सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com

जन्मानं अमेरिकन असलेल्या दीदी किनझिंगर, कोलरॅडो विद्यापीठात कलाशिक्षण घेतल्यानंतर भारतीय पतीसह मुंबईस आल्या. त्यांनी जुहू बीचजवळ स्वत:साठी जे घर बांधले त्याच्या वेगळेपणाने दीदी कॉन्ट्रॅक्टरांचे नाव एक वैशिष्टय़पूर्ण स्थापत्यकार म्हणून झाले. पृथ्वीराज कपूर यांनी आपल्या ‘पृथ्वी कुटीर’चे काम दीदींना दिल्यावर त्यांच्याकडे अनेक मोठय़ा इमारतींची, त्यांच्या अंतर्गत सजावटीची कामे आली. त्यामध्ये उदयपूरच्या लेक पॅलेसचे आलिशान हॉटेलमध्ये रूपांतर  होत असताना तेथील अंतर्गत सजावट करणे तसेच ‘द गुरू’ या र्मचट आयव्हरींच्या सिनेमाचे सेट्स वगैरे कामे आहेत.

हिमाचल प्रदेशात १९२० साली एका आयरिश नाटय़ कलाकाराने अंद्रेता या गावात कलाकारांसाठी वसाहत बांधली असं ‘पापाजी’ म्हणजे पृथ्वीराज कपूर यांनी दीदींना सांगितलं. १९७४ मध्ये दीदींनी या वसाहतीला भेट दिली आणि त्या हिमाचल प्रदेशच्या प्रेमात पडून त्यांनी धरमशाला गावाजवळच्या सिद्धबारीचा परिसर हे आपले कार्यक्षेत्र पक्के केले. या काळात त्या पतीपासून विभक्त झालेल्या होत्या. मुलांना घेऊन दीदींनी तडक धरमशाला गाठलं. एका डॉक्टरच्या दवाखान्याचं आणि घराचं बांधकाम हे दीदींचं तिथलं पहिलं काम. त्यांच्याकडे पुढे गृहबांधणीची मोठमोठी कामं आली. केवळ माती, दगड, लाकूड आणि चुन्यात बांधलेली, आगळ्यावेगळ्या रंगसंगतीची हिमाचलमधील हवामानाला अनुकूल अशी ही घरं पाहून संपूर्ण हिमाचल प्रदेशातून त्यांना कामं मिळाली.

गृहनिर्माणाशिवाय दीदींनी इतर बांधलेल्या इमारतींमध्ये हिमाचल प्रदेशची विधानसभा, ‘निष्ठा’ या संस्थेच्या केंद्राचे (रूरल हेल्थ, एज्युकेशन अ‍ॅण्ड एनव्हायर्नमेंट सेंटर) बांधकाम, बीर येथील ‘संभावना इन्स्टिटय़ूट’ वगरेंचा समावेश आहे. दीदी कॉन्ट्रॅक्टरच्या कार्यावर आधारित ‘दीदी कॉन्ट्रॅक्टर-मॅरिइंग अर्थ टू द बिल्डिंग’ हा लघुपट (डॉक्युमेंटरी) एका स्विस चित्रनिर्मात्याने, तसेच ‘अर्थ क्रुसेडर’ हा माहितीपट भारत सरकारने बनवली आहे. आज ८९ वर्षांचे वय असलेल्या दीदी कॉन्ट्रॅक्टर उमेदीने, अविरत काम करताना अजूनही दिसतात, स्थानिक लोकांमध्ये मिसळून!

 

Story img Loader