भानू काळे
भाषेच्या जडणघडणीत पत्रकारितेचे योगदान मोठे आहे. साहित्यापेक्षा वृत्तपत्रांचा वाचकवर्ग मोठा असतो व त्यामुळे अनेक शब्द वृत्तपत्रांतूनच समाजात रूढ होतात. वृत्तपत्रांच्या एकूण स्वरूपामुळे हे शब्द वेधक पण सुस्पष्ट असावे लागतात. असे चपखल शब्द रूढ करायची मराठी पत्रकारितेला उज्ज्वल परंपराच लाभलेली आहे. नोकरशाही किंवा जहाल हे शब्द लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’मधून रूढ केले. गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, षटक इत्यादी शब्द अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी ‘संदेश’मधून रूढ केले. आजच्या काळातही असे अनेक नवे शब्द वृत्तपत्रांनी रूढ केले आहेत.
उदाहरणार्थ, गेल्या काही वर्षांत देशात मोठय़ा प्रमाणावर रस्तेबांधणीचे काम झाले आहे. त्या संदर्भातील बातम्या देताना महामार्ग (हायवे), द्रुतगती मार्ग (एक्सप्रेस वे), गतिरोधक (स्पीडब्रेकर), दुभाजक (डिव्हाइडर), बाह्यवळण (बायपास), घाटमार्ग (हिल रोड) वगैरे शब्द वापरले गेले आणि लोकांच्या तोंडवळणी पडले. पदावर नसूनही सत्तेवर नियंत्रण ठेवणाऱ्या व्यक्तीला उद्देशून ‘रिमोट कंट्रोल’ हा शब्द वृत्तपत्रांनीच रूढ केला. विधिमंडळात निवडून गेलेल्या पण कुठल्याच प्रश्नावर ज्यांनी कधीच तोंड उघडले नाही अशा लोकप्रतिनिधीला वृत्तपत्रांनीच ‘मौनीबाबा’ म्हटले. दारूच्या नशेत गोंधळ घालणारा ‘मद्यधुंद’ किंवा पैशाच्या जोरावर माज करणारा ‘धनदांडगा’ ही तशीच काही उदाहरणे. गृहनिर्माण, संकुल, सदनिका, चटईक्षेत्र, वाहनतळ, महाआरती, चक्काजाम, भूखंडाचे श्रीखंड, बेरजेचे राजकारण, घरवापसी, आयाराम-गयाराम हे शब्द म्हणजे वृत्तपत्रांचीच देणगी.
ब्लॅक मनी (काळा म्हणजे हिशेबात न दाखवला जाणारा पैसा) आणि व्हाइट मनी (पांढरा म्हणजे हिशेबात दाखवला जाणारा पैसा) हे शब्द तसे मराठीत रूढ झालेले होते. काळा पैसा पांढरा करायची ‘मनी लाँडिरग’ ही छुपी यंत्रणादेखील अस्तित्वात होती. अलीकडेच त्यासाठी ‘धनधुलाई’ हा शब्द एका वृत्तपत्रात वाचला. एखाद्याची ‘धुलाई’ करणे म्हणजे त्याला बदडणे हे ठाऊक होते, पण त्या शब्दाला ‘धन’ जोडून एक नवाच समर्पक शब्द तयार झाला.
आजच्याच एका वृत्तपत्रात विनासामंजस्य मालकी मिळवणे (होस्टाइल टेकओव्हर), कर्जसाहाय्यित विस्तारपथ (कर्जाच्या बळावर होणारी व्यवसायवृद्धी), मेंदूमृत (ब्रेन डेड) हे पूर्वी कधी न वाचलेले शब्द माझ्या वाचनात आले. वृत्तपत्रे हा नवशब्दांचा अक्षयस्रोत आहे.
bhanukale@gmail.com