‘‘जगामधील सर्वात मोठा प्राणी कोणता?’’ असा प्रश्न जर कुणी विचारला तर पटकन उत्तर येते ‘ब्लू व्हेल’ हा सागरी सस्तन प्राणी. यास कारणसुद्धा तेवढेच सबळ आहे. या सागरी प्राण्याची लांबी तब्बल ३० मीटपर्यंत, तर वजन अंदाजे २०० मेट्रिक टन एवढे प्रचंड असते. जगामधील सर्वात मोठा प्राणी कोणता याचे उत्तर मिळाल्यावर साहजिकच मनात कुतूहल निर्माण होते ते सर्वात लहान प्राणी कोणता असावा? यासाठी मात्र तुम्हाला विज्ञानाची मदत घ्यावयास हवी. सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने शास्त्रज्ञ याचाच शोध घेत होते आणि त्यांना ‘टार्डिग्रेड’ या प्राण्याने उत्तर दिले ‘‘मीच सर्वात लहान आहे’’. ‘टार्डिग्रेड’ ला इंग्रजीमध्ये ‘वॉटर बेअर’ (मराठीत ‘पाण्यामधील अस्वल’) असेही म्हणतात. शास्त्रज्ञांनी पाण्याचा थेंब काचपट्टीवर घेऊन याचा आकार मोजला तेव्हा तो होता ०.१ मिमी. पण हाच काही सर्वात छोटा प्राणी नाही हे आता इलेक्ट्रॉन सुक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने पुन्हा विज्ञानानेच सिद्ध केले आहे.
आता जगामधील सर्वात लहान प्राणी ठरवण्यात आला आहे तो म्हणजे ‘मिक्सोझोअन’, जो दहा मायक्रॉन एवढाच आहे. ‘मिक्सोझोअन’ हा प्रवाळ कुळामधील असून तो एवढा लहान आहे की त्यास प्राणी कुळात समाविष्ट करण्यास शास्त्रज्ञ धजतच नव्हते. अनेकजण त्यास बहुपेशीय ‘प्रोटिस्ट’ ज्यात एकपेशीय सजीवांचा समावेश करण्यात येतो त्या कुळात समजत होते. काही जण त्याच्या शरीरामधील पोकळ नलिकेमुळे त्यास ‘निडारियाच्या जवळचा समजत. मात्र जैविकतंत्रज्ञानाचा गेल्या दोन दशकांत जास्त वापर सुरू झाला तेव्हा निसर्गामधील हा सर्वात छोटा परजीवी, प्राणी विभागात समाविष्ट करण्यात आला.
या प्राण्याला त्याचे जीवनचक्र पूर्ण करण्यास मुख्य यजमान माशाबरोबर, वलयी कुळामधील वेटोळया कृमींची पर्यायी यजमान म्हणून मदत घ्यावी लागते. उत्क्रांतीच्या ओघामध्ये ‘मिक्सोझोअन’मधील वायूरूपी श्वसनाचा गुणधर्म नाहीसा झाला त्यामुळेच एकपेशीय जीवासारखा हासुद्धा कमी अथवा प्राणवायूविरहित स्थितीमध्ये जगू लागला. म्हणूनच त्याच्या शरीरात ऑक्सिजनरहित चयापचय यंत्रणा दिसून येते. हा स्वत:च्या यजमानास फारशी हानी पोहचवत नसला तरी त्याच्या जलीय यजमानांना चवीने खाणाऱ्यांना पोटाचे विकार होऊ शकतात, म्हणजे हा मानवाला बाधा आणू शकतो. थोडक्यात असे आहे नाते निसर्गातील तीन भिन्न जीवांचे जे शोधून काढायला मदत झाली आधुनिक तंत्रज्ञानाची!
– डॉ. नागेश टेकाळे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : http://www.mavipa.org