वाडा : अनेक वर्षांपासून बहुचर्चेत असलेला “भिवंडी- वाडा – मनोर” हा ६४ किमी महामार्ग विद्यमान वनमंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या निर्देशानंतर देखील सुस्थितीत होण्याचे व कामाची गती वाढतानाचे काही नाव घेताना दिसून येत नाही. या ज्वलंत प्रश्नाकडे शासन व प्रशासन स्तरावरून सातत्याने दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. “भिवंडी – वाडा – मनोर” महामार्गाच्या दुरवास्थेबाबत पालघर येथे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दोन्ही वेळीच्या (२० फेब्रुवारी व २८ मार्च) जनता दरबारात नागरिकांनी लक्ष वेधित हि समस्या सोडविण्यासाठी निवेदन दिले आहेत. मात्र तरीही रस्त्याबाबत प्रशासन स्तरावरून कुठलीही ठोस कार्यवाही किंवा प्रगती होताना दिसुन येत नाही.
वाडा तालुक्यामध्ये औद्योगीकरण क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने हा “भिवंडी-” वाडा – मनोर” महामार्ग दळणवळणासाठी किती महत्त्वाचा आहे हे दिसते. या ६४ किलोमीटर महामार्गाचे नव्याने काँक्रिटीकरणासाठी ‘ईगल कंन्स्ट्रक्शन” कंपनीला ७७६ कोटींचा कामाचा ठेका दिला आहे. कामाचा पहिला टप्पा ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत “भिवंडी- अंबाडी (रवदी)”१८ किलोमीटर पर्यंत तर दुसरा टप्पा वाडा तालुक्यातील “डाकीवली फाटा – वाडा” या २२ किलोमीटर करीता पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली मागील पाच महिन्यांपासून अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जागोजागी दीड ते दोन किलोमीटर अंतरावर खोदकाम केले आहे. काही ठिकाणी कुठलेही दिशादर्शक फलक किंवा सुरक्षितेच्या कुठल्याही उपायोजना केलेल्या दिसुन येत नाहीत.
“वाडा – अंबाडी- भिवंडी” रस्त्याचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून धुळीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच अवजड वाहतुकीमुळे अडथळे निर्माण होत असुन नागरिक व वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदाराला वारंवार नियमानुसार, जलद काम व रस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्याबाबत सूचनापत्र दिले आहे, मात्र ठेकेदाराकडून सुचनांचे पालन होताना दिसुन येत नाही किंवा ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुचना किंवा आदेशाला जुमानताना दिसुन येत नाही. त्यामुळे आजही हा रस्ता अपूर्ण राहिल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
गेल्या १२ वर्षांपासून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून हजारो अपघातांत सुमारे ५०० जणांना जीव गमवावे लागले आहे. त्यामुळे हा रस्ता किती धोकादायक आहे, आणि तो नव्याने आणि जलदगतीने करणे जरुरीचे आहे. याकडे लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांनी याकडे शासन, प्रशासनाने लक्ष वेधले आहे, तर याबाबत विधानसभेतही आवाज उठवण्यात आला आहे.मात्र तरीही नागरीकांना, वाहन चालकांना आजही या महामार्गावरून मरणयातना भोगत प्रवास करावा लागत आहे.
दरम्यान हा रस्ता सुस्थितीत करण्यासाठी सरकारला अजुन किती निष्पापांचे बळी हवे आहेत? तेव्हा हा महामार्ग सुस्थितीत करून खऱ्या अर्थाने दिलासा व सुटकेचा निःश्वास मिळेल असा प्रश्न येथील नागरिकांकडून विचारला जात आहे.
दरम्यान, “मे” अखेर पर्यंत एक बाजू पुर्ण करुन वाहतूक सुरु केली जाईल, असा दावा पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी मागील काही दिवसांपूर्वी केला होता. मात्र प्रत्यक्षात अद्यापही कॉंक्रिटीकरणाला खऱ्या अर्थाने सुरुवातच झालेली नाही. तसेच ज्या पद्धतीने काम धीम्या गतीने सुरू आहे किंवा कामाचा वेग पाहता “जुन” महिन्यापूर्वी रस्त्याचे काम पुर्ण होण्याची किंवा प्रगतीपथावर येण्याची शक्यता “धूसरच” झाली आहे.
कामाची सद्यस्थिती आणि समस्या काय?
“ईगल कंन्स्ट्रक्शनने” रस्त्याच्या एका बाजूने “डाकिवली फाटा ते वडवली, खुपरी, शिरीष पाडा, गांधरे येथील परिसरात दीड ते दोन किलोमीटर अंतरावर ३.५ ते ४ फूट खोलवर खोदकाम केलेले आहे. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी भराव करून प्रत्यक्षात कॉंक्रिटीकरणाला सुरुवात केलेली नाही.
या मार्गावर खोदलेल्या बहुतांशी ठिकाणी मोऱ्या, गटारींचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कडेला बांधण्यात आलेल्या गटारी अधिक चढ उताराच्या (उंची असमान) असल्याने पाण्याचा निचरा होवु शकणार नाही. पर्यायाने गटारीतील पाणी तुंबून रस्त्यावर साचून राहील. त्यामुळे रस्ता जरी झाला तरीही तो पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे.नवीन मोऱ्या बनविण्यासाठी खोदाई केलेली आहे, मात्र कामाचा वेग मंदावल्याने काम “जैसे थेच” स्थितीत दिसत आहे. रस्त्याची पातळी देखील कमी अधिक आहे. तसेच काम नियमानुसार होण्याची आवश्यकता असताना ते होताना दिसत नाही. त्यामुळे रस्त्यावर उंचवटा राहून टप्पे राहतील.खोदकाम केलेल्या ठिकाणी भरावा करिता वापरण्यात येणारे जीएसबी माल (मटेरियल) गुणवत्तापूर्वक दिसून येत नाही. त्यामुळे रस्त्याचा दर्जाबाबत देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होवून रस्ता किती टिकेल याची कुठलीही शाश्वती राहिलेली नाही.
ईगल कन्स्ट्रक्शनला “वाडा – भिवंडी” रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी लागणारे मालाचा (मटेरियल) पुरवठा आरएमसी प्लांट (रेडी मिक्स काँक्रीट) माध्यमातून कऱण्यात येणार आहे, मात्र हा प्लांटच अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे काम देखील ठप्प झाले राहिले आहे असल्याचे सार्वजानिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे.महामार्गावरील विद्युत खांब ठरणार अडचणीचे, वेळीतच स्थलांतरित करणे आवश्यक; विद्युत खांब कोसळून पडुन अपघाताची शक्यता.
“वाडा – भिवंडी” (डाकिवली फाटा) या रस्त्यासाठी खोदाई केलेली आहे. मात्र या मार्गावर (शिरीष फाटा ते नेहरोली) व अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या अगदी मधोमधी विद्युत खांब उभे दिसत आहेत. रस्त्याची खोदाई केल्याने विद्युत खांबांचा (इलेक्ट्रिक पोल) आधार कमी झाला आहे. त्यामुळे रस्ता बनविण्यापूर्वी किंवा तातडीने विद्युत खांब स्थलांतरित करणे आवश्यक आहे, तसे न केल्यास हे विद्युत खांब कुठल्याही क्षणी अथवा वादळी वाऱ्यात अथवा पावसाळ्यात खोदलेल्या जागेत पाणी साचून राहिल्याने त्यांचा आधार कमी झाल्याने कोसळून पडून अपघात किंवा अनर्थ होण्याची संभवना आहे. त्यामुळे अशा घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? या दुर्दैवाने घडणाऱ्या घटनेला कोण जबाबदार राहील असा प्रश्न निर्माण होत आहे.
प्रतिक्रिया
“ईगल कन्स्ट्रक्शन” कंपनीच्या ठेकेदाराला “वाडा – भिवंडी” मार्गाचे कॉंक्रिटीकरणाचे काम “मे” अखेर पर्यंत पुर्ण करण्यासाठी तसेच जो एकेरी वाहतूक होत असलेला रस्ता नित्कृष्ट झाला आहे, तो सुस्थितीत करण्यासाठी तसेच कामाचा वेग वाढविण्यासाठी वारंवार सुचना दिल्या आहेत, मात्र तरीही त्यांच्याकडून सुचनांचे पालन केले जात नाही. पोपटराव चव्हाण, कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर
“भिवंडी – वाडा – मनोर” महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आम्ही “स्थानिक संघर्ष समितीच्या” माध्यमातून अनेकदा उपोषण व आंदोलन केले आहे.
मात्र शासन व प्रशासनाकडून नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असणाऱ्या महामार्गाची दुरुस्तीसाठी करोडो रुपयांचा खर्च करून देखील कुठलीही रस्त्याची प्रगती होताना दिसून येत नाही. त्यामुळे पुन्हा या रस्त्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. जयेश शेलार पाटील, सामाजिक कार्यकर्ते तथा सदस्य – स्थानिक संघर्ष समिती, वाडा