डॉ. विश्वजीत पतंगराव कदम

कृषी विभागाने करोना काळातील बिकट परिस्थितीतही अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. गेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतले. राज्यातील तरुण सुशिक्षित शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नव-नवीन प्रयोग करत आहेत. शेती हा व्यवसाय असला तरी त्याला उद्योगाची जोड देण्याचे प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम २०२२साठी प्रशासकीय तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. खरीप हंमागासाठी दर्जेदार खते, बी-बियाणे उपलब्ध करणे, साठेबाजीला आळा घालणे यासाठी विभागवार नियोजन करण्यात आले आहे.

Bahujan samaj vidhan sabha election 2024
बहुजन समाजातील संधीसाधूपणावर उपाय काय?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Criticism between the ruling party and the opposition vidhan sabha election 2024
‘दशकभराच्या पीछेहाटी’वरून सत्ताधारी-विरोधकांत कलगीतुरा
Loksatta lalkilla Assembly elections in Maharashtra BJP campaign
लालकिल्ला: भाजपचा प्रचार करणार कोण?
Economic decline state government Sharad Pawar Vijay Wadettiwar criticize the government
आर्थिक घसरणीवरून राज्य सरकार लक्ष्य! शरद पवार, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका
The central government has announced the guaranteed price of six rabi crops
हमीभावाचा अर्थ व अनर्थ
end the Jayant Patils reckless politics says Sadabhau Khot
जयंत पाटलांच्या अविचारी राजकारणाला पूर्णविराम द्या – सदाभाऊ खोत
Discrepancy in teaching hours in RTE and State Syllabus
आरटीई, राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील अध्यापन तासांमध्ये विसंगती… झाले काय, होणार काय?

खरीप हंगामात प्रमुख अन्नधान्य पिकांचे १४६.८५ लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येणे अेपेक्षित आहे. त्यासाठी १७.९५ लाख क्विंटल बियाणे आवश्यक आहे. महाबीजकडून १.७२ लाख क्विंटल, राष्ट्रीय बिजनिगमकडून ०.१५ लाख क्विंटल व खासगी उत्पादकांमार्फत १९.०१ लाख क्विंटल असे एकूण १९.८८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे.

वाणिज्यिक पिके कार्यक्रम

कापूस व उसात आंतरपीक पद्धतीस चालना देण्यासाठी मूग व उडीद आणि ऊसात हरभरा ही पीक पद्धती राबविण्यात येत आहे. त्यातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न प्राप्त झाले आहे. या पद्धतीवर आधारित कापूस व उसाची अनुक्रमे ४८० हेक्टर व दोन हजार ३६० हेक्टरवर प्रात्यक्षिके घेण्यात आली. कापसाची अतिघन लागवड पद्धत १७६ हेक्टर वर राबविण्यात आली. रोपांची संख्या वाढल्याने उत्पन्नात वाढ झाल्याचे निदर्शनास आले. मागील वर्षी कापसावरील हुमणी किडीच्या नियंत्रणात यश आले.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 

२०२१-२२ मध्ये राष्ट्रीय सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके व भात पड क्षेत्रावर कडधान्य उत्पादन कार्यक्रमासाठी २२ हजार ४८४ लाख रुपये रकमेच्या कार्यक्रमास मंजुरी मिळाली होती. यामधून पीक प्रात्यक्षिके, अनुदानित दराने बियाणे वितरण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक पीक व्यवस्थापन, सुधारित कृषी अवजारे व सुविधा इत्यादी बाबी करण्यात आल्या. परिणामी २०२१-२२ मधील तिसऱ्या अंदाजानुसार कडधान्याचे ५२ लाख मेट्रिक टन व एकूण धान्य पिकाचे १६५.०१ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले.

पीकनिहाय कर्जदर

राज्यातील बँकामार्फत शेतकऱ्यांना उत्पादनासाठी तसेच शेती सुधारणेसाठी विविध प्रकारची कर्जे दिली जातात. पीकनिहाय प्रति हेक्टरी दरानुसार कर्ज पुरवठा केला जातो. कर्जदार निश्चित करण्यासाठी नाबार्डमार्फत राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने विविध पिकांसाठी प्रति हेक्टरी कर्जदर आणि पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायासाठी खेळत्या भांडवलाचे कर्जदर निश्चित केले आहेत. हे दर किमान असून त्यापेक्षा अधिक दर निश्चितीची मुभा बँकांना आहे.

नाबार्ड पतपुरवठा आराखडा

नाबार्डमार्फत राज्यासाठी सहा लाख १३ हजार ५०३ कोटी रुपये रकमेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये कृषी, कृषीपूरक व कृषी पायाभूत सुविधांसाठी एकूण एक लाख ४३ हजार १९ कोटी रुपये रकमेचा आराखडा आहे.

बांधावर कृषी निविष्ठा पुरवठा 

कोविडकाळात उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता, शेतकऱ्यांना योग्य वेळी दर्जेदार कृषी निविष्ठांचा पुरवठा व्हावा यासाठी बांधावरच हे साहित्य उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राज्य शासनाच्या कृषी विभागाने राबविला आहे. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला असून २०२१-२२ मध्ये बांधांवर ७५ हजार ९६९ मेट्रिक टन खतांचा पुरवठा करण्यात आला.

फळ पीकविमा योजना

या योजनेत २०२१ मध्ये एकूण १.२९ लाख शेतकरी सहभागी झाले. त्यांनी ९६ लाख हेक्टर क्षेत्राचा विमा घेतला असून एकूण विमा संरक्षित रक्कम दोन लाख सहा हजार ७०८ कोटी रुपये इतकी आहे. त्यासाठी १४८.७९ कोटी रुपये इतकी एकूण रक्कम भरण्यात आली आहे. १३०.९२ कोटी रुपये नुकसानभरपाई देय असून त्यापैकी ११९.०३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे.

कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प

विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारित असलेल्या या प्रकल्पासाठी पाच हजार ७६० समुदाय आधारित संस्थानी अर्ज सादर केले आहेत. छाननीअंती ६६९ समुदाय आधारित संस्थांना सविस्तर अहवाल तयार करण्यास प्राथमिक मान्यता देण्यात आली आहे. ३१ उपप्रकल्पांना राज्यस्तरीय उपप्रकल्प मंजुरी समितीने मंजुरी दिली आहे. १५ जिल्ह्यांतील २६ पथदर्शी उपप्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत.

कृषी यांत्रिकीकरण

२०२०-२१ पासून कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी महाडीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. केंद्रकृत कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमासाठी १५२.४० कोटी रुपये आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमासाठी११२.५० कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला होता. मार्च २०२२मध्ये केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिक कार्यक्रमासाठी १४ हजार ५२५ लाभार्थींना १०४.९३ कोटी तर राज्य पुरस्कृती यांत्रिकीकरणासाठी १५ हजार ८५२ लाभार्थींना १०४.३३ कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२२-२५ अंतर्गत ११६.५१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. त्यापैकी ४३.५९ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला. त्यापैकी १० हजार २७० लाभार्थ्यांना क्षेत्र विस्तार, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, सामुदायिक शेततळे, हरितगृह, शेडनेट, प्लास्टिक फलोत्पादन यांत्रिकीकरण, पॅक हाऊस, रेफर व्हॅन, प्राथमिक प्रक्रिया, शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास दौरे यासाठी लाभ देण्यात आला. तसेच राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत १२३.४८ कोटींचा निधी उपलब्ध झाला होता. त्यापैकी ४९.५५ कोटी खर्च झाला. त्यामध्ये पाच हजार ९५५ लाभार्थ्यांना हरीतगृह शेडनेट, शेततळे अस्तरीकरण कांदाचाळ ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका’ इत्यादींचा लाभ देण्यात आला.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना

पाणलोट विकास घटक २.० ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’- पाणलोट विकास घटक २० योजनेअंतर्गत राज्यातील ३० जिल्ह्यांत एकूण १४४ प्राथमिक प्रकल्प अहवाल मंजूर झाले आहेत. त्याचे प्राथमिक प्रकल्प मूल्य एक लाख ३३ हजार ५५६.५९ लाख असून एकूण क्षेत्र ५ लाख ६५ हजार १८६ हेक्टर आहे.

मुख्यमंत्री कृषी आणि अनप्रक्रिया योजना

या योजनेअंतर्गत तीन हजार ५० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यातून ९२ प्रकल्पांना अनुदान देण्यात आले. २०१८-१९ पासून एकूण २४८ प्रकल्पांना ७६.९४ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. या प्रकल्पांमुळे शेतकरी व शेतकरी गट/ शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याकडून शेतमाल खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजना

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठीच्या या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये निश्चित निवृत्तिवेतन देण्यात येणार आहे. ही योजना ऐच्छिक व अंशदायी पेन्शन योजना असून १८ ते ४० वर्षे या वयोगटातील शेतकऱ्यांना त्यांच्या १ ऑगस्ट, २०१५ रोजीच्या वयानुसार वयाची ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत दरमहा ५५ ते २०० रुपये पेन्शन फंडामध्ये जमा करावे लागणार आहेत. याअंतर्गत ११ मे २०२२ पर्यंत ७८ हजार ८१६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.‘विकेल ते पिकेल- पिकेल ते विकेल’ अभियानाअंतर्गत (संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान) २० हजार ३१४ ठिकाणी शेतकऱ्यांना बाजार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तीन हजार २३४ शेतकरी गट/ शेतकरी उत्पादक कंपन्यांना थेट ग्राहकांशी जोडण्यात आले आहे.

रानभाज्या महोत्सव

राज्यात ९ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हास्तरावर ३३ आणि तालुका स्तरावर २४५ रानभाज्या महोत्सवांचे आयोजन करण्यात आले. या व्यतिरिक्त १२५ ठिकाणी कायमस्वरूपी विक्री व्यवस्था करण्यात आली आहे. शेतमजूरांचे कौशल्य वाढविणे, ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती, कुशल शेतमजूर मिळवून देण्यासाठी महत्वकांक्षी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत एक लाख शेतमजूरांना प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित आहे. ६९४ वर्ग आयोजित करून ३५ हजार ९१२ शेतकरी/मजूर यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

क्रॉपसॅप

कापूस, मका, ज्वारी व उसावरील कीडनियंत्रणासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. सर्वेक्षण करून एकूण ३० हजार ४२ पीकसंरक्षण सल्ले प्रसारित करण्यात आले. त्याचप्रमाणे ‘एम-किसान पोर्टल’वरून पीकसंरक्षणाचे २२५.१५ लाख एसएमएस पाठविण्यात आले.

शेतीशाळा, पीकस्पर्धा

आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी २०२१-२२ मध्ये एकूण १९ हजार १५३ शेतीशाळा राबविण्यात आल्या त्यापैकी एक हजार २०३ महिलांसाठी राबविण्यात आल्या.

पीक स्पर्धांच्या स्वरूपात आणि बक्षिसाच्या रकमेत सुधारणा करून रब्बी हंगाम २०२० पासून खरीप हंगामाकरिता ११ व रब्बी हंगामाकरिता सहा पिकांकरीता नविन निकषांच्या आधारे पीक स्पर्धा घेण्यात येत आहे. खरीप हंगाम २०२१ मध्ये नऊ हजार ४४१ शेतकरी तसेच रब्बी हंगाम २०२१ मध्ये पाच हजार २९४ शेतकरी स्पर्धेत सहभागी झाले.

कृषिविभागाचे यूट्यूब चॅनल

www.youtube.com/C/Agriculture DepartmentGoM या यूट्यूब चॅनलवरून कृषी विकासाच्या योजना, आधुनिक शेतकऱ्यांच्या यशोगाथा, कृषिप्रक्रिया इत्यादींची माहिती देण्यात येते. ‘चर्चा करू शेतीची कास धरू प्रगतीची’ या हवामानावर आधारित मालिकेचे दर बुधवारी प्रक्षेपण करण्यात येते. याव्यतिरिक्त ३२२ व्हिडीओ प्रसारित करण्यात आले आहेत. सध्या या चॅनलचे ९०.८ हजार सबस्क्रायबर आहेत.

शेतकऱ्यांची रिसोर्स बँक

राज्यातील शेतकऱ्यांसाठी रिसोर्स बँक तयार करण्यात आली आहे. प्रत्येकाचा रिसोर्स बँकेचा व्हॉट्सॲप गट तयार करण्यात आला असून त्याद्वारे कृषी विषयक संदेश, चित्रफिती, योजनांची माहिती यांची देवाण-घेवाण आणि शंकांचे निरसन केले जाते. एकूण सात हजार २२० शेतकरी त्यात सहभागी झाले आहेत.याव्यतिरिक्त शेतकरी हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी ग्राम कृषी विकास समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. कृषी विभागाची ‘व्हॉट्सॲप ऑटो रिप्लाय सुविधा’ ८०१०५५०८७० या क्रमांकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. कृषी विभागाचा krushi-vibhag blogspot.com हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. १.६१ कोटी शेतकऱ्यांनी wwwkrishi.maharashtra.gov.in या कृषी विभागाच्या संकेतस्थळाला भेट दिली आहे. राज्यातील ४१ हजार गावांचे जमीन सुपीकता निर्देशांक तयार करण्यात आले आहेत.

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी सर्व यंत्रणांच्या माध्यमातून त्याला बळकटी देण्याची गरज आहे. कृषिपूरक व्यवसाय वाढीकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागणार आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून महाविकास आघाडीचे सरकार त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकरी बांधवांचे प्रयत्न व राज्य शासनाची साथ यामुळे खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये राज्यातील बळीराजाला समृध्दीचे दिवस येतील आणि कृषि विकासाचा दर वृध्दिंगत होईल, असा मला विश्वास आहे.- 

लेखक कृषी खात्याचे राज्यमंत्री आहेत.