डहाणू : कासा नजीकच्या वरोती येथून सुर्यानगर येथील शाळकरी विद्यार्थिनी आणि प्रवाश्यांना घेऊन सुर्यानगर येथे निघालेल्या रिक्षावरील चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात एका १४ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यु झाला असून चालकासह पाच प्रवासी आणि मागून रिक्षाला धडक देणारा दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. सोमवार १ जुलै रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा >>> बोईसर: भरधाव ट्रेलरने शाळकरी मुलांना चिरडले, एका विद्यार्थ्याचा मृत्यू; एक जखमी
वरोती येथून सूर्यानगर येथे निघालेल्या रीक्षावरील चालक भास्कर डोकफोडे यांचे नियंत्रण सुटल्यामुळे रिक्षा उलटून अपघात झाला असून याला मागून भरधाव येणाऱ्या दुचाकीची धडक बसली आहे. अपघातात आठवी इयत्तेत शिकणारी १४ वर्षीय संगीता सुभाष डोकफोडे हीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून नयना हाडळ १०, लता वेडगा ४५, प्रमोद लोहार ४०, रमेश कोदे ४०, रसिका कोदे ३० रिक्षाचालक भास्कर डोईफोडे रा. वेती सह दुचाकी चालक कैलास धानमेहेर ६० हे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमी असलेल्या संगीता डोकफोडे हिला पुढील उपचारासाठी धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र रुग्णालयात जात असताना रस्त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कासा पोलीस ठाण्यात अपघाताच्या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास कासा पोलीस करत आहेत.