जव्हार तालुक्यात पर्यटन सुविधांवर सव्वासात कोटींचा खर्च; कामेही अपूर्ण
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नीरज राऊत, लोकसत्ता
पालघर: जव्हार तालुक्यात पर्यटन विकासासाठी गेल्या पाच वर्षांत सात कोटी ३३ लाख रुपयांचा खर्च झाला असून त्यापैकी अनेक कामे आजतागायत झाली नसल्याचे दिसून आले आहेत. तर कामांचा दर्जाही निकृष्ट असल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात ‘लोकसत्ता’ने सातत्याने वाचा फोडल्यानंतर जिल्ह्यातील पर्यटनावर होणाऱ्या कामांची स्वतंत्र नोंद घेऊन दुबार कामे टाळण्याचे तसेच दृश्यमान कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा स्थापनेपासून ग्रामीण भागांतील पर्यटन विकासावर सुमारे १७ कोटी रुपये खर्च झाला असून जव्हार तालुक्यात सात कोटी ३२ लाख ५२ हजार, मोखाडा येथे आठ कोटी ५६ लाख ३० हजार, वाडा येथे ४५ लाख तर विक्रमगड येथे ६२ लाख ६२ हजार रुपयांचा समावेश आहे. यापैकी अधिकतर खर्च हा रस्त्यांच्या संरक्षण भिंत (रिटेनिंग वॉल), रस्त्यांची दुरुस्ती, पार्किंग शेड, सौर पंथ दिवे, शौचालय आदींवर खर्च झाला आहे. प्रत्यक्षात यापैकी अनेक कामे झाली नसल्याचे तसेच झालेल्या कामांचा दर्जा राखला गेला नसल्याचे दिसून आले आहे.
जव्हार शहरात सूर्य तलाव जोडरस्त्याचे बांधकाम न होता ३० लाख रुपये खर्च केले असून हनुमान पॉइंट व शिरपा माळ येथे अजूनही पार्किंग शेड उभारण्यात आलेली नाही. हनुमान पॉइंट व सनसेट पॉइंट येथे पर्यटकांसाठी बांधलेल्या शौचालयात पाणी नसून हनुमान पॉइंट येथे खर्च झालेले सौरदिवे कार्यरत नसल्याचे दिसून आले आहे.
जव्हार तालुक्यात पर्यटकांच्या माहिती फलकांसाठी तब्बल ६५ लाख रुपयांची उधळपट्टी झाल्याचे दिसून येत आहे. दाभोसा धबधबाच्या ठिकाणी निधी खर्च करूनही रस्त्यालगत संरक्षण भिंतीचे काम समाधानकारकरीत्या झाले नसून अपघात टाळण्यासाठी अडथळय़ांचे (क्रैश बैरियर) काम झालेले नाही.
हिरड पाडा धबधब्याच्या ठिकाणी १३३ लाख रुपयांचा खर्च झाला असला तरी प्रत्यक्षात या ठिकाणी फक्त १०० मीटरचा रस्ता उभारण्यात आला आहे. उभारण्यात आलेले सुरक्षा कठडा (रेलिंग) धबधब्याच्या ठिकाणापासून काही अंतरावर असून प्रत्यक्षात धबधब्याच्या ठिकाणी गेल्या पाच ते सात वर्षांत कोणत्याही प्रकारचे खर्च झाला नाही. या ठिकाणी मंजूर झालेले पार्किंग शेड, पेवर ब्लॉक बसवणे, प्रवेशद्वार उभारणे ही कामे झालेली नसून शौचालयात पाण्याची सुविधा नाही. आगामी काळात या ठिकाणी धरण उभारणीचा प्रस्ताव मंजूर होणार असताना धरण क्षेत्रांमध्ये बाधित होणाऱ्या रस्त्यावर सुमारे ८० लाख रुपयांचा झाल्याचे दिसून येत असून झालेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा सुमार आहे.
दक्षता विभागाकडून तपासणी
पर्यटन विकासासाठी जिल्हा नियोजन समितीसह आदिवासी विकास प्रकल्प, पर्यटन विकास महामंडळ व इतर माध्यमांतून मिळणाऱ्या स्वतंत्र निधीमधून दुबार कामे होऊ नयेत म्हणून गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या कामांचा तपशील ठेवण्यात येत आहे. आगामी वर्षांत अशा ठिकाणी नव्याने निधी खर्च केला जाणार नाही. रस्त्याच्या दुरुस्ती करण्याऐवजी काँक्रीटचे नवीन रस्ते बनवण्याचा पर्याय आहे. तीन वर्षांत झालेल्या कामांची दक्षता विभागाकडून तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
सौरदिवे कोणासाठी?
जव्हार येथे निवासी पर्यटनाची सुविधा मर्यादित असल्याने अधिकतर पर्यटक दिवसा येत असतात. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सायंकाळनंतर पर्यटकांची वर्दळ नसते. अशा परिस्थितीत अनके पर्यटन स्थळी सौर दिव्यांच्या उभारणीवर अमाप खर्च झाला आहे. प्रत्यक्षात उभारण्यात आले सौर दिव्यांचा दर्जा वादीत असून अधिक ठिकाणी त्यांची उभारणी केल्यानंतर ते कार्यरत झाले नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.