पालघर: पालघर येथील वैतरणा नदीवरील मुंबई-बडोदा द्रुतगती मार्गाच्या पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणावरून २२ कामगारांना घेऊन जाणारी बोट सोमवारी पहाटे नदीत उलटली. पोहत किनारा गाठण्यात २० कामगारांना यश आले आहे. दोन कामगार नदी पात्रात बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता कामगारांचा ठेकेदार कंपनी शोध घेत आहे.
वैतरणा नदीवरील मुंबई-बडोदा द्रुतगती मार्गाच्या पुलाचे काम सुरू आहे. हा पूल जी.आर. इन्फ्रास्ट्रक्चर लि. द्वारे बांधला जात आहे. त्याचे काम सध्या वाढीव बेटाजवळ सुरू आहे. हा पूल सफाळे आणि वैतरणाच्या मुख्य भूभागामध्ये आहे. बार्जच्या माध्यमातून पूल उभारणीचे काम सुरू आहे.
हेही वाचा >>> उत्पादनघटीच्या भीतीने ज्वारी वधारली; अपुऱ्या पावसामुळे रब्बी पेरण्यांवर परिणाम
पुलाच्या ठिकाणी काम करणाऱ्या सुमारे २२ रात्रपाळीच्या कामगारांना वैतरणा बाजूने नवघर घाटीम येथील कामगार वसाहतीकडे घेऊन येणारी ही बोट सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मागील बाजूने बुडू लागली व नंतर काही काळाने ती उलटली.
आदर्श शुक्ला आणि निर्मल मिश्रा अशी बेपत्ता कामगारांची नावे आहेत. अपघाताचा परिसर केळवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी बचावलेल्या प्रवाशांचे जबाब घेतले असून काहींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान बचावलेल्या प्रवाशानी सुरक्षा जॅकेट घातल्याचे दिसले नाही असे स्थानिकांनी सांगितले आहे. नदी पात्रात अपघात घडलेल्या ठिकाणी असलेल्या खडकावर बोट आदळली असावी असा स्थानिकांचा प्राथमिक अंदाज असून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसल्याने हा अपघात घडल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.