पालघर :प्लास्टिक मुक्त दुर्गंधी मुक्त तसेच स्वच्छ सुंदर पालघर जिल्ह्याच्या निर्मितीसाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवली जात असून त्याचे विधिवत उद्घाटन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले. जिल्ह्यात प्लास्टिक बंदी सोबतच कचऱ्यातून गोळा केल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर प्रक्रिया करण्यासाठी तालुकास्तरीय केंद्र उभारण्यात येत आहे.

२८ मार्च रोजी झालेल्या जनता दरबारात प्लास्टिक मुक्त जिल्हा करण्याचा इरादा पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यासपीठावर व्यक्त केला होता. त्याअनुषंगाने २२ एप्रिल पासून १ मे पर्यंत जिल्ह्यात विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनातर्फे याप्रसंगी देण्यात आली. या अभियानाचे विधिवत उद्घाटन आज पालघर नगर परिषदेच्या हद्दीत करण्यात आले.

जिल्ह्यातील ४७३ ग्रामपंचायत पैकी २७० ग्रामपंचायत अंतर्गत विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आले असून या अंतर्गत सहा टनापेक्षा अधिक कचरा गोळा करण्यात आला आहे. या कचऱ्यामधील प्लास्टिक मुक्त घटकांची प्रक्रिया करण्यासाठी विशेष तालुकास्तरीय केंद्रांची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती याप्रसंगी जिल्हा परिषदेतर्फे देण्यात आले. जिल्ह्यात प्लास्टिकवर बंदी आणण्यासाठी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची बैठक पुढील आठवड्यात आयोजित केली जाणार असून जिल्हा सुंदर करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा परिषद प्रशासन एकत्रितपणे काम करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी याप्रसंगी सांगितले.

प्लास्टिक मुक्तीच्या दृष्टीने जनजागृती करण्याच्या अनेक योजना केल्या जात असे विविध गावच्या लोकप्रतिनिधींना स्वच्छतेमध्ये नेत्रदीपक कमगिरी करणाऱ्या ठिकाणी क्षेत्रभेटीसाठी पाठवण्यात येत आहे. गटविकास अधिकारी यांच्या मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन प्लास्टिक मुक्तीच्या दृष्टीने आपल्यात आलेल्या विविध उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

आठ ग्रामपंचायतींचा गौरव

वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतीचा सत्कार पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आला. यामध्ये स्वच्छतेसाठी घोलवड (डहाणू), स्व उत्पन्न वाढीसाठी सालवड (पालघर), महिला स्नेही योजनांसाठी कोंडगाव (विक्रमगड), जलसंधारण प्रकल्पांसाठी आमगाव (तलासरी), सेवा हक्क अधिनियम साठी अर्नाळा (वसई), पेसा कायदा अंमलबजावणीसाठी कुरलोट (मोखाडा), वन हक्क आढावा साठी कासाटवाडी देवीचा पाडा (जव्हार) व माझी वसुंधरा अभियान राबवण्यासाठी खानिवली (वाडा) ग्रामपंचायत प्रतिनिधींना गौरविण्यात आले.