डॉ.पांडुरंग सदाशिव खानखोजे हे क्रांतिकारक की कृषी शास्त्रज्ञ, असा प्रश्न निर्माण होतो! वर्धा येथे १८८४ साली जन्मलेले डॉ.खानखोजे यांचे शालेय शिक्षण वध्र्यातच झाले. त्यांना लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा दिली. १९११ साली ते अमेरिकेत गेले व त्यांनी ओरेगॉन कृषी महाविद्यालयात शेतीचे शिक्षण घेतले.पण १९०८ सालापासूनच त्यांचा संबंध स्वातंत्र्य चळवळीशी आला व अमेरिकेत गदर पक्ष स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. जगात अनेक ठिकाणी फिरून त्यांनी  भारतीय स्वातंत्र्यासाठी देशाबाहेरून प्रयत्न केले.    
१९२० सालापासून त्यांनी मेक्सिकोमध्ये वनस्पतीशास्त्राचे व पीक निर्मिती शास्त्राचे प्राध्यापक म्हणून १९४७ पर्यंत काम केले. या काळात हायब्रीड मका, तांब्या रोगाला तोंड देईल-पावसाळ्यात-उन्हाळ्यात व थंडीत बर्फालाही तोंड देईल असा गहू, अधिक उत्पादन देणारे सोयाबीन आणि घेवडय़ाचे उत्पादन, कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात, समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर पिकवता येणारी जात घेऊन मेक्सिकोमध्ये हरित क्रांती घडवून आणली. मेक्सिकन सरकारने त्यांना संचालक म्हणून नेमले होते. मेक्सिकोतील शिक्षण खात्याच्या संग्रहालयाच्या िभतीवर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष व इतर थोर व्यक्तींच्या म्यूरल्सच्या (भिंतीवरील मोठय़ा चित्रांच्या) पंक्तीत डॉ.खानखोजे यांचे म्यूरल असून चित्राच्या शिरोभागी स्पॅनिश भाषेत लिहिले आहे की ‘आता गोरगरिबांनाही भाकर मिळेल’.
मेक्सिकोत सहकारी तत्त्वावर शेती करण्यासाठी कृषीवल संघ स्थापन केले. मका व जंगली वनस्पतीचे संकर करून तेवो-मका ही नवी जात निर्माण केली.त्यात एकेका ताटावर तीस-तीस कणसे येऊ लागली.जंगली वालावर संशोधन करून वर्षांतून दोनदा पीक देणारी जात विकसित केली. शेतकऱ्यांना पिकांची लागवड करता यावी म्हणून स्पॅनिश भाषेत वीस पिकांवर पुस्तिका छापल्या. नपुंसकांवर इलाज करण्यासाठी पूर्वी माकडांच्या ग्रंथीतून हार्मोन्स मिळवली जात. पण लोकांनी ओरड केल्यावर हे थांबवावे लागले; परंतु यावर उपाय म्हणून डॉ. खानखोजे यांनी मध्वालू या जंगली वनस्पतीपासून अशी हार्मोन्स मिळवली.मसाल्याचे अनेक पदार्थ त्यांनी मेक्सिकोत उगवून दाखवले. ते स्वत: शाकाहारी असल्याने त्यांनी जेवणात अनेक नवीन पदार्थ विकसित केले.
    – अ. पां. देशपांडे    मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  ऋऋ्रूी@ें५्रस्र्ंे४ेुं्र.१ॠ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजचे महाराष्ट्रसारस्वत        २० मे
१८५० > आधुनिक मराठी गद्याच्या सन १८०० पासूनच्या नवपरंपरेला अधिक प्रभावी रूप प्राप्त करून दिल्यामुळे ‘आधुनिक मराठी गद्याचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म. ‘मालाकार’ अशीही ख्याती असलेल्या विष्णुशास्त्रींची ‘निबंधमाला’ (खंड १ ते ३) पुढे ग्रंथरूप झाली. ‘विनोद व महदाख्यायिका’, ‘विद्वत्ता आणि कवित्व व वक्तृत्व’ अशी सैद्धान्तिक, तर ‘संस्कृत कविपंचक’, ‘सुभाषित’, ‘मयूरकविविरचित मुक्तामाला’ ही संपादित पुस्तके त्यांच्या वाङ्मयाभ्यासाची साक्ष देतात. वडील कृष्णशास्त्री यांच्या निवडक लेखांचा संग्रह विष्णुशास्त्री यांनी दोन भागांत केला.
१८७८ > कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे निधन. देशी (संस्कृत) व इंग्रजी शिक्षणाच्या संस्कारांनी समृद्ध झालेल्या कृष्णशास्त्रींनी अनुवादावर अधिक भर दिला. ‘अन्योक्ती’ हा काव्यप्रकार त्यांनी मूळ संस्कृत सुभाषितशारंगधराआधारे मराठीत आणला, कालिदासाच्या मेघदूताचाही अनुवाद ‘पद्यरचनावलि’त केला. ‘अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी’ (१९१३) हे पुस्तकही त्यांचेच. सॉक्रेटिसचे चरित्र, पुत्र विष्णुशास्त्री यांच्यासह सॅम्युअल जॉन्सनच्या ‘रासेलस’चा अनुवाद केला.
संजय वझरेकर

वॉर अँड पीस                               पोटदुखी : अनुभविक उपचार झ्र् ३
१) ढेकरा, उचकी, पोटफुगीमुळे पोट दुखल्यास प्रवाळपंचामृत, शंखवटी ३ गोळ्या, पंचकोलासव गरम पाण्याबरोबर, जेवणानंतर घेणे. उष्ण औषध सहन होत नसल्यास पंचकोलासवाऐवजी पिप्पलादि काढा; वायू जास्त असल्यास पाचक चूर्ण पाव चमचा दोन्ही जेवणानंतर घ्यावे. २) आम्लपित्तामुळे पोट दुखत असल्यास लघुसूतशेखर सकाळी- सायं. ३ गोळ्या, प्रवाळपंचामृत व आम्लपित्त वटी जेवणानंतर ३ गोळ्या घेणे. ३) अल्सर वा व्रणामुळे पोट दुखत असल्यास रिकाम्या पोटी महातिक्तघृत २ चमचे व प्रवाळपंचामृत ३ ते ६ गोळ्यांपर्यंत दोन्ही जेवणानंतर घ्याव्यात. ४) जंत/कृमी असल्यास कृमीनाशक ३ गोळ्या रिकाम्यापोटी दोनदा बारीक करून घ्याव्या. जेवणानंतर सातापा काढा/ विंडगारिष्ट ४ चमचे घ्यावे. ५) मूतखडय़ामुळे पोट दुखल्यास गोक्षुरादि ६गोळ्या व रसायन चूर्ण १ चमचा २ वेळा घ्यावे. गोक्षुरक्वाथ जेवणानंतर चार चमचे पाण्याबरोबर घ्यावा. सोबत आम्लपित्त वटी तीन गोळ्या घ्याव्या. रात्रौ गंधर्व हरीतकी एक चमचा, गरम पाण्याबरोबर घ्यावे. ६) आतडय़ांना पीळ पडला असल्यास जेवणानंतर प्रवाळपंचामृत व शंखवटी ३ गोळ्या घ्यावात व संपूर्ण विश्रांती घ्यावी. मलावरोध असल्यास त्रिफळा चूर्ण घ्यावे. अ‍ॅपेंडिक्सला सूज असल्यास शंखवटी/लशुनादि वटी ३ गोळ्या किंवा पाचक चूर्ण अर्धा चमचा प्रत्येक जेवणानंतर वा खाण्यानंतर घ्यावे. ७) रिकाम्यापोटी दुखल्यास प्रवाळपंचामृत ३ गोळ्या दोन्ही जेवणांनंतर, शतावरीकल्प ३ चमचे ३ वेळा दुधातून घ्यावा. अल्सर अवस्था असल्यास सकाळ-सायं. शतावरी धृत २ चमचे घ्यावे. ८) आव किंवा वायू मोठय़ा आतडय़ास पोटदुखीस कारण असल्यास रिकाम्यापोटी २ वेळा आरोग्यवर्धिनी व त्रिफळागुग्गुळ ३ गोळ्या; जेवणानंतर आम्लपित्तवटी ३ गोळ्या व फलत्रिकादि काढा ४ चमचे; झोपताना १ चमचा गंधर्वहरीतकी वा त्रिफळा चूर्ण घ्यावे. ९) मलावरोधामुळे पोटदुखी असल्यास जेवणानंतर अभयारिष्ट ४ चमचे पाण्याबरोबर; त्रिफळागुग्गुळ व आरोग्यवर्धिनी ३ गोळ्या घ्याव्यात.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..       एक सुंदर पहाट
गुडघ्याच्या खालच्या निमुळत्या होणाऱ्या पावलापर्यंतच्या भागातल्या गंभीर जखमांमुळे उघडय़ा पडलेल्या आणि मोडलेल्या हाडांवर त्वचारोपण कसे करायचे हा विचार सतवत असताना मी एक दिवस माझ्या बरोबरच्या गोपाळ नावाच्या निवासी डॉक्टरला म्हटले, ‘गोपाळ एका उघडलेल्या पुस्तकाचे चित्र मनासमोर आण. त्याला उजवे आणि डावे पान असते. समजा उजव्या पानाच्या मधोमध जखम आहे. डावे पान फिरवून पिळून या जखमेवर लावणे अशक्य आहे हे आपल्याला माहीत आहे. समजा, डाव्या पानावरच्या त्वचेचा फक्त बाहेरचा पापुद्रा आपण काढला तर ते सोलले जाईल, मग जर हे डावे पान शिवणीवर आधारित आपण उजव्या पानावर उलटवून आरूढ केले तर जखमेवर आवरण होईल. जिथे आपण उलटण्याची प्रक्रिया करणार त्या शिवणीत जर रक्तवाहिन्या शाबूत असतील तर हे त्वचारोपण यशस्वी व्हायला हवे. एका झटक्यात हाडावर आवरण बसेल जखम बरी झाली तर मोडलेले हाड लवकरच सांधले जाईल.’ गोपाळ माझ्याकडे बघतच राहिला.
पारंपरिक विज्ञान शिकून आलेल्या या विद्यार्थ्यांला ही पानांची कोलांटी उडी भारी गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण कोणास ठाऊक याने उत्साहाने मान डोलावली आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही ती शस्त्रक्रिया केली आणि ती यशस्वी झाली हे तीन-चार दिवसांतच स्पष्ट दिसू लागले. खरे तर या यशाने मी भांबावलो. मी लायब्ररीत गेलो आणि अनेक वर्षांची जर्नल्स धुंडाळली, पुस्तके बघितली पण असली शस्त्रक्रिया झाल्याचे उल्लेखच कोठे सापडेना. तेव्हा मी स्वत:ला चिमटे काढू लागलो, मग धीर धरून असल्या तीन-चार शस्त्रक्रिया मी गोपाळच्या मदतीने केल्या. त्या शंभर टक्के यशस्वी झाल्यावर एका तऱ्हेने सुटकेचा नि:श्वास टाकला आणि दुसऱ्या बाजूने माझा आनंद गगनात मावेनासा झाला.
महाराष्ट्रातल्याच काय भारतातल्या सगळ्यात तरुण विभागात एका नव्या शस्त्रक्रियेने जन्म घेतला होता. गरीब विपन्न जखमी झालेल्या रुग्णांसाठी हा उपाय होता, हा अगदीच कमी खर्चाचा आणि कमी वेळ लागणारा उपाय होता. याला कोठलेही अत्याधुनिक उपकरण लागणार नव्हते. शस्त्रक्रिया झाल्यावर रुग्णालयात जास्त दिवस काढण्याची गरज नव्हती. ज्या कारणांमुळे किंवा जो हेतू ठेवून मी भारतात परत आलो होतो, तो हेतू साध्य झाला होता. केवढा मोठा कर्मधर्म संयोग हा. या शस्त्रक्रियेमुळे माझ्या छोटय़ा मनोविश्वात एक फार मोठी गोष्ट घडली होती. आपण भारतीयही काही कमी नाही, असा विचार पहिल्यांदा अवतरला. त्या काळात परदेशातल्या प्लास्टिक सर्जरीच्या वैज्ञानिक जर्नल्समध्ये भारतीय नावे औषधाला शोधून सापडणे दुर्मीळ होते. तेव्हा मी असे काहीतरी प्रसिद्ध करू शकेन असे स्वप्नातही नव्हते. पण ते न पडलेले स्वप्न खरे ठरायचे होते. त्याबद्दल उद्या.
रविन मायदेव थत्ते 

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Work of dr pandurang khanakhoje in mexican