नीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com

मूळच्या अल्बेनियाच्या असलेल्या अग्नेस या त्यांच्या वयाच्या केवळ एकोणिसाव्या वर्षी मिशनरी कार्यासाठी १९२९ साली सिस्टर तेरेसा या नावाने भारतात दार्जिलिंग येथे आल्या. अग्नेसना खरे तर मिशनरी कार्यासाठी आपले नाव ‘थेरेसा’ लावण्याची इच्छा होती. परंतु या नावाच्या एक संत होऊन गेल्यामुळे त्या सिस्टर तेरेसा झाल्या. १९३१ मध्ये मिशनच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी ब्रह्मचर्य, गरिबांची, आजाऱ्यांची सेवा करण्याची पहिली व्रतशपथ घेतली. त्यानंतर त्यांना कोलकाता येथील लॉरेटो सिस्टर्सच्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून पाठविण्यात आलं. ही शाळा बंगाली माध्यमाची होती. अल्पावधीतच एक उत्कृष्ट शिक्षिका म्हणून त्यांचं नाव झालं. मिशनच्या रिवाजाप्रमाणे त्यांचा अंतिम व्रतशपथ ग्रहण समारंभ १९३९ साली झाला. या समारंभामुळे त्या ‘सुपिरियर’ म्हणजे ज्येष्ठ संन्यासिनी या पदावर पोहोचल्या आणि आता त्या ‘मदर तेरेसा’ झाल्या. त्यांच्या विद्यार्थिनींप्रति ममता आणि मृदू स्वभावामुळे त्या विद्यार्थी आणि सहकारी शिक्षकांमध्ये प्रिय झाल्या होत्याच, १९४४ मध्ये त्यांना सेंट मेरी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका या पदावर नियुक्त केले गेले.

दार्जििलग, कोलकाता येथील काही वस्त्यांमधील लोकांचे दारिद्रय़, रोगराई, हालअपेष्टा पाहून मदर तेरेसांना या लोकांसाठी काहीतरी करावे असे प्रकर्षांने जाणवत होते. एकदा रेल्वेने दार्जिलिंगला जात असताना त्यांना गोरगरिबांच्या सेवेसाठी ‘ईश्वरी आवाहन’ होत असल्याचे जाणवू लागले. कोलकात्याला परतल्यावर मदरनी सेंट मेरी हायस्कूलमधील शाळेचे काम सोडले आणि दु:खितांच्या सेवेसाठी आपले निराळे मिशन सुरू करण्यासाठी परवानगी, कॅथलिक धर्मासनाकडे मागितली. तशी अनुमती मिळाल्यावर केवळ आपल्या जवळच्या पाच रुपयांच्या पाठबळावर त्यांनी १९४८ च्या अखेरीस ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ हे मिशन त्यांनी स्थापन केलं. कोलकाता शहराच्या मध्यभागी असलेल्या मोतीझील या वस्तीत राहून काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सर्वत्र घाणीचं साम्राज्य, रोगराई, उपासमारी असलेल्या मोतीझील भागात मदर तेरेसांनी एका झाडाखाली शाळा सुरू करून आपले कार्य सुरू केलं!