लोकसत्ता वार्ताहर

बोईसर : पालघरमधील ऐतहासिक आशेरी गडावरील झाडीझुडपातील अडचणीच्या जागी अनेक वर्षांपासून गुडूप झालेल्या अवजड वजनाच्या तीन तोफांचा शोध घेऊन मोठ्या मेहनतीने त्या मूळ जागी पुनर्स्थापित करण्यात दुर्गसंवर्धन संस्थाच्या सदस्यांना यश आले.

पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा आशेरी गडावरील आशेरी देवीच्या गुहेबाहेर सध्या तीन तोफा विराजमान आहेत. गडाखालील पायथ्याच्या खडकोणा गावातील स्थानिक स्थानिकांकडून किल्ल्यावरनियमित संवर्धनाचे काम करणाऱ्या शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना गडाच्या मध्यावर झाडीझुडपात तोफांचे तीन भाग गेल्या अनेक वर्षांपासून पडून असल्याची माहिती मिळाली होती.

पूर्वीच्या काळी गडाच्या बुरुजांवर विराजमान असलेल्या तोफा नैसर्गिक कारणांमुळे किंवा अज्ञात व्यक्तींकडून गडाच्या कड्याखाली लोटून दिल्याची शक्यता होती. आशेरी गडावर नियमित दुर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यानी अडचणीच्या ठिकाणी पडून असलेले तोफांचे भाग गडाच्या मुख्य बालेकिल्ल्यावर पुनर्स्थापित करण्याचा निर्धार केला. जवळपास ६०० किलो वजन असलेले तोफांचे भाग अवघड चढाई असलेल्या वाटेने माथ्यावर घेऊन जाण्याचे प्रचंड आव्हान होते. या कामासाठी मोठ्या मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्यानुसार पाच आणि सहा एप्रिल रोजी मोहीम आखण्यात आली.

आशेरी गडावर संवर्धनाचे काम करणाऱ्या दुर्ग सेवकांनी मार्च महिन्यात १५० किलो वजनाच्या चौथ्या तोफेस गडावर यशस्वीपणे प्रस्थापित केले. त्यानंतर शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठान, दुर्गवेध युवा मराठा फाउंडेशन, दुर्गेश्वर प्रतिष्ठान, बोईसर फ्लायर्स, अखंड सेगवा गड संवर्धन या संस्थांच्या जवळपास ५५ कार्यकर्त्यानी शनिवारी रात्री ४५० किलो वजनी सहा फुटी द्विभागी तोफेला गडावर घेऊन जाण्याचे काम सुरु केले. गडाच्या मध्यापासून अवघड अशा शिडीच्या वाटेने उन्हाच्या प्रचंड तडाखा सुरु असतना जवळपास आठ तासांच्या प्रयत्नानंतर रविवारी रामनवमीच्या दिवशी या तोफेला किल्ल्यावर पोचवण्यात कार्यकर्त्यांना यश आले. आशेरी गडावरील तोफांना तोफगाडे बसवून पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याचे काम लवकरच सुरु करणार असल्याची माहिती शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठांनचे अनिकेत कुडतरकर यांनी दिली.

गड संवर्धन संस्थाकडून नियमित श्रमदानाचे कार्य

पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला खेटून असलेल्या ऐतिहासिक अशेरी गडावर गेल्या काही वर्षापासून मुंबई, ठाणे, वसई-विरार आणि पालघर जिल्ह्यातील स्थानिक ट्रेकर्स,दुर्गप्रेमी आणि हौसी पर्यटकांची गर्दी मोठया प्रमाणात वाढत आहे. पावसाळ्यात गडावर काही पिकनिकछाप पर्यटकांकडून मद्यपार्ट्या आणि हुल्लडबाजीचे प्रकार होतात. बेशिस्त पर्यटकांकडून गडावर मद्य, थंड पेये, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आणि इतर प्लॅस्टिक कचरा केल्यामुळे गडावर घाणीचे साम्राज्य पसरत आहे. यामुळे गडावरील गुहा, तोफा, पाणी साठवणुकीचा बांधीव तलाव,राजसदर चौथरा,पाण्याची टाक्या इत्यादी ऐतिहासिक वास्तूना धोका निर्माण झाला आहे.

गडावर वृक्षारोपण आणि स्वच्छते सोबतच सर्व ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धनासाठी शिवशंभू किल्ले प्रतिष्ठान, युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर, बा रायगड परिवार, सह्याद्री प्रतिष्ठान या व इतर गडकिल्ले संवर्धन संस्थाकडून नियमित श्रमदान मोहिमा आयोजित करण्यात येत असून गड संवर्धनाचे काम नियमित सुरु आहे. या कामात डहाणू वनविभाग, वनपरिक्षेत्र मनोर आणि गड पायथ्याच्या वाडा खड्कोना गावतील स्थानिकांचे देखील चांगले सहकार्य गडाचे संवर्धन करणाऱ्या संस्थांना मिळत आहे.