मागच्या लेखात स्त्री हीच प्राथमिक जीव असतो असे मी म्हटले ते मी कोठे तरी वाचले होते. आफ्रिकेतल्या त्या अनादिमानवीचे छायाचित्रही छापून आले होते. परंतु तो संदर्भ शोधणार कसा? मग मी माझ्या स्वभावाप्रमाणे चौकशी सुरू केली. रुची या नियतकालिकात उज्ज्वला दळवी जनुकांवर फार सुंदर लिहीत असे. तिला संगणकामार्फत पत्र पाठवले. तिचे क्षणार्धात उत्तर आले. तिने मोठय़ा सावधपणे लिहिले आहे. ‘३०० दशलक्ष वर्षांपूर्वी लिंगभेदच नव्हता. तो भेद आला तेव्हा लिंग ही गोष्ट दोन ७ ७ या जनुकातल्या जोडीने अवतरली. ही जोडी पुढे स्त्रियांमध्ये स्थिरावली. परंतु यातल्या एका ७मध्ये पुढे बदल होत गेले आणि हे बदल होत होत एक छोटेसे नवीनच प्रकरण उद्भवले ते म्हणजे ८. हा ८ म्हणजे पुरुष होण्यासाठी लागणारे जनुक. तिने लिहिले आहे की, एका अर्थाने हा ८ मूळच्या ७चाच अवतार आहे. गर्भधारणा झाल्यावर गर्भात पहिले काही आठवडे लिंगभेद नसतो. जर हा उपटसुंभ ८ हजर असेल तरच मग शुक्र निर्माण करणारे इंद्रिय तयार होते. जर नसेल तर बीजांडकोश म्हणजे ovaries तयार होण्याचा क्रम तसाच राहतो. दुसरे असे की जर हे ८ नावाचे जनुक आळशी असेल तर ते जनुक निरोपच पाठवत नाही आणि मग स्त्री निर्माण होते. ती स्त्रीसारखीच असते पण तिच्यातले हे ८ जनुक तिला मुले होण्यास प्रतिबंध करते.’ ‘माझा निखिल थत्ते नावाचा एक पुतण्या आहे नुकताच टइइर झाला. वयाच्या मानाने हा प्रकांड आहे. ‘माझ्या स्त्री हेच मूळ मानवी अस्तित्व’ या कवित्वाला त्याने प्रथम एखाद्या जातिवंत वैज्ञानिकांसारखा विरोधच केला. मग मी वकिली करायला सुरुवात केल्यावर हळूहळू माहिती बाहेर येऊ लागली. स्त्रियांमध्ये पुरुषसत्त्व Androgen  नगण्य असते. परंतु पुरुषांमधे स्त्रीत्वाचे रसायन म्हणजे Oestrogen  त्या मानाने खूप जास्त प्रमाणात असते. तसेच ७ ८ या पुरुषाच्या जनुकांमधला ८ जर शून्य असेल किंवा कमी असेल तरी पुरुष नावाचा प्रकार निर्माण होऊ शकतो, परंतु तो वंध्य आणि स्त्रंण असतो. या सगळ्या गोष्टीत एक गोष्ट नक्की ठरते की लिंगभेदाच्या जनुकांमधल्या जोडीत जर x जनुकच नसेल तर y y असा गर्भ तयारच होऊ शकत नाही. पूर्वी Mr x अशी एक मोठी उत्कंठावर्धक गोष्ट क्रमश: माध्यमातून छापून येत असे. पुढे त्याचा चित्रपटही आला. पण जनुकशास्त्राप्रमाणे Mr x असूच शकत नाही. असलाच तर तो असतो Mr xy. खरी असते miss x जर कोणी y भेटला तर ही होते Mrs x. मग xx होणार की xy हे केवळ कर्मधर्मसंयोगाने ठरते.
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

कुतूहल : वरकस जमीन आणि पाण्याचा सातबारा
एका शेतकऱ्याची कामथे (ता. पोलादपूर, जि. रायगड) गावात २८० चौरस मीटर (२.८ गुंठे) एवढी जमीन आहे. त्यापकी अंदाजे ३,५०० चौ.मीटर (३५ गुंठे) जमीन सपाट आहे. बाकीची जमीन उतारावर (उतार पाच टक्के) आहे. तेथील सरासरी पाऊस ३,३०० मि.मी. (३.३ मीटर) आहे. सध्या तेथील पावसाच्या पाण्याचा वापर गवतासाठी थोडाफार होतो. बाकीच्या पाण्यापकी काही पाणी जमिनीत जिरते. उर्वरित सर्व पाणी वाहून जात आहे. सध्या तो शेतकरी पाण्याचा काहीही उपयोग करीत नसल्याने तेथील पाणी वापरण्याचा निर्देशांक शून्य आहे. तेथील जमिनीवर पडणारे एकूण पाणी ७,२८० गुणिले ३.३ = २४०२४ घनमीटर. यापकी ३०% म्हणजे  ७२०७.७ घनमीटर पाणी साठवता येऊ शकेल.                                     
सातबाराच्या उताऱ्यावर ७२०७.७ घनमीटर पाणी उपलब्ध आहे व पाणी वापराचा निर्देशांक शून्य आहे असे लिहिल्यास, सध्याची परिस्थिती तात्काळ कळेल. हे पाणी पावसाळ्यानंतर पुढील पावसाळ्यापर्यंत वापरता येईल. म्हणजे या जमिनीतून बाराही महिने काहीना काही उत्पन्न घेणे शक्य आहे.
दुसऱ्या शेतकऱ्याची १८,५०० चौरस मीटर (१८५ गुंठे) जमीन ढोणे या गावात (ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथे) आहे. त्यापकी ३५०० चौरस मीटर (३५ गुंठे) जमिनीवर भाताचे पीक घेतले जाते. ५,००० चौरस मीटर (५० गुंठे) जमिनीवर आंब्याच्या ६० झाडांची लागवड केली आहे. उरलेली १०,००० चौरस मी. (१०० गुंठे) जमीन ओसाड, वरकस आहे.
 ढोणे येथील सरासरी पाऊस २,८०० मिमी (२.८ मी.). म्हणून पाण्याची उपलब्धता, १८,५०० गुणिले २.८ = ५१,८०० घनमीटर.
भाताला अंदाजे १,६०० मिमी पाण्याची गरज असल्यास, भातशेतीला लागणारे पाणी, ३,५०० गुणिले १.६ = ५.६०० घनमीटर.  
आंब्याच्या झाडांना प्रतिदिन  ३ लीटर पाणी लागत असल्यास, ६० झाडांना वर्षभर (पावसाळा सोडून) लागणारे पाणी ६० गुणिले २४०  गुणिले ३ = ४३.२  घनमीटर.
 एकंदर शेतीला व झाडांना लागणारे पाणी, ५,६०० अधिक ४३.२ = ५,६४३.२ म्हणजे अंदाजे ५,७०० घनमीटर. शिल्लक राहिलेले पाणी, ५१,८०० उणे ५,७०० = ४६,१०० घनमीटर. यापकी १५ टक्के पाणी म्हणजे ४६१०० गुणिले ०.१५ = ६९१.५  किंवा अंदाजे ७०० घनमीटर पाणी जमिनीत मुरते. शिल्लक पाणी,  ४६,१०० वजा ७०० = ४५,४०० घनमीटर. यापकी ३०% म्हणजे १३,६२०  घनमीटर पाणी साठविण्यास उपलब्ध आहे.
पाणी वापराचा निर्देशांक ५,७०० भागिले ५१,८०० गुणिले १०० = ११ टक्के व साठविण्यास उपलब्ध असलेले पाणी १३६२० घनमीटर. यांची नोंद सातबारावर असावी.
– उल्हास परांजपे   
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

वॉर अँड पीस : जखमा : भाग –  १
जखम हा असा विषय आहे की सामान्यापासून ज्ञानी माणसापर्यंत उठसूठ डॉक्टरांकडे पळतात. मलम, आयोडिन, बँडेजेस, इंजेक्शने असा मोठा खर्चाचा खटाटोप लोक उगाच करीत असतात. रोग्याचा खिसा अकारण खाली होत असतो. आयुर्वेदातील दोन-चार साध्यासुध्या उपायाचे, पुढे बाकी सर्व वैद्यकीय जग तुच्छ आहे असे शेकडो अनुभवानंतर बनलेले माझे मत आहे. त्रिफळा, मध, तूप यावरून आख्खे ‘सर्जिकल शास्त्र’ ओवाळून टाकावे; असे विलक्षण व्रणशोधन व रोपणाचे कार्य, सामथ्र्य या त्रयीत आहे.
मार्च, एप्रिल १९८६ मध्ये एका कुत्र्याच्या पायाचे हाड मोडले, म्हणून त्याचा पाय प्लॅस्टरमध्ये ठेवला. त्यामुळे हाड न सुधारता, उलट पाय कापण्याची तयारी चालली होती. कोणीतरी माझ्याकडे कुत्र्याला घेऊन आले. त्रिफळा क्वाथ धावन व मधाने व्रणशोधन केले. आठ दहा ड्रेसिंगमध्ये पाय कुजणे थांबले. पाय कापावा लागला नाही. असो. ‘त्रिफळा व मध यांची कृपा.’
मुंबई येथे आमच्या वडिलांकडे दीर्घकाळ काही ना काही निमित्ताने येणारे मयेकर नावाचे गृहस्थ, एक दिवस आपल्या सोळा वर्षे बरी न होणाऱ्या जखमेकरिता माझ्याकडे आले. काहीतरी कारणाने पायाच्या पोटरीला झालेली जखम कशानेच भरून येत नव्हती. मधुमेह, महारोग किंवा कसलाच गंभीर आजार त्यांना नव्हता.
त्यांना रक्तशुद्धी काढा व आरोग्यवर्धिनी पोटात घेण्याकरिता; एलादि तेल बाहेरून लावण्याकरिता अशी योजना सुरू केली. महिन्याभरात जखम भरून आली. त्यावर खपली बसली. जखम पुन्हा वाहिली नाही. मी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला, तेव्हा ही प्रारंभीची घटना आहे. हा सर्व त्या रुग्णाचा, औषधाचा व आमचा एकत्रित शुभयोग होय.
जखमेच्या उपचारांकरिता विचार शांतपणे करावा. जखमेचे कारण पहावे. जखमेच्या आसपासचा भाग बारकाईने बघावा. दडसपणा, पूं, सूज, पिकलेला, न पिकलेला भाग, खाज, आग, थंड किंवा उष्ण स्पर्श व वास यांचा अभ्यास करावा.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत : २३ फेब्रुवारी
१८७६  > समाजकल्याणाची आस धरून मोठे कार्य उभारणारे आणि त्यासाठी कीर्तनाला नवे रूप देणारे संत गाडगेमहाराज यांचा शेणगाव (जि. अमरावती) येथे जन्म.
१८९८ > ‘इतके दिवस स्त्रिया तुमच्या पावलावर पाऊल टाकत होत्या. तरी आता त्या मागे राहणार नसून तुमच्या पावलाबरोबर पाऊल टाकीत पुढे येतील’ असे लोकमान्य टिळकांच्या सभेत सांगून स्त्रीमुक्तीची भारतीय वाटचाल सुरू करणाऱ्या लेखिका-कवयित्री  कमलाबाई देशपांडे यांचा जन्म. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या त्या कन्या, पण स्वतंत्र बुद्धीने तळपल्या. तरुणपणीच पतिनिधन झाल्याने त्यांनी हिंगणे  आश्रमाचे काम सुरू केले. ‘स्मरणसाखळी’ हे आत्मचरित्र, ‘हसरा निर्माल्य’ आणि ‘चिमण्या’ही शब्दचित्रे त्यांनी लिहिली, तर त्यांच्या संघर्षांची गाथा विद्या बाळ यांनी ‘कमलाकी’ या चरित्रग्रंथात मांडली.
१९०२ > इतिहासकार, संपादक व कवी कृष्णाजी गंगाधर कवचाळे यांचा जन्म. ‘मध्यभारतीय मराठी वाङ्मय’, ‘माळव्यातील विद्वद्रत्ने’, ‘प्राचीन मध्य भारत’ तसेच  ‘मांगल्यमाला’ काव्यसंग्रह ही त्यांची पुस्तके .   ‘स्वातंत्र्य’ साप्ताहिक त्यांनी चालविले.
१९४७ > ‘बालसंगीत बोध’ या पुस्तकाचे कर्ते, संगीतज्ञ नारायण बनहट्टी यांचे निधन
– संजय वझरेकर