कुतूहल
सूतनिर्मितीचे तंत्र -२
काही तंतू हे खूपच म्हणजे कित्येक किलोमीटपर्यंत लांब असतात (उदा. रेशीम). अशा तंतूंना ‘अखंड तंतू’(फिलामेंट) असे म्हणतात. अखंड तंतूंपासून सूत तयार करण्यासाठी सूतकताई प्रक्रियेची गरज असत नाही. फक्त अनेक अखंड तंतू एकत्र करून त्याचे सूत तयार करण्यात येते. अखंड तंतूंपासून तयार केलेल्या सुतास ‘धागा’ असे संबोधण्यात येते. धागा हा पीळ न देता किंवा गरजेप्रमाणे पीळ देऊन वापरला जातो. निटिंगकरिता वापरला जाणारा धागा कमी पीळ दिलेला असतो तर शिलाईकामासाठीचा धागा अधिक पीळ दिलेला असतो.
सूत हे सामान्यत: एकेरी रूपात वापरले जाते. परंतु काही उपयोगासाठी सुताचे दोन किंवा अधिक पदर एकत्र करून त्याला पीळ देण्यात येतो. या प्रक्रियेला दुहेरीकरण (डब्लिंग) असे म्हणतात.
जेव्हा सुताचा एकच पदर वापरला जातो तेव्हा त्या सुतास ‘एकपदरी सूत’(सिंगल यार्न) किंवा नुसतेच ‘सूत’(यार्न) असे म्हटले जाते. सुताचे दोन किंवा अधिक पदर एकत्र करून त्याला पीळ देऊन जे सूत तयार केले जाते त्यास ‘दुहेरी सूत’ (डबल्ड यार्न) असे म्हणतात. उच्च दर्जाच्या कापडाच्या निर्मितीमध्ये (उदा. महागडे शर्ट, पॅण्ट यांना लागणारे कापड, वायल, जॉर्जेट इत्यादी.) तसेच ज्या सुतामध्ये अधिक ताकद लागते (उदा. शिवणदोरा, उद्योगात वापरले जाणारे सूत) अशा सुताच्या निर्मितीमध्ये दुहेरी सुताचा वापर होतो.
काही उपयोगासाठी मोठी ताकद असलेले सूत लागते. यासाठी दोन किंवा अधिक दुहेरी सुते एकत्र करून त्यांना पीळ देऊन सूत तयार करण्यात येते. अशा प्रकारे तयार केलेल्या सुताला ‘केबल’ सूत असे म्हणतात. केबल सुताचा वापर दोर किंवा दोरखंड तयार करण्यासाठी केला जातो. सुताप्रमाणे धाग्याचे सुद्धा प्रकार आहेत. धाग्याचे दोन किंवा अधिक पदर एकत्र करून (पीळाशिवाय) जे सूत तयार केले जाते त्यास बहुपदरी सूत असे म्हणतात. याशिवाय धाग्यापासूनसुद्धा दुहेरी सूत किंवा केबल सूत तयार केले जाते. सतरंजीचे उत्पादन करताना असे बहुपदरी सूत वापरले जाते.

चं. द. काणे (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर
तोफ सलामी
ब्रिटिश साम्राज्यातील विविध पदांवरील व्यक्तींना, मांडलीक राजे आणि त्यांची संस्थाने आणि काही विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार आणि मानसन्मान देण्याची प्रथा होती. विशेष कार्यक्रम प्रसंगी या व्यक्ती येत त्यावेळी त्यांचे स्वागत तोफांची सलामी देऊन केले जाई. तोफसलामींची संख्या ही त्या व्यक्तीच्या किंवा राज्याच्या ब्रिटिश साम्राज्यात असलेल्या प्रतिष्ठेच्या निर्देशांक समजला जाई.
ब्रिटिश सम्राट अगर सम्राज्ञीला सर्वाधिक १०१ तोफांची सलामी तर त्यानंतर व्हाइसरॉयला ३१ सलामी होत्या. ब्रिटिश राजमध्ये असलेल्या ५६५ संस्थानांपकी १२२ संस्थानांना तोफ सलामीचा मान होता. हा मान असलेल्या संस्थानांना ‘सॅल्यूट स्टेट’ असे संबोधले जाई. सर्वाधिक २१ तोफ सलामींचा मान प्रथम हैदराबाद, बडोदा आणि म्हैसूर या राज्यांना होता. पुढे जम्मू-काश्मीर आणि ग्वाल्हेर या राज्यांनाही हा मान मिळाला. भोपाळ, इंदूर, उदयपूर, कोल्हापूर वगरे सहा राज्यांना १९ सलामी होत्या. बाकी संस्थानांपैकी ८८ राज्यांना ११ ते १७ तोफांच्या, तर २३ संस्थानांना नऊ तोफांच्या सलामींचा मान होता. काही छोटय़ा संस्थानांना तीन पासून सात सलामींचा मान होता. थोडक्यात, तीनपासून एकवीसपर्यंत विषम संख्येने या सलामी होत्या.
सलामींचा मान असलेल्या संस्थानिकांचे ब्रिटिश भारताच्या राजधानीत म्हणजे प्रथम कलकत्ता आणि नंतर दिल्लीत आगमन होई, तेव्हा या तोफांच्या सलामी दिल्या जात. कलकत्त्यात राजधानी असताना बंदरातील रॉयल नेव्हीच्या जहाजांवर या सलामी होत; तर दिल्लीमध्ये लष्करी तळांवर या सलामी होत. सन १८७७, १९०३ आणि १९११ मध्ये ब्रिटिश सम्राट किंवा सम्राज्ञींच्या राज्यारोहण सोहळ्याचा एक भाग म्हणूनही या तोफसलामी दिल्या गेल्या. १९११ साली सम्राट पंचम जॉर्ज आणि सम्राज्ञी मेरी हे भारत भेटीसाठी आले तेव्हा दिल्लीमध्ये भव्य दरबार भरविला गेला. त्या वेळी तीन दिवस या तोफसलामी चालू होत्या. त्यावेळी आसपास राहणारे दिल्लीकर तोफांच्या आवाजाने हैराण झाले होते!

सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com