. ते बऱ्यापकी साध्य झाले. इतर पिकांतही या तंत्राचा फायदा मिळू शकतो हे लक्षात आले. पूर्वमशागतीचा खर्च सर्वसामान्यांसाठी डोईजड होत चालला आहे. तरीही परंपरा सोडून असे प्रयोग करण्यास शेतकरी सहजासहजी तयार होत नाहीत. काही मोजके शेतकरी तयार झाले.
अवर्षणप्रवण भागात ज्वारी हे एक प्रमुख पीक आहे. महाराष्ट्रात ज्वारी एक प्रमुख धान्यपीक तसेच चारा देणारे पीक आहे. जमिनीच्या सुपिकतेनुसार व पाऊसमान बागायतीची सोय व इतर अनुकूल-प्रतिकूल परिस्थितीनुसार या पिकाचे उत्पादन कमी-जास्त मिळू शकते. कडबा उत्पादनातही अशीच तफावत आढळते. बहुतेक क्षेत्रात खरीप हंगामात जमीन पड ठेवून कुळवाच्या पाळ्या मारून जमीन तणविरहित ठेवण्याचे काम चालू असते. यातून जमिनीत ओलावा साठविणे, पीक उगवण झाल्यावर सतत कोळपण्या देऊन हा ओलावा टिकविणे व त्यावर उत्पादन घेणे असे सर्वसाधारण स्वरूप असते.
खरिपात कोणतीही मशागत न करता तणे वाढू देणे, पुढे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ही तणे तणनाशकाने मारणे व सप्टेंबरच्या सुरुवातीला पेरणी करणे असा बदल करून पाहण्याचे ठरले. सोलापूर जिल्ह्य़ातील बार्शी तालुक्यातील श्रीपदिपपरी येथील श्री. आनंद कुलकर्णी यांच्यासह दोन शेतकरी तर श्री. शरद पवार अहिरवाडी, ता. वाळवी, जि. सांगली यांच्यासह दोन शेतकऱ्यांनी हे प्रयोग केले. हे तंत्र परंपरेपेक्षा वेगळे असल्याने काही नवीन गोष्टी लक्षात आल्या.
नेहमीच्या पेरणी यंत्राचा वापर करणे शक्य नाही अशी समजूत होती ती खोटी ठरली. मशागत केलेल्या रानापेक्षा शून्य मशागत रानात पेरणी जास्त चांगली होत असल्याचा अनुभव पेरणाऱ्याने सांगितला. तण मेल्यानंतर त्याचे खत झालेल्या रानात पाऊस कमी होऊनही उत्पादन मिळाले. सांगली जिल्ह्य़ातील प्रयोगात पावसाची चांगली साथ मिळाल्याने विक्रमी उत्पादन मिळाले. बार्शी येथे अपुरा पाऊस होता. तरीही उत्पादन चांगले मिळाले.
– प्रताप चिपळूणकर (कोल्हापूर) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा