बोईसर: जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्य शासनाने जव्हार येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित न राहता आदिवासी समाजाच्या ३४ पेक्षा अधिक संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांनी पालघर येथे आयोजित महा आक्रोश फेरी मध्ये सहभागी झाले. आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात असणाऱ्या उत्साहाच्या वातावरणा ऐवजी यंदा शासनाविरुद्ध आक्रोश व संतापाची भावना उफाळून आल्याचे दिसून आले.
आक्रोश फेरी पालघर येथील बिरसा मुंडा चौकातून सुरू होऊन आर्यन शाळेजवळ आल्यानंतर तिचे जाहीर सभेमध्ये रुपांतर झाले. या जाहीर सभेला भुमिसेनेचे संस्थापक अध्यक्ष काळूराम धोदडे, खासदार राजेंद्र गावित, आमदार विनोद निकोले, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार सुनील भुसारा, आमदार राजेश पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण, माजी खासदार बळीराम जाधव, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ माजी उपाध्यक्ष जगदीश धोडी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती व सदस्य यांच्या सह जवळपास १० हजार आदिवासी बांधव उपस्थित होते.
एक जिल्हा एक महाआक्रोश फेरीला दुपारी १ वाजेच्या सुमारास सुरवात झाली. या फेरीमध्ये पारंपारीक वेषभूषेत हजारो आदिवासी महिला, पुरुष, युवक सहभागी झाले होते. मणिपूर आणि धानिवरी येथे आदिवासी समाजातील महिलांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी हाताला काळया फिती बांधून, काळे कपडे परिधान करून तसेच निषेधाचे फलक घेऊन आक्रोश व्यक्त करीत व चित्ररथांच्या माध्यमातून संताप व्यक्त करण्यात आला. या आक्रोश फेरीमध्ये सहभागी आदिवासी नागरिकांकडून केंद्र सरकार आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जाहीर सभेतील प्रमुख मागण्या:
१) मणिपूर येथे आदिवासी महिलांची नग्न धिंड काढून अत्याचार करणाऱ्या नराधमाना फाशीची शिक्षा द्या
२) मणिपूर मध्ये राष्ट्रपती शासन लागू करा
३) समान नागरिक कायदा रद्द करा
४) जणगणने मध्ये अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र कॉलम द्या. ५) ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन संपूर्ण देशात सार्वजनिक सुट्टी जाहीर करा.