पालघर: यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ८४८८ घरगुती, तर १८५५ सार्वजनिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. करोनाचे संकट ओसरल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे दोन वर्षांनंतर होणारा यंदाचा गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा होणार आहे. या सणाच्या निमित्ताने शांतता व कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्यामध्ये दीड दिवसाच्या ४४०६ गणेशांची प्रतिष्ठापना होणार असून १३५७ गणपती पाच दिवसांचे, तर ७५६ गणपती हे गौरीसोबत विसर्जित होणार आहेत. याखेरीज अनंत चतुर्दशीला ३३८ सार्वजनिक व ९८४ घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे.
हेही वाचा >>>गणेशोत्सवात ‘एसटी’च्या गट आरक्षणातून राजकीय पक्षांचे मतांचे गणित
पालघर तालुक्यात श्री गणेशमूर्ती स्थापनेची संख्या सर्वाधिक असून बोईसर पोलीस ठाणेअंतर्गत १७६२, पालघर १२६२, सातपाटी ९८१, सफाळा ७५५, मनोर ४८३, केळवे पोलीस ४१७ तर तारापूर पोलीस ठाणे क्षेत्रात २९७ गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. याखेरीस डहाणू ८९२ , वाडा ८४६, मोखाडा ६५२, विक्रमगड ३९४, वाणगाव ३११, कासा २८०, घोलवड २५२ तर तलासरी येथे १९९ गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.
हेही वाचा >>> पेणमधील गणेशमूर्ती व्यवसायाचा समूह विकास रखडला
गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्याने सार्वजनिक मंडळातर्फे मूर्तीची सजावट व मंडपातील देखावे रंगरंगोटीचे काम जोमात आहे. याचबरोबरीने खासगी श्री गणेशाची प्रतिष्ठा करणाऱ्या कुटुंबांनी सजावट तसेच रोषणाईचे साहित्य आठवडाअखेरीस खरेदी केले असून प्रतिष्ठानच्या दृष्टीने तयारी सुरू ठेवली आहे.
‘कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई’
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलीस दल संपूर्णपणे सतर्क व सज्ज आहे. उत्सवादरम्यान कायदा सुव्यवस्था मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असून त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी चार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह ८१ पोलीस अधिकारी, ५९१ पोलीस अंमलदार, ४०० होमगार्ड, चार स्ट्राइकिंग फोर्स, दोन दंगल नियंत्रण पथक व दोन राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडय़ा बंदोबस्तासाठी तैनात ठेवणार असल्याची माहिती देण्यात आली. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जुगार व कायद्याची पायमल्ली व बेकायदा कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले. गणेशोत्सव शांततेत साजरा होण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन अधीक्षकांनी केले आहे.
मूर्तीसह सजावट साहित्यांचे दर दुप्पट
वाडा: शाडूच्या मातीचे, रंगांच्या वाढलेल्या दरामुळे गणेशमूर्ती त्याचबरोबर सजावटींसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीतही वाढ झाली आहे. या किमती दुपटीने वाढल्या आहेत. या वर्षी गणपती उत्सवात महागाईचे विघ्न दिसून येत आहे. किराणा सामनाबरोबरच भाजीपाला, मिठाईच्या वाढलेल्या दराच्या चटक्याबरोबर सध्या पडत असलेल्या कडक उन्हाचेही चटके गणेशभक्तांना सहन करावे लागत आहेत. बुधवारी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. गणेशभक्तांची खरेदीसाठी धावपळ सुरू आहे. बाजारपेठाही गणपतीची आरस करण्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी सजलेल्या आहेत. विशेषत: विविध प्रकारची लायटिंग, कापडी फुलांच्या माळा, रंगीबेरंगी कापडी पडदे या वस्तूंनी बाजारपेठा नटल्या आहेत. या सर्व वस्तूंच्या किमती दुपटीने वाढलेल्या असल्या तरी ग्राहकांचा खरेदीचा ओघ मोठाच दिसुन येतो. आरस सजावटसाठी लागणाऱ्या बहुतांश वस्तू बाजारपेठेत चिनी बनावटीच्या असल्याचे ग्राहकांकडून बोलले जात आहे. प्लास्टिक उत्पादन व विक्रीवर असलेल्या बंदीमुळे पर्याय म्हणून कापडी व फायबर मखरांचे दरही वाढले आहेत. वाडा तालुक्यातील वाडा बाजारपेठ, कुडूस नाका, खानिवली, विक्रमगड या प्रमुख बाजारपेठेत सर्वच वस्तूंचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढलेले आहे.