कासा : ‘टाटा सन्स’चे माजी अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रविवारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार अपघातात मृत्यू झाला. भरधाव असलेल्या त्यांच्या कारने केलेले चुकीचे ओव्हरटेक भोवल्याचे आणि त्यातून चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याचे तपासात उघड झाले आहे.

उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाताची चौकशी विविध पथकांमार्फत करण्यात आली आहे. मर्सिडिज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून या अपघातग्रस्त मर्सिडिजचा संपूर्ण डाटा यंत्राद्वारे स्कॅन करण्यात आला. त्यानंतर या गाडीचा डाटा जर्मनीला पाठवला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. पालघर पोलिसांनीही याला दुजोरा दिला आहे.

सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात मर्सिडिज कंपनीच्या अधिकाऱ्यांची सोमवारी पोलिसांच्या वाहन निरीक्षण विभागाच्या साहाय्याने घटनास्थळी गाडीची तपासणी केली. या वेळी सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. गाडी चालविणारी चालक महिला आणि मिस्त्री यांनी सीटबेल्ट लावलेले नव्हते. शिवाय भरधाव असलेल्या एका वाहनाला चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी सूर्या पुलाच्या िभतीला जाऊन धडकली. सीटबेल्ट लावलेले नसल्याने एअर बॅग उघडली नाही, असे निष्कर्ष पोलिसांनी काढले आहेत.

अंदाज चुकला..

चारोटी पुलाजवळ ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्या ठिकाणी एकूण तीन पूल आहेत. मुंबई मार्गिकेवर एक नवीन पूल आहे आणि चारोटी उड्डाणपूल संपल्यावर १०० मीटर अंतरावर सूर्या नदीवर पूल असून वाहने वेगाने येतात. सुरुवातीला तीन लेन व नंतर दोन लेन असल्याने अंदाज चुकल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या ठिकाणी सूचना फलक अथवा काळे-पिवळे पट्टे नाहीत, अशीही तक्रार केली जात आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी डिव्हायडरवर धडकून कार आणि ट्रकचा अपघात झाला होता, असे पोलिसांनी सांगितले.

सहा एअरबॅगची सक्ती?

भारतीय कंपन्या कार निर्यात करताना सहा एअरबॅग देतात. भारतात मात्र चार एअरबॅग असलेल्या कार विकल्या जातात. दोन जास्तीच्या एअरबॅगसाठी केवळ ९०० रुपये खर्च आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांप्रमाणे सहा एअरबॅग सक्तीच्या केल्या जातील. त्यात तडजोड करता येणार नाही, असे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले.