पालघर / बोईसर : ऐन ऑगस्ट महिन्यात पावसाने मारलेली दडी, ढगाळ वातावरणासोबत कडक ऊन आणि दमटपणा या वातावरणातील बदलामुळे पालघर जिल्ह्यातील रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. पावसाळा सुरू होताच दरवर्षी वातावरणीय बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, पोटाचे विकार, त्वचा विकार, डोळय़ांची साथ आणि सोबतच सर्पदंश आणि श्वानदंशाच्या रुग्णामध्ये मोठी वाढ होते. नोव्हेंबर ते मे महिन्यापर्यंत ३० खाटांच्या बोईसर ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज सरासरी १५० ते २०० रुग्ण उपचारासाठी येत होते.
मात्र जूनमध्ये पाऊस सुरू होताच दररोज सरासरी ३०० ते ३५० रुग्ण उपचारासाठी येत असून ऑगस्ट महिन्याच्या १७ दिवसांत एकूण ३८०० बाह्यरुग्णांनी विविध आजारांवर उपचार घेतले आहेत. तर आंतररुग्ण विभागातदेखील एकावेळी सरासरी १५ ते २० रुग्णांवर उपचार सुरू असतात. मागील दोन महिन्यांत आत्तापर्यंत १६५ रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती बोईसर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्याकीय अधीक्षक डॉ. मनोज शिंदे यांनी दिली.
३० खाटांच्या बोईसर ग्रामीण रुग्णालयात एकूण २७ पदे मंजूर आहेत. या एकूण मंजूर पदांपैकी फक्त १० पदे भरलेली आहेत. अपुऱ्या मनुष्यबळाच्या आधारे सतत वाढत्या रुग्णसंख्येला सेवा देताना वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि अधिपरिचारिका यांची दमछाक होते. कासा उपजिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात जुलै महिन्यात ४५०० व ऑगस्ट महिन्यातील १५ दिवसांत २५०० रुग्णांवर उपचार करण्यात आले. तर डहाणू उपजिल्हा रुग्णालयात जुलै महिन्यात ६००० व १५ ऑगस्टपर्यंत २००० हजार रुग्णांनी बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतले. पालघर ग्रामीण रुग्णालयातदेखील सध्या दररोज सरासरी ३५० ते ४०० रुग्ण उपचारासाठी येत आहेत.
नवीन इमारतीसाठी निधीची प्रतीक्षा
सन २००६ साली मंजूर झालेले बोईसर ग्रामीण रुग्णालय नवापूर नाका येथील भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरू होते. मात्र इमारत धोकादायक घोषित झाल्यानंतर काही काळ सरावली ग्रामपंचायत इमारतीत व त्यानंतर टिमा रुग्णालयाच्या इमारतीत ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज सुरू करण्यात आले. रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी संजयनगर येथील ३० गुंठे सरकारी जागा उपलब्ध करून दोन वर्षे झाली आहेत. बांधकाम आराखडा आणि २२.१२ कोटी निधीचे अंदाजपत्रक पालघरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सार्वजनिक आरोग्य संचालनालय यांच्याकडे सादर करून वर्षभरापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. मात्र आवश्यक निधी मंजूर होत नसल्याने नवीन इमारतीसाठी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागेल, असा सवाल बोईसर वासिय करीत आहेत.