जिल्ह्य़ातील ५९,९८९ मातांना लाभ; खात्यांत २७ कोटी ३९ लाख २८ हजार जमा

पालघर: पालघर जिल्ह्य़ात प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत ५९,९८९ मातांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत तर ६६,५७३ मातांनी या योजनेत नोंदणी केलेली आहे. पालघर जिल्ह्य़ात या योजनेचे ९३.२ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

या योजनेअंतर्गत मातांच्या खात्यात आतापर्यंत २७ कोटी ३९ लाख २८ हजार इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे. याबाबतची माहिती बुधवारी जिल्हास्तरीय पोषण अभियानाच्या जिल्हा अभिसरण समिती सभेमध्ये आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

पालघर जिल्ह्य़ातील आरोग्य विभाग, पालघर जिल्हा परिषद व वसई-विरार महानगरपालिकेमार्फत केंद्राची प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविली जात आहे. या योजनेचा लाभ पहिल्या खेपेच्या गरोदर महिलांना ३ टप्प्यात दिला जातो.

पहिला हप्ता मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसाच्या आत शासकीय आरोग्य संस्थेत गर्भधारणा नोंदणी केल्यावर १ हजार रुपयांचा लाभ मिळतो. किमान एकदा प्रसूतीपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे ६ महिने पूर्ण झाल्यानंतर दोन हजाराच्या दुसऱ्या हप्त्याचा लाभ लाभार्थीच्या खात्यात जमा केला जातो. प्रसूतीनंतर बाळाचे जन्म नोंदणी व तीन महिन्याचे प्राथमिक लसीकरण पूर्ण केल्यानंतर २ हजार रुपयांचा लाभ तिसरा हप्तात मिळतो.

जिल्ह्य़ासाठी राज्यस्तरावरून जानेवारी २०१७ ते मार्च २०२२ साठी एकूण ७१,४६७ लाभार्थी नोंदणीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी बुधवार अखेर ६६,५७३ लाभार्थीची नोंदणी पूर्ण झालेली आहे. जिल्ह्य़ातील ग्रामीण भागासाठी दिलेल्या उद्दिष्टापैकी १००.८ टक्केपेक्षा जास्त उद्दिष्ट साध्य केले आहे. तर वसई-विरार महानगरपालिका यांना दिलेल्या उद्दिष्टापैकी ८४.७ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. उर्वरित उद्दिष्ट मार्च अखेपर्यंत साध्य करण्याचे प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही या समितीच्या बैठकीत विविध यंत्रणा यांनी दिली. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेविषयी माहितीसाठी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांच्याशी संपर्क साधून लाभ घेता येईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी दिली.

गरोदर मातांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जिल्ह्य़ातील लाभार्थ्यांनी  या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व सर्व सदस्य तसेच सर्व जिल्हा व तालुका विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी केले.

योजनेत आवश्यक असलेल्या बाबी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे आधारकार्ड, पतीचे आधारकार्ड, मातेचे आधार संलग्न बँक खाते किंवा पोस्ट बँक खाते, माता बाल संगोपन कार्डची सत्यप्रत व जन्म नोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य आहे.