पालघर : कवडास उन्नई बंधाऱ्याच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन कालव्यांमधून सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर डहाणू आणि पालघर तालुक्यातील जवळपास १४ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामात शेती केली जाते. दरवर्षी १५ डिसेंबरच्या आसपास या दोन्ही कालव्यांमधून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येते. परंतु यावर्षी अद्याप उजव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडले नसल्याने ८ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी हंगामातील शेती धोक्यात आली आहे. पाण्याचे आवर्तन कधी सोडतील याची वाट शेतकरी पाहत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालघर जिल्ह्यातील कवडास उन्नई धरणाच्या डाव्या व उजव्या अशा दोन्ही कालव्यांतून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात येतात. यातील डाव्या कालव्यातून १९ डिसेंबर रोजी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले असून, उजव्या कालव्यावर मोठे क्षेत्र अवलंबून आहे. डहाणू तालुक्यातील वाघाडी, कासा, चारोटी, सारणी, पिंपळशेत, ऐना, दाभोन, रायतळी गोवणे, साखरे, वनई, हनुमाननगर, शिगाव या गावांतील जवळपास आठ हजार हेक्टर शेती क्षेत्र उजव्या कालव्याच्या पाण्यामुळे सिंचनाखाली येते. कालव्याच्या पाण्यावर या भागात भातशेती, भाजीपाला, फुलशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु कालव्यातून अद्याप पाणी सोडले नसल्याने शेतकरी पाणी सोडण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

हेही वाचा – पालघर जिल्ह्यात १२५ शाळा अनधिकृत, जिल्ह्यात अनधिकृत शाळा सुरू झाल्यास आत्ता थेट शिक्षणाधिकारी जबाबदार

उजव्या कालव्याची वाघाडी येथे दुरुस्ती सुरू आहे. तसेच सार्वजनिक बांधकामाच्या सारणी, रानशेत येथे रस्त्यावरील पुलांच्या कामामुळे कालवा फुटलेला होता त्याचेही दुरुस्तीचे काम सुरू आहे. काही ठिकाणी सार्वजनिक बांधकामाच्या पुलांचे काम सुरू आहे. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतरच उजव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडता येणार आहे, त्यामुळे या भागातील शेतकरी चिंतेत आहेत.

हेही वाचा – पालघर: आठ कोटी रुपयांच्या कामामध्ये अनियमितता

उन्नई बंधाऱ्याच्या डाव्या कालव्यातून दोन दिवसांपूर्वी पाणी सोडले आहे. उजव्या कालव्याची काही ठिकाणी दुरुस्ती सुरू आहे, त्यामुळे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यास उशीर झाला आहे. तरी सर्व कामे पूर्ण करून पुढील दोन दिवसांत उजव्या कालव्यातूनसुद्धा पाण्याचे आवर्तन सोडण्यात येईल. – योगेश पाटील (कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग)

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A farmer dependent on the right canal of the kavadas unnai dam awaits water release ssb