पालघर/ बोईसर: दहिसर येथे घडलेला अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकार दुर्दैवी असून तरुण राजकारणाचा झालेला मृत्यू वेदनादायी आहे. या प्रकरणात तपास सुरू असून हत्येमागील कारण व आरोपी यांचा शोधून अटक करण्यात येईल. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नसून या प्रकरणाचे राजकारण होऊ नये अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर येथे व्यक्त केली.
शिवसेनेच्या मिशन ४८ शिवसंकल्प अभियाना निमित मनोर येथे ११ फेब्रुवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात गडचिंचले येथे घडलेले साधू हत्याकांड, दिशा सालियन व सुशांत राजपूत आदी प्रकरणांचा उल्लेख करत त्या काळी महाराष्ट्राचा बिहार झाला नव्हता का असा सवाल उपस्थित केला. विरोधकांनी आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करण्याची गरज असून खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये असे सांगत विद्यमान सरकारच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असे खडसावले. सरकार कोणावरही सूड भावनेने नेट कारवाई करित नसल्याचे सांगत सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले.
हेही वाचा… पालघर : महामार्गाच्या काँक्रीटीकरण ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, पाच ते सहा किमी पर्यत वाहनांच्या रांगा
अडीच वर्षांच्या सत्ताकाळात महा विकास आघाडी सरकारने विकासाचे सर्व प्रकल्प बंद करून राज्याला पिछाडीवर नेले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देत काहीजणांनी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसणे पसंत केले. मात्र आम्ही शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीपासून सोडवण्याचे काम केले. विझलेल्या मशालीने प्रकाश पाडता येत नाही अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर केली.
पालघर जिल्ह्यातील वाडा कोलम तांदळाला अक्षता म्हणून श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात सन्मान मिळाला. हे आपल्या राज्याचे भाग्य असून लोकसभा निवडणुकीत विजयाच्या अक्षता देखील महायुतीच्या मंडपात पडल्या पाहीजेत असा शिवसंकल्प करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी मेळाव्यासाठी उपस्थित शिवसैनिकांना केले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोर आणि पालघर येथील शिवसेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री पालघर येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवाला हजेरी लावून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेतला व सहभागी कलाकारांचा सन्मान केला.
स्थानिक कलावंतांना वाव मिळावा
पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात तसेच राज्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात क्षमता बाळगणारे तरुण असून अशा कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी राज्यात पाच दिवसीय महासंस्कृती अभियान आयोजित केल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगत प्रत्येक जिल्ह्याला या कामी दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित अनेक कार्यक्रमानसह राज्याच्या सांस्कृतिक दर्शन घडवणे व लुप्त होऊ पाहणाऱ्या लोक कलांना पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या महोत्सवातून होत असून स्थानिक कलावंतांना पुढे येण्यासाठी व नागरिकांच्या सांस्कृतिक भूक पुरविण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वांगीण विकास पायाभूत सुविधांचा स्तर उंचावणे तसेच शेतकरी, महिला, उद्योग, जेष्ठ नागरिक यांच्यासाठी विविध योजना आणण्यासोबत आपल्या सरकारने समाजातील सर्व घटकांसाठी लोकाभिमुख लोकहिताचे कार्यक्रम राबवल्याची माहिती दिली.