|| उष:प्रभा पागे

‘पर्यावरणीय तत्त्वज्ञान’ यात उच्च शिक्षण घेतलेल्या व पर्यावरण शिक्षण आणि निसर्ग संवर्धन हेच कामाचे ध्येय ठरवलेल्या मृणालिनी पेंडसे-वनारसे यांनी ओढय़ांच्या पुनरुज्जीवनासाठी २००७ मध्ये ‘निर्मल गंगा’ अभियानाला सुरुवात केली. उद्दिष्ट होते ओढय़ांच्या पुनरुज्जीवनाचे -ओढा वाहता ठेवायचा, त्यांच्या काठावरचे नैसर्गिक जीवन फुलवायचे. त्याच बरोबरीने ग्रामीण भागातील लोकांसाठी उपजीविकेचे काही पर्यायही तिने दाखवून दिले.

‘ऐल तटावर, पैल तटावर हिरवाळी लेवून, निळा सावळा झरा वाहतो बेटाबेटांतून’

झरा, ओढा या निसर्गातील एका परिसंस्थेचे बालकवींनी केलेले किती समर्पक वर्णन आहे हे! काही दशकांपूर्वी हे वास्तव होते पण आता नाही. आता असे बारमाही झरे दुर्मीळ झाले आहेत. जे आहेत त्यांच्यात बदल झाला आहे, त्यांच्या काठी झाडी, हिरवळ राहिली नाही. इकॉलॉजिकल सोसायटीची माजी विद्यार्थी आणि काही काळ कार्यकारी निदेशक असलेल्या मृणालिनी पेंडसे-वनारसेने ओढय़ांच्या पुनरुज्जीवनाची संकल्पना सोसायटीच्या गोळेसरांपुढे मांडली. त्यासाठी आर्थिक तरतूद झाली आणि २००७ मध्ये ‘निर्मल गंगा’ या अभियानाची सुरुवात झाली.

उद्दिष्ट होते ओढय़ांच्या पुनरुज्जीवनाचे -ओढा ही एक जिवंत परिसंस्था म्हणून कार्यरत राहील असे बघायचे, ते वाहते ठेवायचे, त्यांच्या काठावरचे नैसर्गिक जीवन फुलवायचे. ओढय़ातील बहुविध जलचरांचे आसरे राखायचे, सजीव सृष्टीला दीर्घकाळ निर्मळ पाणी कसे उपलब्ध होईल ते पाहायचे. थोडक्यात, त्यांना नैसर्गिक सुस्थितीत आणायचे. तेही त्या त्या गावकऱ्यांच्या सहभागातून. ओढा लहान असो वा मोठा, अल्प काळ वाहता असो की दीर्घकाल, कोणत्याही भूभागाचा तो संवेदनशील घटक असतो. कमी पावसाच्या प्रदेशात तर तो अधिक महत्त्वाचा.

सह्य़ाद्री प्रदेशात डोंगरावरून, देवराईतून जंगल भागातून पाण्याचे लहान प्रवाह उगम पावतात, अशा अनेक प्रवाहांनी मिळून बनते उपनदी आणि त्या एकत्र येऊन नदी बनते. त्यांचे एक जाळेच बनते, म्हणजे नदीचे खोरे किंवा पाणलोट क्षेत्र. त्यातून मातीचे वहन, खनन आणि भरण या क्रिया सतत चालू असतात, भूगर्भाखालील पाण्याचेही भरण ओढे, नद्या करत असतात. ही सगळीच गतिशील व्यवस्था आहे. पडलेल्या पावसाचे पाणी समुद्राकडे नेणारी.. ओढय़ांकाठाचे वनस्पती, प्राणीजीवन वैविध्य थक्क करणारे आहे. पण अनेक ठिकाणी ओढे वाहते नाहीत, त्यांच्यावर कचऱ्याचे किंवा शेतीचे, बांधकामाचे आक्रमण झाले आहे.

ओढे निर्मल वाहते राहणे, ही सजीव सृष्टीची गरज आहे. म्हणून हा प्रकल्प मृणालिनीने हाती घेतला. सुरुवातीला ३ गावं या योजनेत सहभागी झाली. प्रत्येक ठिकाणी ओढय़ाची स्थिती वेगवेगळी होती, त्यांचा अभ्यास करून उपाययोजना ठरवावी लागली. वावोशी गावाच्या एका शाळा शिक्षकांनी पुढाकार घेतला. त्यामुळे मुले पुढे आली आणि ओढय़ाकाठी वनसृष्टी, गवत राखणे, ओढय़ाकाठची दुरुस्ती, ओढय़ात दगडी बांध घालणे ही कामे मुलांनी हौसेने केली. आधी ओढय़ात कचरा टाकणारे लोक मुलांच्या सांगण्यामुळे तसे करेनाशी झाली. वनस्पती पाण्याची गुणवत्ता वाढवतात आणि जलचरांसाठी अन्ननिर्मिती करतात, अशा गोष्टी मुले चटकन लक्षात ठेवतात. हा प्रकल्प मृणालिनीने ग्रामीण भागात नेटाने ४ वर्षे चालविला. बऱ्याच कालावधीनंतर ती त्यापैकी एका गावी गेली तेव्हा तिथली आता मोठी झालेली मुले ओढय़ाकाठी बिया टाकत असलेली तिने पाहिली. तिने केलेले निसर्ग-संस्कार वाया गेले नव्हते हे तिच्या परिश्रमाचे फलित!

मृणालिनीने पदव्युत्तर शिक्षण म्हणजे एम.ए. केले ते चाकोरीबाहेरच्या ‘पर्यावरणीय तत्त्वज्ञान’ या विषयात. संस्कृत विषयातही तिने एम.ए. केले आहे आणि ‘प्राच्यविद्या’ विषयातही. म्हणजे ती तिहेरी एम.ए.आहे. इकॉलॉजिकल सोसायटीचा ‘नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन आणि शाश्वत विकास’ हा अभ्यासक्रमही तिने केला आहे. त्यामुळे तिच्या कामाची दिशा तिने पर्यावरण शिक्षण आणि निसर्ग संवर्धन अशी ठरवली ते अगदी स्वाभाविकच होते. ‘ग्रासलँड अ‍ॅण्ड सस्टेनेबल लाइव्हलीवूड मिन्स’ या विषयावर पेपर लिहिल्यामुळे तिला फोर्ड फाऊंडेशनची फेलोशिप मिळाली. बर्लिन-जर्मनी इथे भरलेल्या युरोपियन ‘बायोमास’ परिषदेमध्ये सादर करण्यासाठी तिच्या पेपरची निवड झाली. तमिळनाडू येथील पालार नदीकाठी राहणाऱ्या स्त्रियांसाठी या संस्थेने हाती घेतलेल्या स्त्रियांच्या आरोग्य प्रकल्पातही तिचा सहभाग होता. मॉरिशस बेटावर आयोजित ‘सेंद्रिय शेती आणि शाश्वत पर्यटन’ यावर होणारा पर्यावरणीय परिणाम या प्रकल्पाच्या सल्लागार समितीची ती सदस्य होती. ‘मिनिस्ट्री ऑफ एन्वायर्न्मेंट अँड फॉरेस्टसाठी पश्चिम घाटातील ओढय़ांचे पुनरुज्जीवन या विषयावर पश्चिम घाट पॅनेलसाठी तिने शोधनिबंध लिहिला आहे.

डॉ. सदानंद मोरे हे तिचे तत्त्वज्ञानाचे गुरू. त्यांच्याकडून विज्ञानाचे तत्त्वज्ञान ती शिकली. माणूस आणि निसर्ग यांच्यातील पर्यावरणीय संबंधाचा तात्त्विक अंगाने विचार करायची तिला सवय झाली. त्यामुळे माणसाच्या पर्यावरणाबद्दलच्या समस्या जाणून घ्यायला मदत झाली हे ती सांगते. प्रकाश गोळे हे तिचे ‘भवताल किंवा परिसर विज्ञान आणि पर्यावरण’ शास्त्रातील गुरू. या दोन गुरूंचे ऋण ती मानते. इकॉलॉजीच्या कोर्सने तर नवी दृष्टी मिळाली असे ती म्हणते. पर्यावरणीय तत्त्वज्ञानाची अभ्यासक असल्यामुळे तिची विचारांची दिशा तसेच भाषाशैली आणि मांडणी थोडी वेगळी आहे. मुलांबरोबर काम करताना निसर्ग-नियम मुलांना सांगताना ती लांडगा आणि कुत्रा यांचे उदाहरण देते. ‘कुत्रा माणसाळल्याने त्याचे जगणे सोपे झाले, लांडगा जंगलीच राहिला, अन्नासाठी त्याला रोज संघर्ष करावा लागतो, पण त्याने स्वातंत्र्य नाही गमावले.’ किंवा पृथ्वीच्या जन्मापासून जीवनावश्यक कार्बन आपल्यामध्ये आहे. आता मात्र नव्या तंत्रज्ञानामुळे मोबाइल आणि संगणक यामध्ये असलेले सिलिकॉन आपला ताबा घेत आहे आणि आपण त्याचे गुलाम बनत आहोत. म्हणून निसर्ग-स्नेही जीवनशैलीमध्ये शाश्वततेचे आश्वासन आहे असे तिला वाटते.

निसर्ग संवर्धनातून ग्रामीण भागातील लोकांसाठी उपजीविकेचे काही पर्याय तिने अभ्यास आणि प्रकल्पामध्ये केलेले प्रत्यक्ष काम यातून दाखवून दिले. एकेकाळी भूभागावर गवताळ कुरणे होती पशू, पक्षी, प्राणी त्यावर चरायची, पण औद्योगिकीकरण आणि रोख पैसा देणाऱ्या पिकांची शेती यामुळे गवताल कुरणे नष्ट झाली, त्याची किंमत आपल्याला कळली नाही. इकॉलॉजिकल सोसायटीने फलटणजवळ असा प्रयोग राबवून दाखवून दिले की कमी पावसाच्या प्रदेशात गवताळ कुरणे गुरांना चारा, शेतकऱ्याला उपजीविका आणि जमिनीवर गवत म्हणजे जैवभार निर्माण करून जमिनीला समृद्ध करतात. निसर्गप्रणाली मजबूत करतात. लोक सहभाग प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था मिळून हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो. मध्यंतरी महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. गुरांना चारा मिळेना अशी अवस्था झाली होती.  तेव्हा हे फलटणच्या भूभागावर जोपासलेले हे गवत शेतकऱ्यासाठी खुले केले. गवताळ भूभागाची किंमत तेव्हा कळली लोकांना. मृणालिनीने या भागात काम केले. या वर आधारित तिने एक पेपर प्रसिद्ध केला. त्याशिवाय बायोमास म्हणजे जैवभार, त्याच्या व्यवस्थापनाचा अभ्यास करून त्यावर तिने पेपर लिहिला. शेतीतील उरलेल्या, निरुपयोगी सेंद्रिय टाकाऊ गोष्टी म्हणजे उसाची चिपाडे, पीक कापल्यावर राहिलेली धाटे, यापासून इंधन – बायो फ्युएल -बनवणे शक्य आहे हे आता लोकांना माहीत झाले आहे. मोगली एरंड, करंज यांच्या बियापासूनही पर्यायी इंधन बनवता येते. पण हे करणे फायद्याचे नाही असे ती मांडते.

‘निर्झरगान’ या पुस्तकाचे संपादन तिने केले आहे. ओढय़ाचे पुनरुज्जीवन कसे करायचे याचे सखोल आणि शास्त्रीय विवेचन विविध प्रारूपातून आणि रेखाटनातून या छोटय़ा पुस्तिकेतून दाखविले आहे. ओढे आणि नदीकाठच्या झुडुपे झाडे, वृक्षवल्ली यांची सूचीही पुस्तकात मिळते. मृणालिनीने ‘बीएईएफ’ संस्थेबरोबर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात सातपुडा, नंदुरबार, जव्हार इथेही काम केले आहे. गेली १८ वर्षे तिचा इकॉलॉजिकल- परिसर -व्यवस्थापनाचा कार्यानुभव आहे. विविध शिक्षण संस्थांमध्ये ती पर्यावरण विषयाची व्याख्याती म्हणून जाते. पण तिला मुलांमध्ये आणि मुलांसाठी काम करायला आवडते. तिचा पती प्रसाद वनारसे नाटय़कर्मी आहे. ‘आनंदरंग’ ही मुलांसाठी अभिव्यक्ती माध्यम संस्था ते दोघे चालवतात. मृणालिनी स्वत: उत्तम नाटय़ाभिनय करते. ती गातेही छान. मात्र आता तिचा प्राधान्यक्रम मुलांना निसर्ग भान देणे हा आहे. शाळांमध्ये ती ‘मजेचा तास’ घेते. सकस मनोरंजनातून म्हणजे गप्पा-गाणी-गोष्ट अशातून मुलांचे कुतूहल जागृत ठेवायचे, त्यांना निसर्गाचे नियम हसत खेळत शिकवायचे, त्यांना प्रश्न पडले पाहिजेत, यातून त्यांना विचार प्रवृत्त करायचे असे त्याचे स्वरूप आहे. मुलांसाठी तिने ‘आपले अभयारण्य’ आणि ‘प्रश्नांचा दिवस’ अशी पुस्तके लिहिली आहेत. मासिकासाठी आणि वर्तमानपत्रासाठी ती लेखन करते. मुलांना निसर्गानुभव देऊन त्यांच्या निसर्ग संवेदना जाग्या करण्याचे महत्त्वाचे काम मृणालिनी करते आहे. तिच्या या सर्व प्रयत्नांसाठी शुभेच्छा.

ushaprabhapage@gmail.com

chaturang@expressindia.com