पालघर: बोईसरमध्ये ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर असूनही रुग्णालय उभारणीसाठी शासनाकडून निधी मिळत नाही. रुग्णालयासाठी लागणारा वीस कोटींचा प्रस्ताव दोन वर्षांपासून शासनाकडे धूळ खात पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरामध्ये झपाटय़ाने नागरीकरण वाढत चालले आहे. लोकसंख्या दोन लाखांच्या पुढे आहे. येथे शासकीय आरोग्य केंद्र सुरू होते, मात्र जीर्ण झाल्यानंतर ते बंद करून टीमा इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. येथील ग्रामीण रुग्णालयाची दुर्दशा झाल्याने नवीन रुग्णालयासाठी प्रशासन व आमदार राजेश पाटील यांनी प्रयत्न सुरू केले. अखेर संजय नगर परिसरात दीड एकर शासकीय जागेवर ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभे करण्याचे ठरले. त्याला आज तीन वर्षे झाली. तरी या रुग्णालयाच्या उभारणीसाठी राज्य शासनाने निधीच दिलेला नाही. त्यामुळे रुग्णालयाचे काम सुरू होण्याचे प्रयोजन रखडलेले आहे.  प्रशासकीय मान्यतेसाठी व निधी मंजुरीसाठी रुग्णालयाच्या कामाचे अंदाजपत्रक शासनाकडे पाठवण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.  बोईसर विधानसभा मतदारसंघांमध्ये बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील हे आमदार आहेत.  रुग्णालयासाठी त्यांच्या प्रयत्नाने दीड एकर जागा मंजूर झाली. पाटील यांनी निधी मिळण्यासाठी सरकारकडे पत्रव्यवहारही केलेला आहे. सरकारला बहुजन विकास आघाडीने पाठिंबा दिलेला आहे. असे असतानाही निधी मंजूर न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

रुग्णांना भुर्दंड

बोईसर परिसरात एकही आधुनिक शासकीय रुग्णालय नाही. रुग्णांना उपचारासाठी चकरा माराव्या लागतात. शासकीय आरोग्य सुविधांसाठी पालघर, मुंबई, गुजरातला जावे लागत आहे. रात्रीच्या वेळी उपचाराची गरज असताना रुग्णांना उपचार मिळण्याची मोठी अडचण होते. यानंतर खासगी रुग्णालयाशिवाय पर्याय राहत नाही.

अनुशेष अंतर्गत रुग्णालयाच्या उभारणीसाठी निधी मंजूर होणे अपेक्षित आहे. मंजुरीनंतरच उभारणीसंदर्भातील कार्यवाही करता येणार आहे.  -डॉ. संजय बोदाडे, जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर

येत्या अर्थसंकल्पात रुग्णालयासाठी निधीची तरतूद करण्याचे प्रयोजन आहे. सरकार निधी मंजूर करेल, अशी अपेक्षा आहे.  -आ. राजेश पाटील, बोईसर विधानसभा मतदारसंघ

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 crore proposal for boisar rural hospital pending for two years zws
Show comments