पालघर: पालघर तालुक्यातील माहीम या गावी एका पिसाळलेल्या कुत्रीने १३ नागरिकांना चावा घेतल्यानंतर त्यांना इम्युनोग्लोबिन प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी मुंबईला पाठवण्यात आले. विशेष म्हणजे पालघर येथे या लशीच्या १० मात्रा उपलब्ध असताना जिल्हा आरोग्य विभाग तसेच शल्य चिकित्सक विभागाअंतर्गत येणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात समन्वय नसल्याने रुग्णांना उपचारासाठी मुंबईला जावे लागले. या प्रकारामुळे दोन्ही विभागातील समन्वयाचा अभाव निदर्शनास आला असून त्याचा परिणाम जिल्ह्यातील रुग्णसेवेवर होत आहे.
शनिवार दुपारपासून माहीम बाजारात एका पिसाळलेल्या श्वनाने रात्री उशिरापर्यंत एका मागोमाग अशा १२ स्थानिक व एका विक्रेत्याला चावा घेण्याचा प्रकार घडला. बाधित रुग्ण हे माहीम प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता हे श्वान वेडसर असल्याचे तसेच जखमा खोल गंभीर असल्याने ग्रेड तीन त्यांना इम्युनोग्लोबिन लस घेण्याचे सांगण्यात आले. या पैकी दोन रुग्ण पालघर ग्रामीण रुग्णायलात गेले असता ही लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. तसेच त्या पाठोपाठ श्वान दंशाचे रुग्ण वाढल्याने गावच्या उपसरपंच यांची पालघर ग्रामीण रुग्णालयात या लस उपलब्धतेची तपासणी केल्या असता त्यांना नकारात्मक उत्तर देण्यात आले होते.
त्या नंतर पाच रुग्णांनी खाजगी वाहनातून व इतर रुग्णांनी शासकीय रुग्णवाहिकेतून मुंबईच्या केईएम रुग्णालयात जाऊन इम्युनोग्लोबिन लस घेतल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे लस उपलब्धतेचा प्रश्न पुढे आल्यानंतर या संदर्भात पालघर ग्रामीण रुग्णालयात लस उपलब्धतेबाबत विचारणा केली असता पालघर येथे १० लस मात्र उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.
घडलेल्या प्रकारामुळे माहीम प्राथमिक आरोग्य केंद्रातून ग्रामीण रुग्णालयात इम्युनोग्लोबिन लस उपलब्धतेची थेट चौकशी झाली होती का, वरिष्ठ अधिकारी वर्गाकडे हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता का याबाबत संभ्रम असून जिल्ह्यातील दोन आरोग्य संस्थांमधील समन्वयाच्या अभावी रुग्णांना एक लस येण्यासाठी १५० किलोमीटरचा प्रवास करावा लागला आहे. खोडाळा येथे झालेल्या बाल मृत्यू प्रकारांमध्ये देखील या दोन्ही आरोग्य संस्थांमध्ये समन्वयाच्या अभाव असलेले दिसून आले होते.
दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना मुंबईला जाण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची माहिती माहीमच्या आरोग्य अधिकारी यांनी सांगितले आहे. दरम्यान पालघर चे शल्य चिकित्सक डॉ. संजय बोदाडे यांनी पालघर ग्रामीण रुग्णालयात पुरेशा प्रमाणात इम्युनोग्लोबिन प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असल्याची माहिती लोकसत्तेला दिल्या असून गैरसंवादातून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
श्वान दंशामुळे एकाच मृत्यू
केळवे बीच, केळवे धवंगेपाडा, केळवे रोड या परिसरात गेल्या महिनाभराच्या कालावधीत १० पेक्षा अधिक नागरिकांना श्वान दंश झाल्याचे प्रकार घडले असून त्यापैकी मोजक्या रुग्णांना पालघर येथे इम्युनोग्लोबिन लस उपलब्ध झाल्याची माहिती पुढे आली आहे. पालघर एक जिल्हा मुख्यालय असताना या ठिकाणी आवश्यक मात्र ही लस उपलब्ध का केली जात नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. यापूर्वी माहीम पाली पाडा येथील एका नागरिकाला श्वान दंश झाला असता त्याला अँटी रेबीज व्हॅक्सिन घेऊन इम्युनोग्लोबिन लस घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र या नागरिकांनी पुढील उपचार न घेतल्याने त्यांचा १५-२० दिवसांनी मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.
जिल्हाधिकारी चौकशी करणार
घडलेल्या प्रकाराबाबत तसेच जिल्ह्यातील दोन आरोग्य संस्थांमधील समन्वय नसल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकरणात आपण संबंधितांकडे विचारणा करणार असल्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले.