पालघर : पालघर (ग्रामीण) जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यात दुचाकी अपघातांमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला. दुचाकी अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक असून वाढते अपघात पालक आणि पोलीस दलासाठी चिंतेची बाब ठरत आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेसह भरधाव वेग आणि रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करण्याकडे होत असलेले दुर्लक्ष हे अपघातांची प्रमुख कारणे म्हणून समोर येत आहेत.

मार्च महिन्यात पालघर जिल्ह्यातील पालघर, बोईसर, सफाळे, मनोर, तारापूर, डहाणू, घोलवड, तलासरी, कासा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि वाडा या पोलीस ठाणे हद्दीत वीस जणांचा रस्ते अपघातात बळी गेला असून यामध्ये दुचाकी अपघातांमध्ये १५ जण मृत्यूमुखी पडले आहेत. प्रत्येक महिन्यात दुचाकी अपघातांमध्ये मृत्यू पडणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे . रस्ते अपघाताबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता जनसंवाद अभियान आणि पालघर जिल्हा वाहतूक शाखेमार्फत दरवर्षी रस्ते सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, वाहतुकीच्या नियमांचे पालन, दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान करणे याबाबत जनजागृती करण्यात येते

मात्र वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. अतीवेग, मद्यपान करून वाहन चालविणे, रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष तसेच राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांची झालेली दूरवस्था या कारणांमुळे अनेक दुचाकी अपघात होत असून प्रामुख्याने १८ ते २५ वयोगटातील तरुणांचा दुचाकी अपघातांमध्ये बळी जात आहे.

जिल्ह्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये देखील विविध कंपन्यांच्या दुचाकी विक्रीसाठी सहजपणे उपलब्ध होत आहेत. अगदी कमी किमतीमध्ये मासिक हप्त्यांवर दुचाकी खरेदी करता येत असल्यामुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात दुचाकी खरेदी करताना दिसत आहेत. मात्र दुचाकी चालवण्याचे आवश्यक प्रशिक्षण आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याकडे दूर्लक्ष करून अनेक जण बेदरकारपणे दुचाकी चालवताना दिसून येत असून यामुळे अपघातांमध्ये सतत वाढ होत आहे.

पालघर जिल्हा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांमार्फत वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या दुचाकी चालकांवर नियमितपणे दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. पोलिसांकडून दुचाकी चालवताना सुरक्षेसाठी हेल्मेट परिधान करणे आणि वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत प्रबोधन केले जाते. विना हेल्मेट दुचाकी चालकांसाठी वाहतूक शाखेकडून अनेक वेळा ठीक ठिकाणी सवलतीच्या दरात हेल्मेट वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला आहे. मात्र यानंतरही अनेक दुचाकी चालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असून याबाबतीत पालकांसह शाळा महाविद्यालये यांनी देखील पुढाकार घेत वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत तरुणांचे व्यापक स्तरावर प्रबोधन करणे आवश्यक झाले आहे.

पालघर जिल्हा वाहतूक शाखेमार्फत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई सोबत नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधन केले जाते. मोटार सायकल अपघातामुळे होणारे वाढते मृत्यू चिंतेची बाब असून यात तरुणांची संख्या अधिक आहे. वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत पालकांनी देखील आपल्या पाल्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. -सुरेश साळुंखे, प्रभारी अधिकारी, पालघर जिल्हा वाहतूक शाखा