वाडा : बायो सीएनजी व ग्रीन डिझेल विक्री पंप देण्यासाठी लागणारे विविध परवाने देण्यासाठी वाड्यातील एका तरुणाची नयोडा, नवी दिल्ली येथील नेक्सजेन एनर्जीया लिमिटेड या कंपनीच्या पाच जणांच्या टोळीने ३० लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली असल्याची फिर्याद वाडा पोलीस ठाण्यात या तरुणांनी दाखल केली आहे.
वाडा येथील रहिवासी असलेला नेहाल भास्कर दळवी ( वय २६) या उच्च शिक्षीत बेरोजगार तरुणाने बायो सीएनजी व ग्रीन डिझेल विक्री पंपाचा व्यवसाय करावयाचा होता. विविध वृत्तपत्रांमध्ये आलेल्या जाहिरातींवरुन या तरुणाने याबाबत नायोडा, नवी दिल्ली येथील नेक्सजेन एनर्जीया लिमिटेड या कंपनीबरोबर बोलणी केली. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय पाठक, संजय दुबे, उपाध्यक्ष अंकुर दुबे, व्यवस्थापक मयंक शर्मा, कार्यकारी अधिकारी विकास पांडा या पाच जणांनी विविध परवाने मिळवून देण्यासाठी या कंपनीला या तरुणाने ३० लाख ८० हजार रुपये आरटीजीएसच्या माध्यमातून दिले. विशेष म्हणजे एवढी मोठी रक्कम जमा करण्यासाठी या तरुणाला त्याच्या आई, वडिलांबरोबर नातेवाईकांनीही मदत केली आहे. अनेकांकडे उसनवारी सुद्धा केली आहे.
ऑक्टोबर २०२१ पासुन ते जुन २०२३ या दिड वर्षांत या टोळक्याने या तरुणाला बायो सीएनजी व ग्रीन डिझेल पंपाचे परवानगी आली आहे. यासाठी ५ जानेवारी २०२२ रोजी एकाच वेळी ३० लाख रुपये व अन्य दोन वेळा ८० हजार रुपये असे एकूण ३० लाख ८० हजार रुपये उकळले आहेत. संबंधित कंपनीच्या या अधिकाऱ्यांकडे याबाबत या तरुणाने विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. सद्या तर ते फोनच उचलत नाहीत, अखेर या तरुणाने वाडा पोलीस ठाण्यात २४ जुलैला फिर्याद देऊन संबधितांकडून फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीत लिहुन दिले आहे.
वाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास खरमाटे तपास करीत आहेत. या प्रकरणी संबंधित पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून अजुनपर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे तपास अधिकारी सुहास खरमाटे यांनी सांगितले