नीरज राऊत
पालघर: प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्री यांचा चारोटी जवळ अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनेला वर्षभराचा कालावधी उलटला असून या दुर्घटनेचा मोठा गाजावाजा झाल्याने अपघात स्थळाच्या जवळपास सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अनेक बदल करण्यात आले. असे असले तरीही १२१ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या राज्यातील पट्ट्यामध्ये गेल्या वर्षभरात १३९ अपघातांमध्ये १५६ प्रवाशांचा मृत्यू ओढवल्याने राष्ट्रीय महामार्ग पूर्वी इतकाच धोकादायक राहिला आहे.
गुजरात राज्यातील उधवाडा येथे धार्मिक कार्य आटपून सायरस मिस्त्री हे पंडोल कुटुंबीयांसोबत मुंबईकडे परतत होते. चारोटी उड्डाण पुलापासून काही अंतरावर असणाऱ्या सूर्या नदीवरील पुलाच्या पूर्वी रस्ता दुभागल्याने भरधाव असणारे त्यांचे वाहन पुलाच्या कठड्याला आदळल्याने सायरस मिस्त्री व त्यांच्या सोबत असणाऱ्या एका सहकाऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न चर्चेला आला होता.
हेही वाचा >>>वाढवण बंदर प्रकरणी मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न – केंद्रीय मंत्री रामदास आठवले
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तसेच इतर संस्थांनी अपघातांच्या कारणांचा अभ्यास करत काही अल्पकालीन व काही दीर्घकालीन उपाययोजना सुचवल्या. ज्या ठिकाणी सायरस मिस्त्री यांच्या वाहनाचा अपघात झाला त्या ठिकाणी महामार्ग प्राधिकरणाने धक्कारोधक यंत्रणा कार्यान्वित केले. तसेच त्याच्या बाजूला रिफ्लेक्टर खांब उभारून या अपघात प्रवण क्षेत्राच्या पूर्वी लुकलुकणारा दिवा (ब्लिंकर लाईट) व वळण दर्शवणारा फलक बसवण्यात आला होता. त्याचबरोबर या मार्गिकेवरून येणाऱ्या वाहनांचा वेग मर्यादित राहण्यासाठी चारोटी येथील वळण असणाऱ्या उड्डाणपुलाचा पूर्वी व उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात छोटे गतिरोधक (रंबलर) उभारण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी, पोलीस, परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग पोलीस विभाग व अन्य तज्ञांच्या मदतीने अपघात प्रवण क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बदलांबाबत निश्चिती करण्यात आली. अपघात प्रवण क्षेत्रात वाहनांची सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने आराखड्यातील दोष दूर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा विचार करण्यात आला असून त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदीसाठी प्रस्ताव केंद्र शासनाच्या स्तरावर पाठवण्यात आले आहेत.
अपघात प्रवण क्षेत्रात व त्यापूर्वी सूचनाफलक व सावधानतेचा इशारा देणारे फलक बसवण्याचे तसेच छोट्या आकाराचे गतिरोधक ( रंबलर) उभारण्याची प्रस्तावित होते. त्याचबरोबर महामार्गावरील मार्गिकांमध्ये वाहनांना प्रवेशासाठी तयार करण्यात आलेले वेगवेगळ्या अनधिकृत जागा (कट) बंद करण्याचे प्रस्तावित होते. मात्र याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आरंभी गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने तसेच या प्राधिकरणाची राज्यातील कार्यालय भरूच मध्ये स्थलांतरित केल्याने देखरेख ठेवण्यासाठी यंत्रणा कार्यशील नसल्याने जिल्हाधिकारी यांनी तसेच पोलिस अधीक्षक यांनी स्मरणपत्र वजा ताकीद देण्याचे प्रकार घडले होते.
सद्यस्थितीत अपघात प्राण क्षेत्र व जवळपास सूचनाफलक वेग मर्यादा दर्शवणारे फलक, अपघात प्रवण क्षेत्र असल्याचे फलक बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात असले तरीही उड्डाण पुलावर प्रकाश व्यवस्था (पथदिवे) बहुतांश ठिकाणी बिघडलेल्या अवस्थेत आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यांवरील दुभाजकांची उंची वाढवणे व बेकायदा कट बंद करण्याचे कामे पूर्णतः झाली नसल्याचे दिसून आले आहे.
सन २०२२ मध्ये एकंदर ११३ अपघातांमध्ये १२० प्रवासांचे मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. तर सप्टेंबर २०२२ ते ऑगस्ट २०२३ दरम्यान १५६ प्रवासी अपघातात मृत्यूमुखी पडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा धोका कायम राहिलेला असून अल्पावधी उपाययोजना तसेच दीर्घकालीन उपायोजनांची अंमलबजावणी तातडीने करणे गरजेचे झाले आहे. सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनामुळे चर्चेत आलेल्या या राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षिततेच्या बाबत शासकीय यंत्रणा गांभीर्याने विचार करू लागली, हीच या महामार्गावरील प्रवाशांसाठी जमेची बाब ठरली आहे.
हेही वाचा >>>पालघरमधील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत; भातशेतीवर कीटकांचा प्रादुर्भाव
अनेक उपाययोजना कार्यपथावर
राज्य पोलीस तसेच राष्ट्रीय सडक प्राधिकरणाच्या मार्फत दर्शवण्यात येणाऱ्या अपघात प्रवण क्षेत्रांमध्ये सूचनाफलक व सावधगिरीचे इशारा देणारे फलक लावण्याचे काम अंतिम टप्प्यात असून दहिसर (मुंबई) ते तलासरी (आछाड) पर्यंत सहा भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर असून त्यापैकी तीन कामांचे कार्याध्यक्ष देण्यात आले आहेत. महामार्गाच्या या पट्ट्यात १० पादचारी पूल मंजूर झाले असून त्यांची आखणी व डिझाईन हाती घेण्यात येत आहे.
पावसाळ्यात महामार्गावर पडणाऱ्या खड्ड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी १२१ किलोमीटरच्या सहा पदरी राष्ट्रीय महामार्गावर तसेच असणाऱ्या सेवा मार्ग (सर्विस रोड) यांच्यावर सुमारे ५५३ कोटी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटचा थर (व्हाईट टॉपिंग) करण्याचे काम मंजुरी स्तरावर आले आहे. या कामाचा कार्यादेश येत्या काही दिवसात ठेकेदाराला देण्यात येणार असून १८ महिन्यात पूर्ण करावयाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रयत्नशील राहील असे प्राधिकरणाचे ठाणे विभागाचे व्यवस्थापक सुमित कुमार यांनी लोकसत्तेला सांगितले. दरम्यान महामार्गावर प्रत्येकी एक रुग्णवाहिका व पेट्रोलिंग वाहन वाढविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.