डॉ. श्रुती पानसे
स्त्रिया आणि पुरुषांचा मेंदू एकसारखा असतो का, या प्रश्नाचं उत्तर अतिशय वेगवेगळ्या पद्धतींनी मेंदुशास्त्रज्ञ शोधत आहेत. काही संशोधकांच्या मते, स्त्री आणि पुरुषांच्या मेंदूमध्ये फरक असतो. विशेषत: मानसिक, भावनिक आणि आकलनाच्या पातळीवर असा फरक दिसून येतो, असं काहींचं म्हणणं आहे. काहींच्या मते, भावना व भाषेच्या पातळीवर स्त्रिया आघाडीवर असतात, तर दृश्य अवकाशीय संकल्पना व गणिताच्या संदर्भात पुरुष आघाडीवर असतात.
परंतु या सर्वाना छेद देणारं एक संशोधन एफएमआरआय पद्धतीनं केलं गेलेलं आहे. यामध्ये जिवंत मेंदूचं छायाचित्रं घेऊन निष्कर्ष काढले जातात. हे संशोधन ‘नेचर’ या विश्वसनीय आणि प्रतिष्ठित शोधपत्रिकेत प्रकाशित झालेलं आहे. या संशोधनानुसार, स्त्री-पुरुषांच्या मेंदूची जडणघडण शरीरशास्त्रीयदृष्टय़ा एकसारखीच असते.
तरीही आपल्याला स्त्री-पुरुषांच्या विचारप्रक्रियेत अनेकदा फरक पडलेला दिसतो; तो सांस्कृतिक वातावरणामुळे झालेला असतो. स्त्री आणि पुरुषांवर वेगवेगळ्या पद्धतींनी झालेल्या संस्कारांमुळे हा फरक दिसतो. उदाहरणार्थ, मुलगा किंवा मुलगी लहानपणापासून घरातल्या, परिसरातल्या आणि समाजातल्या स्त्री व पुरुषांना वावरताना बघतात. त्यांचंच अनुकरण ती मुलगी किंवा तो मुलगा करत असतो. स्त्रियांनी व पुरुषांनी याच पद्धतीनं वागायचं असतं, हे जन्मापासून त्यांच्या मनावर बिंबत असतं.
गंमत म्हणून माणसं असेही दाखले देत असतात, की वाहनचालकीय कौशल्यं स्त्रियांमध्ये कमी असतात. तर कुठं काय बोलावं आणि काय बोलू नये, हे पुरुषांना पटकन कळत नाही. पण आपण अशी अनेक उदाहरणं बघतो, की अनेक पुरुषांमध्येही वाहनचालकीय कौशल्यं कमी असतात. तर एखाद्या स्त्रीपेक्षा कुठं काय बोलायचं आणि बोलायचं नाही, याचं भान एखाद्या पुरुषाला जास्त असू शकतं. त्यामुळेच ही कौशल्यं स्त्री आणि पुरुष म्हणून नाही तर व्यक्तिगणिक बदलतात, अशी मांडणी मेंदूशास्त्रज्ञ करत आहेत. भावनांच्या पातळीवरही तेच म्हणता येईल. मुलग्यांना- ‘मुलींसारखं काय रडतोस..’ असं म्हटलं जातं, तेव्हा ‘आपण (मुलगा आहोत, म्हणून) रडायचं नाही’ हा संस्कार त्यांच्यावर केला जातो. वास्तविक, भावनांच्या केंद्रामध्ये स्त्री-पुरुष असा फरक नसतो. या विषयावर पुढील काळातही संशोधन होत राहील. कारण हा मुद्दा अजूनही वादाचाच राहिलेला आहे!
contact@shrutipanse.com