ग्रामीण भागांतील नागरिकांचे  हाल

रमेश पाटील, लोकसत्ता

वाडा :   उत्पन्न नसल्याचे  कारण पुढे करून एसटी महामंडळाच्या वाडा आगारातून ग्रामीण भागांत दिवसभरात जाणाऱ्या   ८० ते ९० (७० टक्के) बसफेऱ्या बंद केल्याने नागरिकांचे हाल होत आहे. 

ग्रामीण भागातील जनतेला बस सेवेची सेवा मिळावी यासाठी सन १९९६ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारमधील तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत वाडा बस आगाराचे उद्घाटन करण्यात आले. तालुक्यातील रस्त्याची सुविधा असलेल्या बहुतांशी गावात बसेवा सुरू झाली. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याने काही गावांमध्ये दररोज सात ते आठ बसफेऱ्या जाऊ लागल्या. तब्बल १६ ते १७ वर्षे येथील ग्रामीण भागातील प्रवाशांना एसटी बसची चांगली सुविधा मिळाली. विशेषत: ग्रामीण भागातून तालुका मुख्यालयी असलेल्या माध्यमिक शाळा व महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटीची सुविधा फारच फायदेशीर ठरली. वाडा आगाराने हळूहळू ग्रामीण भागातील बसफेऱ्या कमी करून भिवंडी, ठाणे, कल्याण, पुणे, नगरकडे जाणाऱ्या फेऱ्यांकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यामुळे ग्रामीण भागात खासगी, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक वाढीस लागली. मार्च २०२० पासून करोनाचे संकट सुरू झाल्यापासून येथील एसटी बस आगाराने ग्रामीण भागातील बससेवा पूर्णत: बंद केली. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने येथील एसटी बस आगाराने शहरी भागातील बससेवा पूर्ववत सुरू केली. मात्र ग्रामीण भागातील ७० टक्के बसफेऱ्या आजही बंदच ठेवल्या आहेत. ग्रामीण भागातून उत्पन्न (भारनियमन) मिळत नाही, म्हणून येथील ७० टक्के बसफेऱ्या बंद केल्याचे सांगितले जात आहे. मात्र याच वेळी या तालुक्यातील ग्रामीण भागातील बस सेवा बंद झाल्याने मोठय़ा प्रमाणावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या एसटी महामंडळाच्या ब्रीदवाक्यालाच वाडा आगाराने हरताळ फासल्याने येथील प्रवाशांना नाइलाजाने खासगी प्रवासी वाहतुकीकडे वळावे लागले आहे. दरम्यान, अनेक बस फेऱ्या रद्द झाल्यामुळे आम्हाला लहान मुलांना शाळेत पोहोचविण्यासाठी खासगी वाहनांचा असरा घ्यावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया  सारिका पाटील या महिला प्रवाशाने दिली आहे. तर  ग्रामीण भागांतून अत्यंत कमी उत्पन्न मिळत असल्याने अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत, असे   वाडा आगारप्रमुख मधुकर धांगडा यांनी सांगितले.

खासगी प्रवासी वाहतूकीला फायदा

* ग्रामीण भागातील  ७० टक्के बसफेऱ्या बंद केल्याने तालुक्यातील वाडा शहर, कुडूस, खानिवली, कंचाड, परळी, सोनाळे या ठिकाणी ३०० हून अधिक जीप, मिनिडोअरमधून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरु आहे.

* एसटी च्या बसफेऱ्या बंद केल्याने तालुक्यातील दोन हजारांहून अधिक विद्यार्थी खासगी वाहनांनी प्रवास करताना दिसत आहेत.

Story img Loader