पालघर : नगर परिषदेला वैशिष्टय़पूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत पालघर नगर परिषद हद्दीमधील १६ कामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून प्राप्त झाला आहे. मात्र शहराचा सर्वागीण विकास साधण्याऐवजी काही नगरसेवकांच्या क्षेत्रात या कामांचे वाटप करून पक्षपात केल्याचा आरोप होत आहे. हे पॅकेज म्हणजे पक्षांतराच्या स्थितीत असलेल्या नगरसेवकांना आमिष दाखवण्याचाच हा प्रकार असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.
नगर परिषदेच्या सन २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे बहुमत होते. २८ सदस्यांपैकी शिवसेनेचे १४ नगरसेवक, शिवसेनेला पाठिंबा देणारे पाच अपक्ष नगरसेवक, भाजपचे सात तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक असे बलाबल होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर या सर्व १९ नगरसेवकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत राहण्याचे पसंत केले. दरम्यानच्या काळात नगरसेवक अमोल पाटील, रवींद्र म्हात्रे, सुभाष पाटील व प्रवीण मोरे (अपक्ष) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या नगरसेवकांच्या कार्यक्षेत्रात बहुतांश कामे वितरित केली गेल्याचे दिसून आले आहे.
नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली
पालघरच्या नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर काही महिन्यातच काँग्रेसमध्ये असणारे त्यांचे पती यांनी पक्षांतर करून शिवसेनेत प्रवेश घेतला. सध्या ते शिवसेना (शिंदे गटाचे) प्रवक्ते म्हणून कार्यरत आहेत. आगामी नगर परिषद निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे वर्चस्व राहण्यासाठी विद्यमान नगरसेवकांना पक्षांतर करण्यासाठी प्रलोभन देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
मंजूर विकास कामे
अल्याळी जुना सातपाटी रोड मुख्य रस्ता ते भरवापाडा रस्त्याचे काँक्रीटीकरण (एक कोटी रुपये), हनुमान चौक ते मासळी मार्केट भूमिगत गटार व पदाचारी मार्ग (३७.६० लाख), अल्याळी ते दिनेश भुजाडे घर रस्ता (१६ लाख), अल्याळी ते जनार्दन माळी घर रस्ता (१० लाख), वेवूर भंडारी आळी येथील अंतर्गत रस्ता (३८.७१ लाख), अल्याळी ते जयप्रकाश पाटील यांचे घर रस्ता (१९.९० लाख), रेणुका कॉम्प्लेक्स येथील अंतर्गत रस्ता (एक कोटी), हावरे नक्षत्र ते पी.टी मोहिते यांच्या घरापर्यंत डांबरीकरण (एक कोटी), भगवान जगन्नाथ पाटील यांच्या घरापासून गावदेवी भवानी माता मंदिपर्यंत रस्ता (५० लाख), अल्याळी बस स्टॉप ते हिंदूवी मैदान व्यायामशाळेपर्यंत काँक्रीटीकरण व पेवर ब्लॉक (२७.७८ लाख), बोईसर ते ख्रिस्ती समाजभवनपर्यंत काँक्रीटीकरण (८० लाख), पिलेना नगर मुख्य माहीम रस्ता ते संतोष म्हात्रे घरापर्यंत आरसीसी गटार (एक कोटी चार लाख), नवली मुख्य रस्ता ते गणेश प्रधान यांच्या घरापर्यंत रस्ता (१६ लाख), विष्णूनगर- लोकमान्य पाडय़ाच्या मोरीपासून राजेश गोरवे यांच्या घरापर्यंत रस्ता (दोन कोटी), अल्याळी सातपाटी म् ते बाळू बेंदर यांच्या घरापर्यंत गटार व रस्ता (७५ लाख) आदी.
पालघरमधील बहुतांश नगरसेवकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहण्याचे पसंत केले आहे. मार्च २०२४ मध्ये होऊ पाहणाऱ्या नगर परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने विकास कामांचा विशेष निधी मंजूर करून पक्षांतर्गत फूट पाडण्यासाठी हा प्रयत्न आहे. -कैलास म्हात्रे, गटनेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)