येमेन हा जगातील प्राचीन कॉफी उत्पादक देशांपैकी एक आहे. जगात कॉफीची व्यावसायिक लागवड ही प्रथम येमेनमध्ये सुरू झाली. येथील कॉफी बिया विविध प्रदेशांमध्ये पोहोचल्यावर तिथे कॉफीची लागवड सुरू झाली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस मात्र येमेनी लोकांनी कॉफीपेक्षा अधिक किफायतशीर अशी काथ वृक्षांची लागवड सुरू केली आणि कॉफी उत्पादन कमी झाले. त्याचप्रमाणे येमेनमध्ये होणारी ज्वारी ही विशेष चांगल्या दर्जाची समजली जाते. तिथे अनेक प्रकारची ज्वारी पिकते. येमेनी अर्थव्यवस्थेत काथ, कॉफी, मासे, खनिज तेल, द्रवीभूत नैसर्गिक वायू यांच्या निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा वाटा आहे. ही निर्यात चीन, थायलंड, भारत, दक्षिण कोरिया या देशांना होते.
लाल समुद्राच्या दक्षिण टोकाकडील वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थानामुळे येमेनचा प्रदेश पूर्व-पश्चिम सागरी व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण बनले. पूर्वेकडून चालणारे मसाल्याचे पदार्थ, रेशीम, सुगंधी पदार्थ यांच्या व्यापारावर येमेनच्या एडन या बंदराचे आणि शहराचे नियंत्रण अगदी प्राचीन काळापासून राहिले आहे. त्याचप्रमाणे या व्यापारामुळे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतींचा प्रभाव येमेनी जीवनशैलीवर पडलेला दिसतो.
प्राचीन काळात येमेनी प्रदेशात सॅबीअन्स या वंशाच्या लोकांची वस्ती होती. या सॅबीअन्स लोकांचे बायबलमध्ये अनेक वेळा उल्लेख आलेले शिबा किंवा साबा या नावाचे प्रबळ राज्य येमेनमध्ये होते. इ.स.पूर्व काळात येमेनी लोकांचा धर्म ज्यू म्हणजे ज्युदाइझम होता. चौथ्या शतकात येथे ख्रिश्चन धर्म प्रसार पावला, तर सातव्या शतकात सर्व येमेन इस्लामव्याप्त झाला. इ.स. नववे शतक ते १६ वे शतक या काळात या प्रदेशात अनेक लहान लहान राजसत्तांचा अंमल झाला. १४९८ साली भारतीय जलमार्गाचा शोध घेत असताना वास्को दी गामा येमेनच्या एडनमध्ये काही दिवस राहिला. तोच या प्रदेशात येणारा पहिला युरोपियन. पुढे पोर्तुगीज एडन आणि उर्वरित येमेनवर कब्जा करतील या भीतीने इस्तंबूलच्या ऑटोमान तुर्कांनी मोहीम काढून येमेनचा साधारणत: अर्धा प्रदेश त्यांच्या साम्राज्यात जोडला. या काळात जगात हा एकच देश कॉफी उत्पादक देश होता आणि अरबी समुद्रातून लाल समुद्राकडे जाणाऱ्या व्यापारी जलमार्गावर असलेल्या येमेनच्या किनारपट्टीतील प्रदेशावर ब्रिटन वगैरे युरोपियन सत्तांचाही डोळा होता.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis94@gmail.com