प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी पृथ्वीला विश्वाचे केंद्रस्थान मानले, तिला वेगवेगळे आकारही दिले. इ.स.पूर्व सहाव्या शतकात मिलेटस येथील थेल्स याच्या मते पृथ्वी ही प्रचंड समुद्रात तरंगणारी सपाट चक्ती होती. त्याच सुमारास अॅनेग्झिमँडेर याने पृथ्वीला सिलिंडरचा आकार दिला. पृथ्वीला प्रथमच गोलाकार दिला गेला तो बहुधा इ.स.पूर्व सहाव्या शतकातील पायथॅगोरसद्वारे – कारण चंद्र-सूर्य गोलाकार असल्यामुळे पृथ्वीही गोलाकार असली पाहिजे. पृथ्वीला विश्वाच्या केंद्रस्थानी न मानणाऱ्या काही मोजक्या तत्त्ववेत्त्यांत पायथॅगोरसची गणना होते. त्याच्या मते पृथ्वी स्थिर नसून ती चंद्र, सूर्य आणि ग्रहांसह एका अदृश्य अग्नीभोवती फिरत आहे. पृथ्वीला विश्वाच्या केंद्रस्थानी न मानणारा आणखी एक ग्रीक खगोलतज्ज्ञ म्हणजे आरिस्टार्कस. काळाच्या पुढे असणाऱ्या या आरिस्टार्कसने इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात, पृथ्वी इतर ग्रहांसह सूर्याभोवती फिरत असल्याचे मत व्यक्त केले.
इ.स.पूर्व चौथ्या शतकात, ग्रीक तत्त्वज्ञ अॅरिस्टोटलने संपूर्ण विश्वरचनेचे प्रारूप मांडले. यानुसार सर्व ग्रह, तसेच चंद्र व सूर्य हे विविध आकारांच्या गोलकांवर वसले आहेत. एका पारदर्शक पदार्थाने बनलेले हे गोलक एकात एक वसलेले असून, त्यांच्या केंद्रस्थानी पृथ्वी वसली आहे. चंद्राचा गोलक सर्वात लहान असून पृथ्वीपासून तो सर्वात जवळ आहे; सर्वात मोठा गोलक ताऱ्यांचा असून तो पृथ्वीपासून सर्वात दूर आहे. हे गोलक स्वतभोवती वेगवेगळ्या अक्षांत आपापल्या स्थिर गतीने फिरत आहेत. प्रत्येक गोलकाच्या गतीमुळे, त्यावरील ग्रहसुद्धा वेगवेगळ्या गतीने वर्तुळाकार कक्षेत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालीत आहेत. ग्रहांना मिळालेली ही गती नैसर्गिक गती आहे.
अॅरिस्टोटलने पृथ्वी गोलाकार असल्याचे योग्य मत मांडले. याचे एक कारण म्हणजे जसे दक्षिणेला जाऊ, तसे दक्षिणेकडील तारे अधिकाधिक वर आलेले दिसतात. दुसरे कारण म्हणजे चंद्रग्रहणात चंद्रावर दिसणारा पृथ्वीच्या सावलीचा गोलाकार. अॅरिस्टोटलने वर्तुळ ही आदर्श आकृती मानली. त्यामुळे अवकाशस्थ वस्तूंच्या कक्षांचे आकार हे फक्त वर्तुळाकारच असायला हवेत. तसेच त्याच्या मते चंद्र-सूर्याचा पृष्ठभाग हा गुळगुळीत आणि कलंकरहितच असायला हवा. अॅरिस्टोटलची पृथ्वीकेंद्रित ‘आदर्श आणि निर्दोष’ अशा विश्वाची ही संकल्पना, कालांतराने तिला मिळालेल्या धार्मिक पाठबळामुळे युरोपातील समाजात घट्टपणे रुजली आणि या संकल्पनेचा पगडा जवळजवळ दोन सहस्रके टिकून राहिला.
– डॉ. राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org