पालघर : जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी १२ ते १६ डिग्री सेल्सिअस तापमानात शनिवारची सकाळची शाळेला हजेरी लावली असताना पालघर जिल्ह्यातील सुमारे ३२५ माध्यमिक शाळांनी मात्र मकर संक्रांतीची सुट्टीचा आगाऊ आनंद घेतला. जिल्ह्याच्या शिक्षण विभागाचा ढीसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
विद्यमान शैक्षणिक वर्षासाठी माध्यमिक विभागाच्या शाळांसाठी सुट्ट्यांची यादी शिक्षण विभागाने जाहीर करताना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी संक्रांतीची सुट्टी १४ जानेवारी रोजी नमूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात यंदा संक्रात १५ जानेवारी रोजी असताना शिक्षण विभागाने सुट्टी मध्ये बदल न केल्याने जिल्ह्यातील ३५० शाळांपैकी सुमारे ३२५ माध्यमिक शाळांनी संक्रांतीच्या सुट्टीचा आनंद घेतला.
याबाबत शिक्षण अधिकारी संगीता भागवत यांच्याशी संपर्क साधला असता कोणतीही सुट्टी जाहीर केली नसल्याचे त्यांनी लोकसत्ता ला सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी शिक्षण उपसंचालकांच्या मार्गदर्शक सूचनानुसार संक्रांतीची सुट्टी दिल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांना दोन राखीव सुट्ट्यांसह ७६ तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ३१ सुट्ट्या वर्षात असतात. यापैकी सुट्ट्या रविवारी आल्या तरीही त्याच दिवशी सुट्ट्या जाहीर केल्या जातात. अशा परिस्थितीत संक्रांत यंदा १४ जानेवारी ऐवजी १५ जानेवारी रोजी असताना ही सुट्टी पुढे ढकलण्याची समसूचकता जिल्हा परिषदेने दाखवली नसल्याने हा प्रसंग ओढावला आहे. याबाबत माध्यमिक शिक्षक संघाच्या प्रतिनिधींची संपर्क साधला असता या वर सावरासावर करताना आपण राखीव असणाऱ्या सुट्ट्याचा वापर केल्याचे सांगितले. मात्र जिल्ह्यातील अधिक तर माध्यमिक शाळा संक्रांतीनिमित्त सुट्टी उपभोगत असल्याची खबर यासंदर्भात प्रतिक्रिया विचारेपर्यंत माध्यमिक विभागाला नसल्याचे दिसून आले.