लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : मच्छीमारांसाठी आर्थिक उत्पन्नाचे महत्त्वपूर्ण स्त्रोत असणाऱ्या पापलेट माशाच्या लहान पिल्लांना पकडून त्याची विक्री करण्याचा सपाटा पश्चिम किनारपट्टीवरील मच्छीमारांनी सुरू केला होता. या संदर्भात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध बातम्यांची दखल घेऊन मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाई आरंभली आहे. दोन दिवसात वसई तालुक्यातील दोन बोटीविरुद्ध दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून आगामी काळात अपरिपक्व माशांची खरेदी करण्याबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभाग उपक्रम हाती घेणार आहे.

पापलेट या माशाला राज्यमासाचा दर्जा देण्यात आल्यानंतर केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था मुंबई यांच्या शिफारसीवरून पापलेट सह ५४ प्रजातीच्या माशांचे किमान कायदेशीर आकारमान निश्चित करून या आकारमानापेक्षा कमी आकाराचे अपरिपक्व मासे पकडण्याविरुद्ध शासनाने २ नोव्हेंबर २०२३ रोजी आदेश काढले होते. प्रत्यक्षात या आदेशाबाबत जनजागृती करण्यात आली असली तरी देखील त्याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध पालघर व ठाणे जिल्ह्यात आजवर कारवाई झालेली नव्हती.

राज्य मासा पापलेट धोक्यात आल्याबाबत लोकसत्ता व इतर वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी मत्स्य व्यवसाय विभागाच्या संबंधित सहआयुक्त यांना कारवाई करण्यासंदर्भात आदेशित केले होते. पश्चिम किनारपट्टीच्या बंदरांवर २५ ते ३० ग्रॅम वजनाचे व ५० ते ६० मिलिमीटर लांबीचे हजारोच्या संख्येने पापलेट पिल्ले पकडून त्याची विक्री होत असल्याची दिसून आले होते.

या पार्श्वभूमीवर २ एप्रिल रोजी स्वतंत्र अंमलबजावणी कक्षाचे अध्यक्ष महेश देवरे, सहआयुक्त मत्स्यव्यवसाय (सागरी), प्रादेशिक उपआयुक्त मत्स्य व्यवसाय मुंबई विभाग कक्षाचे सदस्य सचिव नागनाथ भादुले, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय ठाणे-पालघर दिनेश पाटील, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी ठाणे- पालघर हेमंत कोरे, परवाना अधिकारी वसई विनोद लहारे, परवाना अधिकारी उत्तन पवन काळे यांच्याद्वारे वसई व उत्तन कार्यक्षेत्रात गस्ती नौकेद्वारे नौका तपासणी करण्यात आली.

किमान कायदेशीर आकारमानापेक्षा कमी आकारमानाची मासळी चंदेरी पापलेट (Silver Pomfret) पकडलेल्या नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम अंतर्गत संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईत वसई तालुक्यातील दोन बोटी यांनी अल्पवयीन व कमी आकाराच्या माशांची पकड केल्याचे आढळून आले असून त्यांच्याविरुद्ध आरोप (प्रतिवेदना) ठेवण्यात आले आहेत. दोन्ही मासेमारी बोटीच्या मालकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय दिनेश पाटील यांनी लोकसत्ता ला सांगितले.

दरम्यान कमी आकारमानाची व वजनाची मासेमारी करू नये यासाठी मच्छीमार सहकारी संस्थांमध्ये जनजागृती करण्यासोबत विविध माश्यांचे परिपक्व आकारमान व वजन दर्शवणारे फलक प्रमुख बाजारपेठेमध्ये लावण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी दिली. यानंतरच्या टप्प्यात बोटीवरून मासे खरेदी करणारे व्यापारी व ग्राहक यांच्याविरुद्ध देखील कमी आकारमानाचे अपरिपक्व मासे खरेदी केल्यास कारवाई केली जाईल असा सुतोवाच त्यांनी केला.