पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये एक हजारहून अधिक मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही मुले सहा ते चौदा वयोगटातील आहेत. यातील कुटुंबाच्या स्थलांतरामुळे व इतर कारणांमुळे अनेक मुले इच्छा असूनही शिक्षण घेऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. बहुतांश मुले ही ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबांतील आहेत. प्रशासनाच्या शिक्षण विभागाच्या उदासीन कारभाराचा फटका मुलांना बसत आहे.
शिक्षण विभागाने केलेल्या एका शोधमोहिमेअंतर्गत हे विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी उत्सुक असले तरी कुटुंबांच्या स्थलांतरामुळे व इतर कारणांमुळे ते शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर राहिले आहेत, अशी माहिती देण्यात येते. जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची संख्या एक हजारहून अधिक आहे. मात्र ही आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी केला आहे. पालघर जिल्ह्यात आठवीतून नववीत गेलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्याने तेही शिक्षण घेऊ शकत नाहीत. परिणामी अशी मुले मजुरी, नोकरी करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत. दहा मुले ही तर बालमजूर म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळते. काही मुलींची चक्क लग्ने लावण्यात आली आहेत. शिक्षणाअभावी अल्पवयात लग्न झाल्याने मुलींच्या आरोग्याच्या समस्या उद्भवतात व त्यातून कुपोषणासारखा आजार फोफावत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शाळाबाह्य मुले ही डहाणू तालुक्यातील आहेत, असा दावा चौधरी यांनी त्यांनी केलेल्या एका सर्वेक्षणातून केला आहे. पाचशे मुली तर पाचशे सहा मुले शाळाबाह्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बहुतांश मुलामुलींना शाळेत दाखल केल्याचा दावा शिक्षण विभागाने केला असला तरी त्याचे खंडन केले जात आहे, असे चौधरी यांनी म्हटले आहे.
शिक्षण विभागाचे मौन
आठवी उत्तीर्ण होऊन नववीच्या शाळेअभावी, वर्गाअभावी विद्यार्थाना प्रवेश घेता येत नव्हता. त्यासाठी जिल्हा परिषद शाळांना नववी व दहावीचे वर्ग संलग्न करण्यात आले आहेत. मात्र आठवी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थी वर्गाची संख्या मोठी व नववी- दहावीचे वर्ग त्या तुलनेत कमी पडू लागले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आठवी व नववीनंतर प्रवेशासाठी संघर्ष करावा लागतो. एखाद्या ओळखीने इतर शाळेत प्रवेश घेण्याची वेळ येते. मात्र ओळख नसलेल्या सामान्य कुटुंबातील मुलांना अशा स्थितीत शाळाबाह्य राहावे लागते हे काशिनाथ चौधरी यांनी पुराव्यानिशी सर्वसाधारण सभेत दाखवून दिले असता संपूर्ण सभागृहाने व शिक्षणाधिकारी यांनी मौन पाळल्याचे पाहावयास मिळाले. दरम्यान, जिल्हा सोडून स्थलांतर झालेली तीन हजार ८६५ मुले असून १६७२ मुले परत आलेली आहेत. गेल्या वर्षीचा शिक्षण विभागाचा हा आकडा आहे. मात्र ही मुले शिक्षणाच्या प्रवाहात आहेत की नाहीत याचा शोध शिक्षण विभागाने लावलेला दिसत नाही.
बाल कामगारांकडे दुर्लक्ष
गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणात जिल्ह्यात २२८५ शाळाबाह्य मुले असल्याचे आढळले होते. मात्र सर्वेक्षण करताना एकाच विद्यार्थ्यांच्या दुबार नोंदी, तांत्रिक अडचणी यामुळे हा आकडा चुकीचा असून प्रत्यक्षात १७०५ विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले होते. २०२१ मधील शाळाबाह्य सर्वेक्षणामध्ये राज्यात नाशिक, पुणे जिल्ह्यापाठोपाठ पालघरमध्ये ३८ शाळाबाह्य मुले बाल कामगार असल्याचे वास्तव उघड झाले होते. त्यांचे पुढे काय झाले हे समजलेले नाही. या वर्षी त्यात आणखी १० जणांची भर पडली आहे.
जिल्ह्य़ातील स्थिती
(६ ते १४ वर्षे वयोगट)
तालुका मुले मुली एकूण
डहाणू १३७ १६६ ३०३
जव्हार ७३ ६४ १२८
मोखाडा ३० ३२ ६२
पालघर ६९ ६८ १३७
तलासरी ४० ४१ ८१
वसई ८१ ८१ १६२
विक्रमगड ५१ ३३ ८४
वाडा २५ १५ ४०
एकूण ५०६ ५०० १००६