पालघर : पालघर तालुक्यातील माहीम येथे शिकवणीला जाणाऱ्या एका तिसरी इयत्तामध्ये शिकणाऱ्या मुलीला विद्युत शॉक लागून ती मृत्यूशी झुंज देत असताना फणसभाट येथील सुहास प्रकाश म्हात्रे यांनी प्रसंगावधान व धाडस दाखवल्याने या चिमुकलीचे प्राण वाचले. या मुलीची प्रकृती स्थिर असून ती पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहे.
आज दुपारी साडेतीन वाजल्याच्या सुमारास तिसरीत शिकणारी त्रिशा मेहेर ही टेंभी भागातील मुलगी आपल्या मित्र मैत्रिणीसोबत शिकवणीसाठी माहीम फणसभाट येथे जात होती. खारोडी व फणसभाट दरम्यान असणाऱ्या पायवाटे वरून जात असताना विद्युत वाहिनी तुटली असल्याने या मुलीला विजेचा जबर शॉक बसला. त्यानंतर त्रिशाला शरीराला झटके येऊ लागल्याने तिच्यासोबत असणाऱ्या अन्य सहकारी घाबरून यांनी पळ काढला. अचानक पाळणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पाहून जवळच वाडीमध्ये काम करणाऱ्या एका महिला कामगार भरती म्हसे त्रिशाला विद्युत शॉक लागल्याचे पाहिले व तिने आरडाओरड करून परिसरातील लोकांना सतर्क केले.
हेही वाचा – ठाण्यात महापालिकेच्या वतीने मोफत फिरता दवाखाना
टाटा स्टीलमध्ये काम करणारे सुहास प्रकाश म्हात्रे (४३) व चैतन्य वर्तक हा आवाज ऐकून मदतीला धावले. विद्युत शॉक लागल्याचे समजल्यानंतर त्यांनी प्रथम जवळ असलेल्या विजेच्या खांबावर असणारे फ्युज काढले व या लहान मुलीला वाचवण्यासाठी पुढे सरसावले. धाप टाकत असणाऱ्या या मुलीने मान व डोळे फिरवले होते व ती बेशुद्ध अवस्थेमध्ये होती. त्यांच्यासोबत आलेल्या चैतन्य वर्तक यांच्या मदतीने माहीम येथील एका खासगी दवाखान्यात जाऊन तिला प्रथमोपचार दिले व नंतर माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला दाखल केले. मुलीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीप्ती गायकवाड यांनी सांगितले. सध्या तिला पालघर येथे वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान प्रसंगावधान दाखवून या मुलीचे प्राण वाचवणाऱ्या सुहास म्हात्रे व चैतन्य वर्तक यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.